समाजप्रबोधन करणारा ‘हलाल’ चित्रपट बंद पाडू इच्छिणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करा ! – राष्ट्रविकास सेनेचे जिल्हाधिकार्‍यांंच्या नावे निवेदन

सांगली, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – समाजात पालट होण्याच्या दृष्टीने आणि प्रबोधन या अनुशंगाने ‘हलाल’ हा क्रांतीकारी चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक, सर्व कलाकार यांनी जीव ओतून समाजातील अपप्रवृत्ती संपून समाज जागृती व्हावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात समाजातील वाईट प्रवृत्तींची धाडसाने मांडणी केली आहे. असे असतांना या चित्रपटास काही संघटनांकडून बंद पाडण्याची धमकी मिळत आहे. तरी हा चित्रपट बंद पाडू इच्छिणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि चित्रपटास संरक्षण देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ९ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रविकास सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांच्या नावे देण्यात आले आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांनी स्वीकारले. या वेळी राष्ट्रविकास सेनेचे राज्याध्यक्ष आमोस एस्. मोरे (दादा) यांसह अन्य उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसंगी राष्ट्रविकास सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ‘हलाल’ चित्रपटास विरोध करणार्‍या अपप्र्रवृत्तींना जशास तसे उत्तर देतील. या वेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास याचे संपूर्ण दायित्व प्रशासनावर असेल.

या संदर्भात आमोस एस्. मोरे (दादा) म्हणाले, ‘‘हलाल हा चित्रपट समाज परिवर्तन करणारा आणि अनिष्ट रूढी संपवणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पहावा, असे आवाहन राष्ट्रविकास सेना आणि त्यांचे पदाधिकारी संस्थापक श्री. सुधाकरराव गायकवाड, वर्षा कोळी, सिद्धु गायकवाड, सागर पाटील, सचिन जनवाडे, हमीद शेख, सचिन शिंगे यांच्या वतीने करण्यात येत आहे.’’

‘हलाल’ या चित्रपटात मुसलमानांमधील ‘हलाला’ या कुप्रथेविरुद्ध आवाज उठवण्यात आला आहे. तलाक मिळालेल्या मुसलमान महिलेला पुन्हा पहिल्या पतीशी संसार करायचा असेल, तर दुसर्‍या पुरुषासमवेत लग्न करून तलाक मिळवावा लागतो. यामुळे स्त्रीचे आयुष्य इतरांच्या हातचे खेळण्यासारखे होते, हे सांगण्यासाठी या चित्रपटाची योजना आहे.


Multi Language |Offline reading | PDF