बिहार शिक्षण विभागाच्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश असल्याचा उल्लेख !

बालमनात देशद्रोहाचे बीज पेरणारा बिहार शिक्षण विभाग ! या देशद्रोहासाठी सरकार उत्तरदायींवर तात्काळ कारवाई करील का ?

पाटलीपुत्र (पाटणा) – येथे इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश असल्याचा उल्लेख करून त्या अनुषंगाने प्रश्‍नही विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाची ही अक्षम्य चूक वैशाली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यानेच लक्षात आणून दिली.

बिहारमध्ये ५ ऑक्टोबरला परीक्षा चालू झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या ‘सर्व शिक्षा अभियाना’च्या अंतर्गत या परीक्षा घेण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या ‘बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काऊन्सिल’ (बीईपीसी) या संस्थेवर परीक्षांच्या नियोजनाचे दायित्व आहे. त्यांनी इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सिद्ध केलेल्या प्रश्‍नपत्रिकेत ‘चीन, नेपाळ, इंग्लंड, काश्मीर आणि भारत येथील रहिवाशांना काय म्हणतात ?’, असा प्रश्‍न विचारण्यात आला आहे.

याविषयी ‘बीईपीसी’चे प्रकल्प अधिकारी प्रेमचंद यांनी ‘ही खूपच गंभीर गोष्ट आहे; परंतु ही छपाईतील चूक आहे’, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. शिक्षण अधिकारी संगीता सिन्हा यांनी ‘या प्रकाराची नोंद घेतली जाईल’, असे सांगितले.