म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याची नागा आतंकवाद्यांवर कारवाई

 तळ उद्ध्वस्त  अनेक आतंकवादी ठार

नवी देहली – भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर कारवाई करून नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालॅण्ड (खापलांग) या बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. यात अनेक आतंकवादी ठार झाले आहेत; मात्र नेमके किती आतंकवादी ठार झाले, याची माहिती मिळू शकली नाही. या कारवाईमध्ये भारतीय सैन्याची कोणतीही हानी झालेली नाही, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त प्रथम प्रसारित झाले होते; मात्र हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ नव्हता, असे सैन्याने स्पष्ट केले. तसेच भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कारवाई केलेली नाही, असे प्रवक्त्यांनी सांगितले.

भारत-म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याचे पथक गस्त घालत असतांना लांग्खू गावात आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. २७ सप्टेंबरच्या पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी ही चकमक झाली.

आतंकवादी संघटना एन्एस्सीएन् (के)

नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालॅण्ड (खापलांग) अर्थात एन्एस्सीएन् (के) या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख एस्.एस्. खापलांग आहे. तो म्यानमारमधील नागा नेता आहे.

या संघटनेचे बहुतांश तळ म्यानमारमध्येच आहेत. या संघटनेने जून २०१५ मध्ये मणिपूरमध्ये केलेल्या आक्रमणात भारतीय सैन्याचे १८ सैनिक हुतात्मा झाले होते. यानंतर भारतीय सैन्याने म्यानमार सीमेमध्ये प्रवेश करून या संघटनेच्या २० आतंकवाद्यांना ठार केले होते.


Multi Language |Offline reading | PDF