कुठे गुरुपौर्णिमेसाठी अर्पण देऊन धनाचा त्याग करणारे अर्पणदाते, तर कुठे अर्पण देण्यासाठी अर्पणदात्यांना अतीआग्रह करून स्वतःच्या साधनेची अधोगती करून घेणारे कार्यकर्ते !

‘गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने अर्पणदात्यांकडे जाऊन अर्पण गोळा करण्याची सेवा करतांना विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांकडून झालेल्या अक्षम्य चुका पुढे दिल्या आहेत.

१. हितचिंतकांना अर्पण देण्यासाठी अतीआग्रह केल्याने त्यांनी व्यक्त केलेली तीव्र प्रतिक्रिया !

संभाजीनगरमधील श्रीमती जयश्री मुळ्ये यांनी एका परिचित जिज्ञासूला अर्पण देण्याच्या संदर्भात पुष्कळ आग्रह केला, त्यामुळे त्या जिज्ञासूंनी याविषयी अन्य एका साधकाजवळ नाराजी व्यक्त केली.

२. ‘तुमच्या सांपत्तिक स्थितीला शोभेल, एवढे अर्पण द्या’, असे जिज्ञासूंना सांगणे

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील सौ. सुशीला देशपांडे वैयक्तिक संपर्काला गेल्या होत्या. कार्याविषयी माहिती सांगितल्यावर त्या जिज्ञासूने ‘किती अर्पण देऊ ?’, असे विचारले. तेव्हा सौ. देशपांडे यांनी ‘तुम्हाला शोभेल एवढे अर्पण द्या’, असे म्हटले.

३. अधिक प्रमाणात गहू अर्पण देण्यासाठी महिलेला आग्रह केल्याने ती रागावणे

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. शुभांगी कुलकर्णी अर्पण गोळा करण्याच्या सेवेला गेल्या होत्या. एका महिलेने एक वाटी गहू अर्पण दिल्यावर त्यांनी ‘एक किलो तरी गहू अर्पण द्या. एवढेच का देता ?’, असे म्हटले. परिणामी ती महिला ‘अशा प्रकारे मागितलेले आम्हाला आवडत नाही’, असे रागावून म्हणाली.

४. विज्ञापनदात्यांना अधिक रकमेचे विज्ञापन देण्यासाठी आग्रह केल्याने त्यांनी ‘यापुढे मी विज्ञापन देणार नाही’, असे सांगणे

पंढरपूर येथील सौ. सुनीता बट्टेवार यांनी एका विज्ञापनदात्यांना अधिक रकमेचे विज्ञापन देण्यासाठी आग्रह केला. तेव्हा विज्ञापनदात्यांनी ‘तुम्ही विज्ञापन देण्यासाठी आग्रह केला, तर यापुढे मी विज्ञापन देणार नाही’, असे म्हटले.

५. वाचकांचे नातेवाईक मृत झाल्याचे कळूनही त्यांच्याकडे अर्पण मागणे

मुंबईतील एक वाचक प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला अर्पण देतात. सौ. सुशीला होनमारे यांना वाचकांच्या घरी नातेवाईक मृत झाल्याचे कळूनही त्यांनी यजमानांना अर्पण आणण्यासाठी वाचकांकडे पाठवले.

अशा प्रसंगांत साधकांनी संवेदनशीलता बाळगून ‘अशी चूक पुन्हा होणार नाही’, याची काळजी घ्यावी.

६. समाजातील व्यक्तींनी संस्थेला अर्पण देण्याचा उद्देश कार्यकर्त्यांनी क्षणोक्षणी स्मरणात ठेवणे आवश्यक !

व्यावहारिक व्यस्ततेमुळे धर्मकार्यासाठी तन आणि मन यांचा त्याग करू न शकणार्‍या अनेक हितचिंतकांच्या मनात संस्थेविषयी आदरभाव आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची तळमळ असते. धनाच्या त्यागाद्वारे तरी या कार्यात सहभागी होता यावे, यासाठी ते अतिशय त्यागी वृत्तीने आणि निरपेक्षपणे अर्पण अथवा विज्ञापने देतात. त्या माध्यमातून त्यांची साधना होते; परंतु आग्रही भूमिका ठेवून त्यांना दुखावणार्‍या अन् साधकत्व नसलेल्या अशा कार्यकर्त्यांची साधनेत मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे.

अशा प्रकारे दबावात्मक आणि आग्रहपूर्वक बोलून अर्पणदाते अन् विज्ञापनदाते यांना दुखावणार्‍या कार्यकर्त्यांचे या सेवेसाठी जाण्याचे नियोजन उत्तरदायी साधकांनी यापुढे करू नये. कोणताही जिल्हा अथवा राज्य यांमध्ये अशा प्रकारच्या गंभीर चुका झाल्या असल्यास संबंधित अर्पणदाते अथवा विज्ञापनदाते यांची चांगल्या साधकाने क्षमा मागण्याचे नियोजन उत्तरदायी साधकांनी करावे.

आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या अक्षम्य चुका होत असल्याचे निदर्शनाला आल्यास त्या संदर्भात त्वरित प्रसारसेवकांना कळवाव्यात आणि रामनाथी आश्रमात [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवाव्यात.’

साधकांनो, प्रत्येक चूक आपल्याला ईश्‍वरापासून दूर नेते हे जाणून चुका टाळा !