पाकच्या कारवाया चालूच राहिल्या, तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू ! – जनरल बिपीन रावत यांची चेतावणी

पाकच्या कारवाया अनेक वर्षे चालू आहेत आणि त्यात आतापर्यंत शेकडो सैनिक हुतात्मा झाले आहेत. तसेच अशा प्रकारच्या धमक्यांना पाक भीक घालत नाही, हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे जनरल रावत यांनी आता प्रत्यक्ष कृती करावी, अशी जनतेला अपेक्षा आहे !

यापूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे विशेष काही साध्य झालेले नाही. त्यामुळे रावत यांनी सर्जिकल स्ट्राईक करण्याऐवजी पाकला पूर्णपणे कसे संपवणार, हे सांगून तशी धडक कृती करावी !

नवी देहली – सीमेवर पाकच्या कारवाया चालूच राहिल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, अशी चेतावणी सैन्यदल प्रमुख बिपीन रावत यांनी पाकला दिली आहे.  गेल्या वर्षी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण होत आहे.

पाककडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीचे प्रयत्न याविषयी रावत यांना विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, आतंकवाद्यांना येत राहू द्या, आपण त्या सगळ्यांना भूमीत गाडू. देशहित लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. यात आम्ही सक्षम आहोत.

रावत पुढे म्हणाले की, आपल्या देशात इतिहासाचा लवकर विसर पडतो. इतिहासातील नोंदी आपल्याकडे जतन केल्या जात नाहीत. भविष्यात सैनिकांंच्या कामगिरीची दखल घेतली जाईल आणि त्यांच्या शौर्यकथांचा समावेश शालेय पुस्तकांमध्ये होईल, अशी आशा वाटते.


Multi Language |Offline reading | PDF