डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनाविषयी ५ ऑक्टोबरला निर्णय

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी

पुणे, २८ सप्टेंबर (वार्ता.) – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी २८ सप्टेंबरला झाली. या वेळी या प्रकरणातील संशयित आरोपी तथा सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनावर दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तीवाद झाला. डॉ. तावडे यांच्या वतीने जामीन मिळण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्त्या (कु.) नीता धावडे यांनी, तर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) वतीने जामिनाला विरोध म्हणून अधिवक्ता मनोज चालाडे यांनी युक्तीवाद केला. या वेळी डॉ. दाभोलकर कुटुंबियांच्या वतीने मध्यस्थी म्हणून अधिवक्ता अभय नेवगी यांनी लेखी युक्तीवाद न्यायालयात सादर केला. हा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी डॉ. तावडे यांच्या जामिनावरील अंतिम सुनावणीचा निर्णय ५ ऑक्टोबरला होणार आहे, असे सांगितले. या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी एस्.आर्. सिंह उपस्थित होते, तसेच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना उपस्थित करण्यात आले होते.

या सुनावणीच्या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिवक्ता मनोज चालाडे यांनी युक्तीवाद करतांना सांगितले, हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचा बेंगळुरू फॉरेन्सिक प्रयोगशाळेने दिलेला अहवाल अयोग्य असून त्या गोळ्या सीबीआय स्कॉटलंड यार्डच्या प्रयोगशाळेत पाठवणार होते; परंतु ते पाठवू न शकल्याने आता त्या गोळ्या गुजरातच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या खंडपिठाने तपासाच्या याचिकेच्या सुनावणीच्या कालावधीत आदेश दिले होते की, बेंगळुरू प्रयोगशाळेचा अहवाल जिल्हा न्यायाधीश यांनी केवळ वाचावा. त्याविषयी फार प्रश्‍न विचारू नयेत आणि त्यातील मजकूर गुप्त ठेवावा. या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिवक्त्यांनी तो अहवाल न्यायालयात सादर करत हा अहवाल जामिनाचे आवेदन फेटाळण्यास वापरावा; परंतु अहवालात काय आहे, याचा कुठलाही उल्लेख किंवा कारणमीमांसा आदेशात घेऊ नये, असे सांगितले. त्यावर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी डॉ. तावडे यांच्या विरोधात नेमका काय पुरावा आहे, हे डॉ. तावडे यांना न सांगता तो त्यांच्या विरोधात वापरला जाणार आहे का ?, असा प्रश्‍न डॉ. तावडे यांच्या वतीने उपस्थित केला.


Multi Language |Offline reading | PDF