मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २७ प्रवाशांचा मृत्यू

प्रवाशांचा नाहक बळी जाऊ देणारा एकमेव देश भारत ! यावरून प्रवाशांसाठीची व्यवस्था किती ढिसाळ आहे, हे लक्षात येते !

मुंबई – येथील परळ-एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकाच्या पुलावर २९ सप्टेंबरला सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ३२ हून अधिक प्रवासी गंभीर घायाळ झाले आहेत. घायाळ झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम्, टाटा आणि वाडिया रुग्णालयांमध्ये भरती केले आहे. काही घायाळांची स्थिती गंभीर असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळी १०.३० वाजण्याच्या वेळी मध्य मुंबईत पाऊस चालू होता. त्यामुळे अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. त्या वेळी परळ आणि एल्फिन्स्टन दोन्ही स्थानकांवर एका पाठोपाठ एक रेल्वे गाड्या येत होत्या आणि पुलावरची गर्दी वाढतच होती. अतिशय अरुंद पुलावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेच्या पुलावर होते. या वेळी पूल कोसळल्याची अफवा पसरल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वाढत्या गर्दीनुसार प्रवाशांसाठी नवीन पूल बांधण्याचे रेल्वेप्रशासनाला का सुचत नाही कि आणखी अशा घटना घडण्याची वाट ते पहात आहेत ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर सरकार कठोर कारवाई करणार का ? – संपादक)

या घटनेनंतर राज्यशासनाने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपये हानी भरपाई देण्याचे घोषित केले आहे. तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

या घटनेविषयी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF