समीर कुलकर्णी यांना ९ वर्षांनंतर जामीन संमत

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

निरपराध  श्री. समीर कुलकर्णी यांना केवळ जामीन देण्यावर न थांबता त्यांना आणि अन्य आरोपींना यातून निर्दोेष म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे ! ज्या अन्वेषण अधिकार्‍यांनी खोट्या आरोपांखाली श्री. समीर कुलकर्णी यांना ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले आणि त्यांच्या आयुष्यातील ही वर्षे वाया घालवली, त्या अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे आणि या अधिकार्‍यांकडून श्री. समीर कुलकर्णी यांना हानीभरपाई दिली गेली पाहिजे, अशी सर्वत्रच्या हिंदूंची मागणी आहे !

श्री. समीर कुलकर्णी (मध्यभागी)

मुंबई – वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एक संशयित श्री. समीर कुलकर्णी यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने जामीन संमत केला. न्यायालयाने त्यांची ५० सहस्र रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर आतंकवादविरोधी पथकाने श्री. कुलकर्णी यांना भोपाळ येथून अटक केली होती.

२९ सप्टेंबर २००८ या दिवशी सायंकाळी मालेगाव येथील नुराजी मशिदीजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक घायाळ झाले होते. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ४ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले होते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि स्वामी दयानंद पांडे यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, श्री. सुधाकर चतुर्वेदी, श्री. सुधाकर द्वीवेदी आदींना न्यायालयाने यापूर्वीच जामीन संमत केला आहे.