साधकांनो, भावभक्तीची शिदोरी देऊन आपल्या अंतरंगात आमूलाग्र पालट घडवून आणणार्‍या भावसत्संगाचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. साधनेत भाववृद्धीचे महत्त्व

१ अ. भावाला अनन्यसाधारण महत्त्व असणे : साधकाच्या स्वभावातील स्व म्हणजे अहं काढून टाकल्यावर जो शेष रहातो, तो भाव होय. भावाविना साधकाचे जीवन अपूर्ण आणि अधुरे रहाते. भावाचे महत्त्व लक्षात घेऊन गुरुदेवांनी भावजागृतीचे प्रयत्न करण्यावर नेहमीच भर दिला आहे.

१ आ. भगवंताचे अस्तित्व अनुभवता येऊन आनंद मिळू लागणे : भावावस्थेत रहाणे, म्हणजेच भगवंताचे अस्तित्व नित्य अनुभवणे ! हे आनंदप्राप्तीचे सहजसोपे माध्यम आहे. साधकांना भगवंताचे अस्तित्व ठायी ठायी अनुभवता येऊ लागले की, त्यांचे अवघे जीवनच सुंदर होते. साधकाला प्रत्येक कृतीतून आनंद मिळू लागतो. भगवंताच्या अनंत गुणांचा प्रत्यय येऊ लागला की, जीव विस्मयचकीत होऊन भावविभोर होतो. भगवंताच्या अनंत गुणांचे, त्याच्या अनंत अनुभूतींचे भांडार पाहिल्यावर आपण किती क्षुुद्र आहोत, याची जाणीव वाढून साधकाचा अहं न्यून होऊ लागतो.

२. भावाचा अभाव झाल्याने साधकांच्या साधनेची होणारी दयनीय स्थिती !

साधनेतील भाव या घटकाचे बर्‍याच साधकांना विस्मरण होते. देव केवळ भावाचा भुकेला आहे, हे लक्षात न घेता ते कार्याकडे ओढले जातात. सतत कार्याचा विचार आणि त्याकडेच अधिक लक्ष दिल्याने त्यांचे व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होते. साधनेची घडी विस्कटल्याने कर्तेपणा घेणे, स्वकौतुक वाटणे आदी अहंचे पैलू वाढत जातात. त्यामुळे त्यांना सेवेतून आनंद मिळत नाही. कुणी चुका लक्षात आणून दिल्या, तर त्यांना सेवेचा ताण येतो आणि सेवा नकोशी वाटू लागते. त्यामुळे हळूहळू साधनेत अधोगती होऊ लागते. यासाठी सर्वच साधकांनी भावाचे प्रयत्न मनापासून करणे आवश्यक असते.

३. भगवंताने साधकांना दिलेली सुंदर भावभेट – भावसत्संग !

भावसत्संग आरंभूनी श्री गुरूंनी दिली सर्वांस आनंदाची देण ।

साधकहो, आता अखंड भावविश्‍वात रमूनी फेडावे गुरुऋण ॥

भावाच्या अभावामुळे आध्यात्मिक उन्नतीत अडथळे येऊ नयेत; म्हणून गुरुदेवांनी भावजागृतीची अनेक माध्यमे साधकांना उपलब्ध करून दिली आहेत. त्यातीलच एक अत्यंत परिणामकारक माध्यम म्हणजे भावसत्संग ! साधकांमध्ये भावबिजाचे रोपण होऊन त्यांनी साधनेतील आनंद अनुभवावा, यासाठी ५.१०.२०१६ या दिवसापासून भगवंताने सर्व साधकांना भावसत्संगरूपी भावभेट दिली आहे. सप्ताहातून एकदा होणारा हा भावसत्संग साधकांना पूर्ण आठवडाभर भावविश्‍व अनुभवण्यासाठी दिशादर्शन करतो. भावप्रयत्नांमुळे साधनेत काही काळाने येणारा यांत्रिकपणा दूर होण्यास साहाय्य होऊ लागते. भारतभरातील अडीच सहस्र साधक या सत्संगाला उपस्थित राहून भावानुभूतींची देवाण-घेवाण करून भावानंद अनुभवत आहेत.

४. भावसत्संगामुळे साधकांमध्ये होत असलेले काही पालट

४ अ. व्यष्टी साधनेच्या स्तरावर

४ अ १. प्रयत्नांत नियमितता येणे : साधकांकडून प्रार्थना आणि कृतज्ञता अधिक भावपूर्ण होत आहेत. सेवा करतांना मनात येणारे विचार उणावल्यामुळे एकाग्रता साध्य होत आहे. नामजप भावपूर्ण आणि एकाग्रतेने होत आहे. स्वयंसूचना सत्र करणे, सारणी लिहिणे आदी व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत नियमितता येत आहे. स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांवर भावाच्या स्तरावर मात करता येत असल्याने साधनेतील उत्साह वाढत आहे.

४ अ २. बुद्धीचा अडथळा न्यून होणे : कोणत्याही अडचणींवर बुद्धीने विचार करणे, हा काही साधकांचा स्वभावच बनला होता; पण देवाचे साहाय्य घेतल्यावर सर्वकाही सोपे आणि सहजतेने होते, ते अनुभवता आल्याने बुद्धीचा अनावश्यक वापर करण्याचा भाग उणावला आहे. भावसत्संगामुळे बुद्धीचा अडथळा न्यून होऊन भावाचा ओलावा निर्माण होत आहे.

४ अ ३. कठीण प्रसंगातून लवकर बाहेर पडता येणे : बरेच साधक विविध कठीण प्रसंग, प्राप्त परिस्थिती यांत अडकून स्वतःच्या मनावर परिणाम करून घेत होते; परंतु आता भावाच्या स्तरावर प्रयत्न चालू केल्याने त्यांना त्या स्थितीतून लवकर बाहेर पडता येऊ लागले आहे.

४ अ ४. भावप्रयत्नांविषयी सकारात्मकता येणे : मला भावजागृतीचे प्रयत्न करायला जमणार नाहीत. तो माझा मार्गच नव्हे, असा विचार करणार्‍या साधकांना भाव अनुभवता आल्याने त्यांच्या आनंदात वाढ झाली आहे. अल्पावधीतच साधकांमधील भावाविषयीची नकारात्मकता अल्प होऊन सकारात्मता वाढत आहे. अशा प्रकारचा पालट होणे, हा काही साधा चमत्कार नव्हे, तर हा भावचमत्कार आहे, असे म्हणावे लागेल.

४ अ ५. स्वप्रगतीविषयीची चिंता दूर होणे : पूर्वी काही साधकांना आपली प्रगती होईल का ?, अशी चिंता वाटायची. भावसत्संगात श्री गुरूंवरील श्रद्धा वाढवण्याच्या संदर्भात सांगितल्यानंतर साधकांनी तसे प्रयत्न चालू केले. त्यामुळे मनातील स्वप्रगतीचे विचार हळूहळू न्यून होत आहेत.

४ अ ६. कृतज्ञताभाव वाढणे : सहसाधक आणि उत्तरदायी साधक यांच्या साहाय्याविषयी कृतज्ञताभाव निर्माण होत असून त्यांच्याविषयी असलेल्या अपेक्षांचे प्रमाण न्यून होऊ लागले आहे. निर्जीव वस्तूंप्रती भाव वाढल्याने त्यांची हाताळणी भावपूर्ण होत आहे.

४ अ ७. गुरूंवरील श्रद्धा वाढणे : प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनुसार होत आहे, याची जाणीव वाढत आहे. भाव ठेवून सेवा केल्याने अडचणींवर मात करता येते, म्हणजे गुरुच सर्व अडचणी सोडवतात, याच्या अनुभूती येत आहेत. गुरु क्षणोक्षणी आपली काळजी घेणार, अशी दृढ श्रद्धा निर्माण होत आहे.

४ आ. साधकांच्या समष्टी सेवेची फलनिष्पत्ती वाढणे

४ आ १. त्रासांवर मात करून सेवारत रहाण्याचा प्रयत्न होणे : शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांची त्रासांवर मात करून सेवारत रहाण्याची धडपड वाढल्याचे लक्षात येत आहे.

४ आ २. ताणरहित सेवा होऊ लागणे : बर्‍याच साधकांना सेवेत चुका झाल्यावर पुष्कळ ताण येऊन सेवा करू नये, असे वाटत असे. भावसत्संगामुळे आनंदप्राप्तीसाठी साधना हे सूत्र मनावर बिंबल्याने ताणविरहित सेवा करता येऊन सेवेतून आनंद मिळत आहे.

४ आ ३. चुकांचे प्रमाण उणावणे : मिळालेली सेवा गुरुसेवाच आहे, या भावाने कशी करायची, ते समजल्याने ती साधना म्हणून होत आहे. मनातील प्रतिक्रिया आणि अनावश्यक विचार यांचे प्रमाण उणावल्यामुळे सेवेतील चुकांचे प्रमाण अल्प होत आहे आणि अधिक आनंद मिळत आहे.

४ इ. पूर्णवेळ साधनेसाठी मनाचा निश्‍चय होणे : काही साधकांची पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेण्याची मनाची सिद्धता होत नव्हती. भावाच्या स्तरावरील प्रयत्न वाढल्याने पूर्णवेळ साधना करण्यासाठी त्यांच्या मनाचा निर्धार होण्यास साहाय्य झाले.

५. गुरुदेवांप्रती कृतज्ञता

भावसत्संग चालू करण्यामागील गुरुदेवांचा संकल्प फलद्रूप होत असल्याने साधकांमध्ये अल्पावधीत परिवर्तन होत आहे. साधकांमध्ये भावाची निर्मिती करणार्‍या, भाव जागृत होतील, अशा अनेक अनुभूती देणार्‍या आणि साधकांना भावसागरात डुंबवून भावानंद अनुभवायला देणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच आहे.

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (६.९.२०१७)

साधकांनो, भावसत्संगात नियमित उपस्थित रहा !

भावसत्संगाच्या माध्यमातून भगवंत करत असलेले मार्गदर्शन अनमोल आहे. गुरुदेव साधकांच्या प्रगतीसाठी देत असलेल्या या भावसत्संगाला अनुपस्थित रहाणे, म्हणजे त्या सत्संगाप्रती मोल नसल्याप्रमाणेच आहे. सर्वत्रच्या साधकांनी प्रत्येक सप्ताहातील भावसत्संगाला नियमित उपस्थित राहून भावजागृतीच्या प्रयत्नांत सातत्य राखावे आणि त्या माध्यमातून गुरुकृपेचा वर्षाव अनुभवावा !