मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा

मुंबईसारख्या मोठ्या शहरातील महानगरपालिकेची ही दुःस्थिती असेल, तर अन्य महानगरपालिकांचा विचारच न केलेला बरा !

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मागील १० मासांपासून रुग्णालयात औषधांचा पुरवठा झालेला नाही. या प्रकरणावरून स्थायी समितीने प्रशासनाला धारेवर धरले असता औषधांचा पुरवठा करण्यास दिरंगाई झाल्याचे प्रशासनाने मान्य केले. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करावी आणि त्याविषयीची माहिती येत्या

१५ दिवसांत स्थायी समितीत सादर करावी, असे निर्देश दिले आहेत. औषधांसाठी १२० कोटी रुपयांचा प्रस्ताव सिद्ध असतांनाही औषधांना विलंब  होण्यामागचे कारण काय, हा महत्त्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गेल्या स्थायी समितीच्या सभेत याविषयीचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी असे प्रस्ताव रखडवणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी दिल्या होत्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत तशा प्रकारचा प्रस्ताव २७ सप्टेंबरला पुन्हा स्थायी समितीच्या सभेत मान्यतेसाठी आणला. यामुळे प्रशासन अध्यक्षांचे आदेश जुमानत नाहीत का ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. (जे अधिकारी लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत, ते जनतेशी कसे वागत असतील ? जनतेच्या जीवाशी खेळणार्‍या अशा अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाल्यास अन्य कोणी असे करू धजावणार नाही ! – संपादक) या घटनेची चौकशी करून येत्या सभेत त्याची माहिती दिली जाईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय.एल्. कुंदन यांनी या वेळी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now