पोलिसांनी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याने हिंसाचार

बनारस हिंदु विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकरण

विद्यापिठातील विद्यार्थिनींची छेडछाड केली जात असतांना निष्क्रीय रहाणार्‍या पोलिसांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाई केली पाहिजे आणि यापुढे एकाही विद्यार्थिनीची कोणी छेड काढण्याचे धाडस करणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे, हीच हिंदूंची अपेक्षा !

वाराणसी – बनारस हिंदु विद्यापिठामध्ये विद्यार्थिनींशी होणार्‍या छेडछाडीच्या विरोधात चालू असलेेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यावर लाठीमार केल्यामुळे २३ सप्टेंबरच्या रात्री विद्यापिठाच्या आवारात हिंसाचार झाला. या हिंसक घटनांमुळे विद्यापीठ २ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आले आहे.

रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुलगुरु जी.सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थांवर सुरक्षारक्षकांनी लाठीमार केला. (धर्मांधांच्या विरोधात शेपूट घालणारे पोलीस विद्यार्थ्यांवर मात्र मर्दुमकी गाजवतात ! – संपादक)

त्यात अनेक विद्यार्थी घायाळ झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दगडफेक करण्यास प्रारंभ केला. यामध्ये अनेक सुरक्षारक्षकही घायाळ झाले. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सर सुंदरलाल रुग्णालयात घुसून दगडफेक केली. (रुग्णालयात घुसून तोडफोड करणारे विद्यार्थी देशाचे आदर्श नागरिक कधीतरी होऊ शकतील का ? – संपादक) हिंसक झालेल्या विद्यार्थ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड चालू केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच हवेत बंदुकीच्या १८ फैरी झाडल्या.

या घटनेच्या चौकशीसाठी कुलगुरूंनी एका समितीची स्थापना केली आहे.  गेल्या ३ वर्षांत दुसर्‍यांदा बनारस हिंदू विद्यापिठातील विद्यार्थिनी सुरक्षेच्या प्रश्‍नावरून रस्त्यावर उतरल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF