खिलाफत ते रोहिंग्या : मुसलमान समाजच कायम आरोपी का ?

‘रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ भारतात काही ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत, तर काही मुसलमान नेत्यांकडून राष्ट्रहिताचा विचार न करता रोहिंग्यांसाठी काही मागण्यादेखील केल्या जाऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभुमीवर मुसलमानांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या मानसिक जडणघडणीचा मागोवा घेणारा हा लेख !

१. मुसलमान आणि इस्लामी आज्ञा

भारतीय मुसलमानांच्या मनात रोहिंग्या मुसलमानांविषयी येत असलेला कळवळा पाहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्यांच्या Thoughts on pakistan (पाकिस्तानविषयी विचार) या पुस्तकातील काही ओळी आठवल्या. ते म्हणतात, ‘‘कोणत्याही संघर्षात मुसलमानांनी मुसलमानेतरांची बाजू न घेण्याची इस्लामी आज्ञा असणे, हाच ‘पॅन इस्लाम’चा आधार आहे. भारतातील मुसलमान स्वत:ला ‘मुसलमान आधी आणि मग भारतीय’ असल्याचे समजतात, त्यामागील कारणही हेच आहे. भारतीय मुसलमानांच्या याच जनभावनेमुळे भारताच्या प्रगतीत त्यांचा सहभाग अत्यल्प आहे, तर दुसरीकडे मुसलमान देशांच्या दु:स्थितीविषयी ते नेहमीच आक्रमक भूमिका घेतात. यासमवेतच मुसलमानांच्या मनात मुसलमान देशांना पहिले स्थान असून भारताला गौण मानले जाते. ‘एक मनुष्य एक मत’ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तत्त्व म्हणजे लोकशाही असलेला हिंदूबहुल देश ! या आधारावर भारत हा मुसलमान देश होऊ शकत नाही आणि त्यामुळेच इस्लाम मुसलमानांना या देशात राहू देण्यास मज्जाव करतो. इस्लाम खर्‍या मुसलमानाला भारत ही त्याची मातृभूमी आहे, हे मानण्याचा अधिकार देत नाही.’’

२. हिंदू-मुसलमान यांच्या अविश्‍वासामागील पार्श्‍वभूमीचा विचार आवश्यक !

‘सरफरोश’ नावाच्या एका चित्रपटात ए.सी.पी. अजय राठोड नावाचे पात्र एका प्रसंगात ‘मेरे मुल्क को बचाने के लिए मुझे किसी सलीम की जरूरत नही है ।’ असा धारदार संवाद त्यातील सलीमच्या तोंडावर फेकून मारते. या बॉलिवूड चित्रपटात या निमित्ताने हिंदू आणि मुसलमान यांच्यामधील अविश्‍वासाच्या नेहमीच्या प्रश्‍नाला थेट हात घातला गेला होता. ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याची सक्ती असो, राष्ट्रगीताला उभे न रहाण्यासारख्या घटनांची बातमी असो, गोमांसावरून घडलेली हिंसक घटना असो किंवा अगदी एखाद्या इमारतीमध्ये ‘मुसलमान आहे’; म्हणून सदनिका नाकारण्याची घटना असो; पुरोगामी आणि मुसलमान समाजाकडून नेहमी विचारला जाणारा प्रश्‍न आहे – ‘मुसलमान समाजच आरोपी का ?’

या प्रश्‍नाचे उत्तर शोधतांना आपल्याला इतिहास आणि वर्तमानकाळातील अनेक घटना आणि पार्श्‍वभूमी यांचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांत आधी असा वाद आणि संशय मुसलमानेतर समाजाच्या मनात मुसलमानांविषयी आहे, हे मान्य करू.

मुसलमानांच्या मानसिकतेवर वि.दा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी अलीकडे शेषराव मोरे यांच्यापर्यंत अनेक विचारवंतांनी विपुल आणि सडेतोड लेखन केले आहे. त्यातून बर्‍याच गोष्टींचा उहापोह झाला आहे. ते सर्व लेखन अधिक जिज्ञासूंनी मुळातूनच वाचणे (विशेषतः मुसलमानांनी वाचणे) अत्यंत आवश्यक आहे.

३. मुसलमानांच्या विभाजनवादी वृत्तीतच भारताच्या फाळणीचे बीज !

भारतीय उपखंडातील मुसलमानांच्या मनात फार पूर्वीपासून ‘पॅन इस्लाम’ नावाच्या भुताने ठाण मांडलेले आहे. ‘सर्व जगातील मुसलमान एक असून, त्यांचे एकमेकांशी नाते आहे’, अशी ती सर्वसाधारण ढोबळ कल्पना आहे. (वेळोवेळी पॅलेस्टाईन किंवा रोहिंग्या यांच्यासाठी प्रेमाचा उमाळा फुटतो, तो याच संकल्पनेतून !) इतिहासात या ‘पॅन इस्लाम’च्या संकल्पनेला चूड लावत, जेव्हा ‘अता उल तुर्क’ याने तुर्कस्तानमधून इस्लामचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणजे ‘खलिफा’चे पद खालसा केले, तेव्हा तत्कालीन भारतीय मुसलमानांनी खलिफाच्या समर्थनार्थ भारतात खिलाफत चळवळ चालू केली. या परकीय देशांतील घटनांवरून इथे भारतातील केरळमध्ये मोपल्यांच्या बंडात झालेल्या हिंदूंच्या हत्यांनी त्या वेळेपर्यंत ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’ म्हणत ब्रिटिशांशी हिंदी राष्ट्रासाठी एकत्र लढणार्‍या बर्‍याच हिंदु नेत्यांचे डोळे उघडले. त्यात लाला लजपतराय, लाला हरदयाळ, वि.दा. सावरकर अशा कित्येक नेत्यांचा समावेश होता. त्या वेळेपर्यंत कट्टर काँग्रेसी असलेल्या डॉ. हेडगेवारांनी वेगळी चूल मांडत हिंदू हिताचे ध्येय ठेवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना वर्ष १९२५ मध्ये केली. यानंतर या खिलाफत चळवळीतूनच रुजलेल्या बिजाची परिणती म्हणून पुढे भारताची फाळणी घडून पाकिस्तानचा जन्म झाला. मुसलमान आणि हिंदू ही दोन राष्ट्रे आहेत, हे अधोरेखित करणारी ही ठळक घटना होती.

४. हिंदू आणि मुसलमान यांत वेगळेपण निर्माणहोण्यास ‘सेक्युलर’ म्हणवले जाणारे नेते कारणीभूत !

स्वतःच्या वेगळेपणाचे भूत त्यानंतरही मुसलमान समाजाच्या मानगुटीवरून उतरले आहे का ? तर अजिबात नाही. याला पहिला चूड लावला गेला, तो स्वातंत्र्य मिळाल्यावर मुसलमान समाजासाठी वेगळ्या कायद्यांची मागणी करून ! घटना समितीच्या सदस्यांसमोर या आधुनिक भारताची घटना बनवण्याचे आव्हान जेव्हा समोर उभे राहिले, तेव्हा त्यांच्यापुढे जगातील लोकशाही देशांतील राज्यघटना आदर्श होत्या. त्या राज्यघटना धर्मांवर आधारित नाहीत. त्या धर्मविरहित एकसंध समाज निर्माणाचा पाया रचणार्‍या आहेत, हे बाबासाहेब आंबेडकरांनी मनोमन ओळखले होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करतांना या सगळ्या गोष्टींची काटेकोरपणे काळजी घेतली होती; परंतु मुसलमानांचे वेगळेपण टिकावे; म्हणून इस्लाम धर्माधारित कायद्यांचा हट्ट तत्कालीन मुसलमान नेत्यांनी धरला. यात मौलाना आझादांसह सर्व तथाकथित ‘सेक्युलर’ समजले जाणारे नेते सामील होते. तिथून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये जे वेगळेपण निर्माण झाले ते आजपर्यंत आहे. या वेगळेपणाचाच परिपाक म्हणजे शहाबानो प्रकरण. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फेटाळून लावत मुसलमानांना ‘खुश’ करणारी ही घटना या देशातील बहुसंख्य हिंदूंच्या मनात रोष निर्माण करणारी होती. (पण या कायद्यांमुळे एकाच वेळी स्वतंत्र झालेल्या आणि एकेकाळी अंधारात ढकललेल्या हिंदू आणि मुसलमान समाजातील महिलांच्या आजच्या स्थितीमधील भेद सर्वांच्या समोर आहे.)

५. इस्लामी राष्ट्रांतच असुरक्षित असलेले मुसलमान !

ज्या फुटीरतावादी मानसिकतेतून ‘पॅन इस्लाम’ची स्वप्ने आपल्याला पडतात, ते किती भोंगळ आहे, हे मुसलमानांनी सर्वप्रथम समजून घेण्याची आवश्यकता आहे. भारतीय मुसलमानांच्या मनात इस्लामची जन्मभूमी असल्यामुळे ‘सॉफ्ट कॉर्नर’ मिळालेला सौदी अरब आपल्याला पिढ्यान्पिढ्या रहिवास करूनही ‘बेटी व्यवहार’ तर सोडा; पण एक इंच भूमी खरेदी करण्याची अनुमती तरी देतो का, हे कधी आपण आपल्या मनाला विचारले आहे का ? मुसलमानांसाठी निर्माण केलेल्या पाकिस्तानात हिंदू तर सोडा; पण शिया, अहमदी, हाजरा मुसलमान तरी सुरक्षित आहेत का ? पाकिस्तानच्या पंजाबी मुसलमानांनी ३० लाख बंगाली मुसलमानांची हत्या केली, तेव्हा त्यामागे संघ, यहुदी, अमेरिका होती का ? जगभरात मुसलमान राष्ट्रांतून मुसलमान नागरिकच निर्वासित होतात, तेव्हा त्या मुसलमानांसाठी पैशाने ‘गब्बर’ असलेल्या मुसलमान राष्ट्रांनी त्यांचे दरवाजे ‘पॅन इस्लाम’च्या नावाखाली उघडले का ? ज्या पॅलेस्टाईनसाठी आपला जीव तुटतो, त्या पॅलेस्टिनींवर रणगाडे घालतांना जॉर्डनच्या मुसलमान शासकाने ‘पॅन इस्लाम’चा विचार केला का ?

६. मुसलमान समाजाविषयी इतरांचे मत का कलुषित झाले आहे, याचा त्यांनीच विचार करावा !

भारतात हिंदू बहुसंख्य असून काश्मीर खोर्‍यामधून हिंदू निर्वंश केले गेले, तरी त्याची झळ इतर राज्यांतील मुसलमानांना बसली का ? हिंदूंनी संख्येच्या बळावर आजपर्यंत देशांतील कायद्यांना वाकवले का ? बहुसंख्य हिंदूंना त्यांच्यासाठी कुठलेही विशेषाधिकार नको आहेत; पण ‘इतर कुणालाही धर्मावर आधारित विशेष अधिकार नको’ ही त्यांची भूमिका आहे. ‘सर्वांना समान अधिकार हवेत’, हीच हिंदूंची भूमिका आहे. या देशांतील मुसलमान तुर्की मुसलमानांप्रमाणे राष्ट्रवादी असावेत हीच हिंदूंची भूमिका आहे. यावर आपण आपली हट्टी धार्मिक भूमिका सोडली आहे का ? इंटरनेट, वृत्तपत्र, निरनिराळ्या वृत्तवाहिन्या यांमुळे गेल्या काही वर्षांत जग म्हणजे एक खेडे बनले आहे. ‘अमेरिकेत काय घडले’, ‘बर्सिलोनामध्ये काय घडले’, ‘ढाकामध्ये काय घडले’, हे सगळ्या जगाला केवळ एका क्लिकवर कळू लागले आहे. या जगभरातील घटना लोक पहातात आणि त्यानुसार आपापली मते बनवत आहेत. जगात या क्षणाला कुठलीही आतंकवादी घटना घडली, तर सामान्य व्यक्तीच्या प्रतिक्रियांमध्ये सर्वप्रथम संशय व्यक्त केला जातो, तो मुसलमान समाजावर हे सत्य आहे. मुसलमान समाज जगातील ज्या ज्या देशात रहातो, त्या त्या देशात अल्पसंख्य असल्यावर विशेष अधिकारांची मागणी, कायद्यात पालट, स्वतंत्र राष्ट्राची मागणी आणि प्रसंगी त्यासाठी हिंसक होणे, कायद्याला आव्हान निर्माण करणे यामुळे मुसलमान समाजाविषयी संशय आणि अविश्‍वासाची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे कधी मुसलमानांनी तपासले आहे का ? जगात कुठेही मुसलमान आतंकवाद्यांकडून हिंसक घटना घडल्यावर मुसलमान समाजाची नेहमीची गुळगुळीत प्रतिक्रिया म्हणजे ‘हा खरा इस्लाम नाही’, ही असते. तसेच संबंधित घटना भारतात घडलेली असेल, तर संघ; अमेरिकेत घडलेली असेल, तर ट्रम्प किंवा बुश; युरोपात घडलेली असेल, तर यहुदी समुदाय यामागे असून ‘ते लोक मुसलमानांची प्रतिमा वाईट करण्याच्या प्रयत्नात आहेत’, हे सांगून बचाव केला जातो. आता पाणी गळ्यापर्यंत आले आहे, याची जाणीव मुसलमान समाजाला अद्याप झालेली नाही, असे वाटते.

७. जिहादी आतंकवादाविषयी मुसलमान समाजाने बाळगलेले मौन सोडावे !

पाणी गळ्यापर्यंत कसे आले, याची छोटीशी चुणूक म्हणून उदाहरण बघा. अफगाणिस्तानात फक्त पाच-पंचवीस जिहादी अतिरेकी मारण्यासाठी अमेरिका १० सहस्र टनचा बॉम्ब नागरिकांमध्ये टाकते किंवा म्यानमार सरकार पाच-दहा लाख मुसलमान नागरिकांना रातोरात निर्वासित करते, तरीही कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर म्हणावी तशी चिंता व्यक्त केली जात नाही. जगभर मुसलमान आतंकवाद्यांकडून घडणार्‍या घटनांनी इतर समाज मुसलमानांप्रती हळूहळू उदासीन झाल्याचे दिसते. ही वेळ आपल्यावर का आली आहे, तसेच आतंकवादी म्हणजे मुसलमानच, हे समीकरण का बनले आहे ? याचा विचार करायला कोणीच मुसलमान विचारवंत अद्याप सिद्ध नाही.

याचे आपल्या देशातील प्रतिबिंब बघायचे म्हटले, तर भारतात संख्येने अत्यल्प असलेला म्हणजे लाखभर लोकसंख्या असलेला धर्मसमुदाय म्हणजे ‘पारशी’. या पारशी समाजाला आजपर्यंत कोणी बहुसंख्येच्या बळावर देशभक्ती सिद्ध करण्याची सक्ती केल्याचे ऐकिवात नाही; परंतु संख्येने सर्वाधिक म्हणजे जवळपास १७ कोटी असलेल्या मुसलमानांवर मात्र देशभक्तीचे ‘सर्टीफिकेट’ दाखवण्याचे प्रसंग वेळोवेळी आल्याचे ऐकायला मिळते. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुसलमान समाजाचे दीर्घ मौन ! धार्मिक कडवेपणातून मुसलमान समाजात सिद्ध होणारे मूठभर जिहादी, त्यांच्या जगभर चालणार्‍या हिंसक कारवाया आणि त्याविषयी बहुसंख्य मुसलमान समाजाने धारण केलेले मौन यांमुळे हे अतिरेकी हेच सर्व मुसलमान समाजाचे प्रतिनिधी असल्याचे चित्र जगभर उभे राहिले आहे. तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, ‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाच्या कार्यालयावरील आक्रमण आदी प्रकरणांतून इस्लामचा असहिष्णु चेहरा जगासमोर आला आहे. यात ‘अनपढ’ मुसलमान सोडा, पण उच्चशिक्षित मुसलमानदेखील धर्मांधतेने वागत असल्यामुळे दीडशे कोटी मुसलमान समाजावर आरोपी म्हणून उभे रहाण्याची वेळ वेगवेगळ्या देशांत आली आहे.

८. मुसलमानांची हिंदूंना भीती का वाटते ?

जगात बहुतांश धर्मांची स्थापना सहस्र-शेकडो वर्षांपूर्वी झाल्यामुळे त्या काळातील परिस्थितीतीला अनुसरून काही कायदे आणि धार्मिक रूढी बनवल्या गेल्या. बदलत्या काळात लोकशाही राज्यांत त्यातील काही प्रथा आणि रूढी अमानुष असंस्कृत म्हणून गणल्या जातात, हे सत्य आहे. त्या काळानुरूप पालटणे आवश्यक आहे. माजी राष्ट्रपतींना पायउतार झाल्यावर भीतीदायक वाटणारा हिंदू बहुसंख्य असलेला भारत हा सहिष्णु देश आहे का ? पारशी, यहुदी, अहमदी, शिया अशा जगभरात छळ भोगून आलेल्या निर्वासितांना खुल्या आणि मोकळ्या वातावरणात जगण्याचा अधिकार देणारा भारत निःसंशय सहिष्णु देश आहे. या देशाइतका वैविध्य असलेला प्रदीर्घ सांस्कृतिक ठेवा इतर कुठल्याही देशांत नाही; परंतु मुंबई बॉम्बस्फोटातील दोषीच्या अंत्ययात्रेला होणारी सहस्रोंची गर्दी येथील बहुसंख्य हिंदु समाजाला भयभीत करणारी असते. कुठल्यातरी देशात मुसलमानांवर अत्याचार झाल्याचे निमित्त करून काढलेला सहस्रोंचा मोर्चा जेव्हा पोलिसांना मारहाण करून ‘अमर ज्योती’ची तोडफोड करतो, तेव्हा येथील बहुसंख्य हिंदु समाजाच्या मनात भीती उभी रहाते. देशभरात आजपर्यंत मुसलमान आतंकवाद्यांनी केलेली आक्रमणे, घडवलेले बॉम्बस्फोट, काश्मीरमधील हिंदु पंडितांची हत्या, अमरनाथ यात्रेतील हिंदूंवर होणारी आक्रमणे, म्यानमारमधील घटनेच्या निषेधार्थ बोधगयेमध्ये झालेले बॉम्बस्फोट अशा कितीतरी घटनांची सूची येथील बहुसंख्य हिंदु समाजाला भयभीत करते आणि संशय घ्यायला भाग पाडते. त्यातूनच ‘मेरे देश को बचाने के लिए किसी सलीम की जरूरत नही है’, अशा संवादांचा जन्म होतो.

९. भारतीय मुसलमानांनी त्यांच्या निष्ठा उघड करणे आवश्यक !

हे सगळे पालटायचे, तर आता भारतीय मुसलमानांनी कुराण कि राज्यघटना ? भूमीपुत्र छत्रपती शिवाजी कि तुर्की औरंगजेब ? गंगा-यमुना संस्कृती कि अरब संस्कृती ? अशा कित्येक प्रश्‍नांवर बहुसंख्येने नि:संग्दिग्ध भूमिका मांडणे अत्यावश्यक आहे. इसिस, अल्-कायदा यांचा इस्लाम खरा नाही, तर शांतताप्रिय म्हणून संबोधला जाणारा खरा इस्लाम काय आहे, ते कृती आणि उक्तीतून दाखवले पाहिजे. आपला आदर्श डॉ. अब्दुल कलाम आहेत कि याकुब मेमन हे कृती आणि उक्ती यांतून दाखवले पाहिजे. भारतीय राज्यघटनेलाच आव्हान निर्माण करत आहोत, असे सार्वजनिक वर्तन जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. त्यात मशिदींवरील भोंग्यांचा विषय असो किंवा अगदी तीन तलाक सारखा महत्त्वाचा विषय असो. यावर मोकळेपणाने चर्चा करत आपले हित कशात आहे, ते स्वीकारण्याची सिद्धता ठेवली पाहिजे. पंधरा मिनिटांत हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या तथाकथित नेत्यांनी आपली छोटीशी कृती किंवा वक्तव्य यांचा फटका आपल्या संपूर्ण समाजाला बसतो, याची जाणीव ठेवली पाहिजे. त्याशिवाय पुरातन अनिष्ट धार्मिक प्रथांना फाटा देत वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून आधुनिक शिक्षण घेत एकविसाव्या शतकाकडे इतर धर्मसमुदायांसमवेत हातात हात घालून चालले पाहिजे.

पॅन इस्लाम, गज्वा-ए-हिंद, दार-उल-हरब सारख्या खुळचट कल्पनांना तिलांजली देत ‘भारतीय राज्यघटना सर्वोच्च आणि भारतीय हिंदू, बौद्ध, शीख हेच सर्वांत जवळचे आप्त’ ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. अनोळखी असलेले पॅलेस्टीनी रोहिंग्या यांच्यासाठी रस्त्यावर येण्यापेक्षा आपल्या राष्ट्राच्या हितासाठी, बामियानमधील बुद्ध मूर्ती तोडणारे तालिबानी किंवा ढाक्यात हिंदूंचे मुडदे पाडणार्‍या जिहाद्यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे.’

– तुषार दामगुडे (दैनिक सकाळ (१४.७.२०१७))

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now