‘तोकडे’ विचार !

राजकारणात ताळतंत्र सुटले की काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी सध्या करत असलेली वक्तव्ये. ‘संघात किती महिला आहेत ? संघाच्या शाखांवर महिलांना हाफ पॅन्टमध्ये पाहिले आहे का ?’, असे अतिशय अश्‍लाघ्य वक्तव्य त्यांनी केले. सध्या हे महाशय गुजरातच्या दौर्‍यावर आहेत. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी राहुल गांधी यांना अनेक संधी मिळाल्या; मात्र या संधीचा त्यांना लाभ उठवता आला नाही. आता तर पक्षातील काही वरिष्ठ नेतेही त्यांच्या क्षमतेविषयी उघड टीका करू लागले आहेत. एकूणच राजकारणात ते किती तग धरू शकतील, याविषयी शंकाच आहे. एवरी सुटीसाठी विदेशात जाणारे राहुल गांधी पुन्हा एका गुजरातमधील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि संघ यांच्यावर बोचरी टीका करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात; मात्र तसे करतांना मर्यादेचे पालन हवे. त्यांनी संघावर केलेल्या टीकेतून त्यांच्यातील नीतीहीनतेचे, संस्कृतीशून्यतेचे प्रदर्शन घडले. संघ परिवारासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी दुर्गा वाहिनी कार्यरत आहे. हे राहुल गांधी यांना ज्ञात नाही का ? ज्या महिला तोकडी वस्त्रे परिधान करतात, त्या म्हणजे ‘आधुनिक’, ‘मुक्त वातावरणात वावरणार्‍या’, असे गांधी यांना म्हणायचे आहे का ? राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी या सामाजिक जीवनात वावरतांना साडी परिधान करतात. ‘त्या आधुनिक नाहीत’, असे राहुल गांधी यांना म्हणायचे आहे का ? महिलांमधील स्वैराचाराविषयी संस्कृतीप्रेमींनी एखादी मोहीम हाती घेतल्यावर काँग्रेसवाले अनेक वेळा त्यांना ‘महिलांना काय परिधान करावे आणि करू नये’, हे त्यांना शिकवू नये. स्त्रियांच्या पेहरावावरून त्यांचे चारित्र्य ठरवू नये’, असे सल्ले देतांना दिसतात. हाच सल्ला आता काँग्रेसवाले राहुल गांधी यांना देणार का ? मुख्य सूत्र म्हणजे बुरखा घालणार्‍या मुसलमान महिलांना ‘बुरखा त्यागून स्कर्ट्स घाला’, असा सल्ला देण्याचे धारिष्ट्य ते दाखवतील का ? संघाला स्त्रीद्रोही रेखाटण्यासाठी त्यांनी स्वतःच्या तोकड्या मानसिकतेचे प्रदर्शन घडवले. असा नेता ज्या पक्षाला दिशदर्शन करतो, तो पक्षाचे भवितव्य अंधारमयच असणार, यात शंका नाही !

स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक जिंकण्याची धमक राहुल गांधी यांच्यात नाही. त्यामुळे जनतेला भाजप आणि संघ यांच्याविरोधात चिथावून ती मते काँग्रेसकडे वळवण्याचा घाट त्यांनी घातला आहे. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांनीही गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मोदी यांना ‘मौत के सौदागर’ म्हटले होते. त्या निवडणुकीत मोदी यांना गुजरातमध्ये अभूतपूर्व यश मिळाले आणि काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. बहुदा राहुल गांधी यांना या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची इच्छा दिसते. सूज्ञ जनतेने अशा वाचाळविरांना का निवडून द्यावे ? असे अपरिपक्व नेते जनतेचे काय भले करणार ? जनताच अशा नेत्यांना आता घरी बसवेल !