पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सौभाग्य’ योजनेचे उद्घाटन

प्रत्येक घरात वीज देणार असल्याची मोदी यांची घोषणा

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीनदयाल ऊर्जा भवनाचे २५ सप्टेंबरला येथे लोकार्पण केले. या वेळी त्यांनी ‘सौभाग्य योजने’चे उद्घाटन करत प्रत्येक घरात वीज देणार असल्याची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत देशातील सुमारे ४ कोटी जनतेला मोफत वीज उपलब्ध होणार आहे.

३१ मार्च २०१९ पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागांतील घराघरात वीज पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सौभाग्य योजनेनुसार वर्ष २०११ च्या आर्थिक जणगणनेतील गरिबांना मोफत वीजजोडणी मिळणार आहे. जनगणनेत नाव नसणार्‍यांना ५०० रुपये भरून वीजजोडणी करता येईल. वीज उपलब्ध नसलेल्या घरांसाठीही सौभाग्य योजनेत तरतूद करण्यात आली आहे. या घरांना मोफत ‘सोलर पॅक’ देण्यात येतील. या सोलार पॅकमध्ये ५ एलईडी बल्ब आणि १ पंखा असेल.

सौभाग्य योजनेत बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि ईशान्येतील राज्यांचा समावेश आहे. सौभाग्य योजनेसाठी १६ सहस्र ३२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामीण भागात वीज पोहोचवण्यासाठी १४ सहस्र २५ कोटी, तर शहरी भागासाठी १ सहस्र ७३२ कोटी रुपये व्यय (खर्च) करण्यात येणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF