गांधीहत्येची पुन्हा चौकशी करून भाजप आणि संघ हिंदू महासभेचे श्रेय हिरावून घेऊ शकत नाही ! – हिंदू महासभा

मेरठ (उत्तरप्रदेश) – गांधीहत्येचे श्रेय भाजप आणि संघ आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. उलट त्यांनी आमचे आभार मानायला हवेत. चौथ्या गोळीचे सूत्र मांडून दोन्ही संघटना संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यांच्या खर्‍या चेहर्‍यावरील मुखवटा बाजूला करण्याची वेळ आली आहे. पं. नथुराम गोडसे हिंदू महासभेचे अविभाज्य भाग होते. आता भाजप आणि संघ गोडसे यांना बाजूला सारून गांधी हत्येविषयीचे सर्व श्रेय स्वत: घेऊ पहात आहेत. गांधी यांना गोडसे यांनी मारले नाही, असे सिद्ध केले, तर हिंदू महासभेला काहीच अर्थ उरणार नाही, हे त्यांना माहीत आहे; पण आम्ही हे कदापी होऊ देणार नाही, अशी चेतावणी हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी दिली आहे. ‘गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांना ४ गोळ्या लागल्या होत्या; पण चौकशीत तीनच गोळ्यांचा उल्लेख आहे. चौथ्या गोळीचा उल्लेखच नाही. त्यामुळे त्याचे अन्वेषण करण्यात यावे,’ अशी मागणी करणारी याचिका ‘अभिनव भारत’चे संस्थापक पंकज फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर अशोक शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात माजी अतिरिक्त महाधिवक्ता अमरेंद्र शरण यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.