अनेक सण, उत्सव आणि व्रते यांद्वारे देवतांची कृपा प्राप्त करून घेेण्याची शिकवण देणार्‍या अन् मानवाचे आयुष्य समृद्ध आणि आनंदी करणार्‍या आश्‍विन मासाचे महत्त्व !

 १. आश्‍विन मासातील महत्त्वपूर्ण सण

‘आश्‍विन मासात शारदीय नवरात्र, विजयादशमी, कोजागिरी पौर्णिमा, वसुबारस (गुरुद्वादशी), धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, तसेच इंद्र, कुबेर आणि लक्ष्मी यांचे पूजन हे महत्त्वाचे सण आहेत.

१ अ. देवीचे नवरात्र : आश्‍विन शुक्ल प्रतिपदेपासून चालू होणार्‍या नवरात्र काळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’ असेही म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. राम आणि रावण यांच्या युद्धाच्या वेळी रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्रीत देवीपूजन केले होते.

१ आ. नवरात्र व्रताचे प्रकार : नवरात्रात पुढील ५ व्रते आहेत.

१. प्रतिपदा ते नवमी : ९ दिवसांचे संपूर्ण नवरात्री व्रत

२. प्रतिपदा ते सप्तमी : सप्तरात्री व्रत

३. पंचमी ते नवमी : ५ रात्री व्रत

४. सप्तमी ते नवमी : ३ रात्री व्रत

५. केवळ अष्टमी : १ दिवसाचे व्रत

२. तिथीनुसार आश्‍विन मासातील दिवसांचे महत्त्व

३. विजयादशमी

या दिवशी प्रभु रामचंद्राने रावणाचा वध केला. ‘वाईट प्रवृत्तीवर सत् प्रवृत्ती विजय मिळवते’, ही गोष्ट दर्शवणारा हा दिवस आहे. विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांनी या दिवशी घराबाहेर पडून विजयश्री खेचून आणली होती. असा हा आनंदाचा दिवस कोणतेही शुभकार्य करण्यास योग्य दिवस आहे.

४. कोजागिरी पौर्णिमा

४ अ. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री कुबेरादी देवतांचे पूजन करणे : संपत्ती मिळवणे, तिचा संग्रह करणे आणि तिचा योग्य उपयोग करणे, यांसाठी निरोगी आयुष्य लाभणे आवश्यक आहे. या सर्व घटकांसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र यांची पूजा करतात.

५. दीपावली

आश्‍विन मासातील नवरात्र, दसरा आणि कोजागिरी संपली की, कृष्ण पक्षात द्वादशीपासून अमावास्येपर्यंत अन् कार्तिक प्रतिपदा आणि द्वितीया अशी एकूण सहा सणांची एकत्र गुंफण म्हणजे ‘दीपावली’ असते. सर्व राज्यांत उत्साहाने साजरा होणारा संपूर्ण वर्षभरातला हा एक सण आहे.

५ अ. वसुबारस : दिवाळीचा आरंभ ‘वसुबारस’पासून होतोे. भारत कृषीप्रधान देश असल्याने शेती, मानवी आरोग्य, संस्कार आदींचा विचार करून सर्वांत मोठ्या सणाच्या वेळी गोमातेचे स्मरण करत तिची पूजा करणे, ही एक प्रकारची कृतज्ञताच आहे.

५ आ. धनत्रयोदशी : ‘धनत्रयोदशी’ म्हणजे एकत्रित तीन सण होत. समुद्र मंथनातून प्राप्त झालेले अमृत हे ‘१४ वे रत्न’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी त्यातील धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी श्री लक्ष्मी, विष्णु, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्ये यांची पूजाही करतात. या दिवशी यमधर्माला दीपदान करण्याची प्रथा चालू झाली आहे.

५ इ. नरक चतुर्दशी : नरकासुराच्या वधानंतरचा आनंदोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे.

५ ई. लक्ष्मीपूजन : दिवाळीतील अमावास्येच्या दिवशीची ही महत्त्वाची पूजा असते. ही पूजा जेवढी ऐश्‍वर्ययुक्त असेल, तेवढी श्री लक्ष्मी त्या घरावर प्रसन्न होते आणि तेथे नित्य निवास करते. श्री लक्ष्मीमातेची यथासांग पूजा झाल्यावर तिला फळे अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो. नंतर आरती करतात आणि शेवटी प्रसादासह आनंदही वाटला जातो.

दिव्याने दिवा लावत दिव्याची ओळ लावणे, म्हणजे दीपावली (दीप + आवली (रांग)), दिवाळी ! दिवाळी म्हणजे एकमेकांचा आनंद वृद्धींगत करण्याची नामी संधी आहे. अशा दीपावली सणासाठी अनेक शुभेच्छा !’

– श्री. चिंतामणी देशपांडे (गुरुजी)

(संदर्भ : मासिक ‘शिवमार्ग’, दसरा २०१६)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now