सर्वांचेच सण प्रदूषणमुक्त हवेत !

देहलीसह एनसीआर येथे प्रदूषणामुळे फटाके विकण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे, हा अत्यंत स्तुत्य निर्णय आहे. पूर्वीपासूनच शासनाने भयावह प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले असते, तर आज ही वेळ आली नसती. उशिरा का होईना, हा चांगला निर्णय आला आहे. गेल्या वर्षी काढलेला हा आदेश कालांतराने उठवावा लागला. अशी वेळ परत येऊ नये, यासाठी शासन काय काळजी घेणार आहे, हेही समजणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांनाच या संदर्भात आंदोलन करायला लावून हे धोरण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा शासन प्रयत्न करत आहे. सनातन गेली १३ वर्षे फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी व्यापक जनजागृती करत आहे. फटाके हा आपल्या संस्कृतीतील मूळ घटक नाही. दिवाळीच्या सर्व दिवशी करावयाचे धर्माचरण महत्त्वाचे आहे; ते प्रत्येकाने यथायोग्य केले, तर कुणाला फटाके वाजवण्याची इच्छाही होणार नाही; परंतु शासन प्रबोधन न करता कायदा करते आणि असे कायदे केवळ हिंदूंनाच लागू होतात अन् अन्य धर्मियांना त्यातून सूट मिळते. हा पक्षपातीपणा म्हणजेही धर्मनिरपेक्ष राज्यातील हिंदूंवरील तो अन्यायच ठरतो. त्यामुळे फटाक्यांच्या विरोधातील निर्णयानंतर चेतन भगत यांनी ‘ईदला रक्त सांडले जाऊ नये आणि ख्रिसमसला ‘ट्री’ बनवले जाऊ नये, असे कुणी का म्हणत नाही ?’, असा प्रश्‍न ट्वीट करून विचारला आहे. हिंदूंच्या मनातील ही अन्यायाची भावना दूर करणे आवश्यक आहे !