सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

विद्यापिठातील आरोग्य केंद्र तसेच परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

पुणे – येथे २६ सप्टेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील आरोग्य केंद्र तसेच परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) तिरडी आंदोलन, तर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने भीक मागा आंदोलन केले. (आरोग्यासारख्या संवेदनशील विषयासंदर्भात गांभीर्य वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागणे, हे विद्यापीठ प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)

१. या आंदोलनांत आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा वाढाव्यात, केंद्राला रुग्णवाहिका मिळावी आणि आरोग्यप्रमुख डॉ. शशिकांत दुधगावकर यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी अभाविपने केली, तर रिपाई विद्यार्थी परिषदेने रुग्णवाहिकेसमवेतच परीक्षा आणि मूल्यमापन विभागातील कर्मचार्‍यांची पुनर्मूल्यांकनातून गुणवाढीच्या प्रकरणी सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी केली.

२. अभाविपचे प्रदेश महामंत्री राम सातपुते आणि विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम कंधारे यांनी म्हटले की, विद्यापिठाच्या आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध नसून विद्यार्थी आजारी पडल्यावर त्यांना देण्यासाठी औषधांचा साठा नाही. केंद्रात ज्या औषधी उपलब्ध आहेत त्यांची मुदत कालबाह्य झाली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना आरोग्य केंद्रातून इतर रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला प्राण गमावावा लागू शकतो. केंद्रात चोवीस तास ओपीडीची सुविधाही उपलब्ध नसून, डॉ. दुधगावकर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची गांभीर्यांने दखल घेत नाही.

३. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात रुग्णवाहिका घेण्यासाठी पैसे जमा करण्यात आले. तसेच जमा झालेली भीक आणि प्रतिकात्मक स्वरूपातील खेळण्यातील रुग्णवाहिका विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. करमळकर यांना भेट देण्यात आली. डॉ. करमळकर यांनी या प्रकरणात त्वरित निर्णय न घेतल्यास त्यांना फिरू देणार नाहीत. वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधातही आंदोलन करू अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.

४. डॉ. करमळकर यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, आरोग्य केंद्रात येत्या काही दिवसांत चार डॉक्टरांची आणि नर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच रुग्णवाहिका खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, लवकरच ती केंद्रात उपलब्ध होईल.


Multi Language |Offline reading | PDF