संघटित हिंदूंचे सीमित यश !

पुण्यातील चिंचवडजवळील देहु-आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या प्रवेशद्वारावरील मोशी गावात पुन्हा एकदा होऊ घातलेला तरुणांना विकृत आणि व्यसनी बनवणारा, आपल्या तेजस्वी संस्कृतीला झाकोळायला निघालेला ‘सनबर्न’ महोत्सव महाराष्ट्र राज्य पर्यटन खात्याला रहित करावा लागला. पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी हा कार्यक्रम मोशी गावातून का होईना रहित केला आहे. सनबर्न कार्यक्रम करणार्‍यांचा भारतात ५ वर्षे कार्यक्रम करण्याचा करार आहे. त्यामुळे मोशीतून अन्य ठिकाणी त्याचे स्थलांतर झाले आहे, असाच त्याचा प्रत्यक्ष अर्थ आहे. यातून दोन गोष्टी पुढे आल्या आहेत. सर्व स्तरांवरील हिंदू संघटित झाले आणि त्यांनी नियोजनबद्धरित्या आणि वैध मार्गाने संस्कृतीवरील अशा आक्रमणांना विरोध केला आणि सातत्याने तो चालू ठेवला, तर एकना एक दिवस सरकारला त्याची नोंद घ्यावी लागते. यापूर्वी या महोत्सवाला अनुमती मिळण्याची प्रक्रिया पूर्ण न होऊनही हिंदूंच्या प्रचंड विरोधानंतरही महाराष्ट्र शासनाने हिंदुत्वनिष्ठांना आश्‍वासन देऊनही हा महोत्सव मागे घेतला नाही. एकप्रकारे हिंदुत्वनिष्ठांचा विश्‍वासघातच करण्यात आला. पू. संभाजी भिडेगुरुजींनी ‘५ सहस्र तरुणांसह विरोध करू’, असे सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना महोत्सव मागे घेण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. शिवसेना आणि भाजप यांच्या स्थानिक आमदारांनीही महोत्सवाचे दुष्परिणाम लक्षात आल्याने हिंदुत्वनिष्ठांना पाठिंबा दिला होता. ‘यापूर्वीच्या तुलनेत या वेळी हिंदू हे संस्कृतीरक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी, भावी पिढी भरकटू नये, यासाठी वैध मार्गाने महोत्सवाला विरोध करत आहेत’, हे लक्षात आल्यानवर सरकारने नियोजित स्थळी तो होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. शिकण्याचे सूत्र म्हणजे भारतातून हा महोत्सव हद्दपार करण्यासाठी धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना किती मोठ्या प्रमाणात वैध मार्गाने लढा द्यावा लागणार आहे, याचीही कल्पना येते.

या यशातून प्रेरणा घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी आता भारतात कुठेच हा कार्यक्रम होणार नाही, यासाठी कंबर कसली पाहिजे. सनबर्न कायमचा रहित झाला, तर भारताची संस्कृती उद्ध्वस्त करण्याच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राला मोठा धक्का पोहोचेल. हिंदू संघटित झाले, तर काय होऊ शकते, हे हिंदूंच्या विरोधात षड्यंत्र रचणार्‍यांना कळेल आणि अर्थात्च हिंदुत्वनिष्ठांची समष्टी साधना होईल. मागील कार्यक्रमाच्या वेळी आयोजकांच्या विरोधात मद्य अल्प देणे, बिसलरी विकणे या संदर्भात गुन्हे प्रविष्ट झाले आहेत आणि त्यांना खनिकर्म विभागाची अनुमती न घेतल्याविषयी आणि जागेचा करारनामा न नोंदवल्याविषयी १ कोटीपेक्षा अधिक रुपयांचा दंडही झाला आहे. हिंदूंनी निवडून दिलेल्या शासनानेही केवळ महसूलप्राप्ती हा उद्देश न ठेवता देशाच्या भावी पिढीच्या रक्षणासाठी कठोर पाऊल उचलावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.