हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा आमच्या डोक्यावरील बोजा ! – पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांची स्वीकृती

जे पेरले ते उगवले ! आता अंगलट आल्यावर त्याची स्वीकृती कशाला ?

न्यूयॉर्क – पाकमधील काही लोक आमच्या डोक्यावरील बोजा झाले आहेत. हे लोक एकट्या पाकसाठीच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी डोकेदुखी ठरत आहेत. याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. मीदेखील यावर सहमत आहे, अशी स्वीकृती पाकचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकमधील आतंकवाद्यांविषयी येथे एका कार्यक्रमात दिली. ‘हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा, पाकसाठी बोजा आहेत, हे मी मान्य करतो; मात्र त्यांचा सामना करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या. त्यांचा नायनाट करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा आमच्याकडे नाही’, असेही ते म्हणाले. (आसिफ यांच्याकडे यंत्रणा नाही कि ते त्यांच्यावर कारवाई करू इच्छित नाहीत ? – संपादक) ख्वाजा आसिफ यांनी याआधीही पाकमध्ये आतंकवादी संघटना सक्रीय असल्याचे म्हटले होते. या कार्यक्रमानंतर प्रश्‍नोत्तरांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ख्वाजा आसिफ यांना ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेविषयी प्रश्‍न विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या संघटनेचा उल्लेख केला आहे, त्या संघटनेवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्या संघटनेच्या प्रमुखाला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे; मात्र या संघटनेवर व्यापक कारवाई व्हायला हवी, या तुमच्या मताशी मी सहमत आहे. या संघटनेच्या विरोधातील कारवाई तीव्र करायला हवी, असे मलाही वाटते; मात्र यासाठी आणखी थोडा वेळ लागेल.’’


Multi Language |Offline reading | PDF