संयुक्त राष्ट्रांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला खडसावले

स्वातंत्र्यानंतर भारताने प्रगती केली, तर पाक आतंकवादी देश बनला !

आता भारताने युद्धाच्या भूमीवरही पाकला असाच धडा शिकवून त्याला वठणीवर आणले पाहिजे !

न्यूयॉर्क – भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाले. भारताने प्रगती केली; पण आतंकवादी देश म्हणून स्वतःची ओळख निर्माण का झाली, हा विचार पाकने कधी केला आहे का ? अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत खडसावले. एक दिवस आधी पाकचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांनी भारताला ‘मानवाधिकाराचा शत्रू’ असे म्हटले होते. त्यावर सुषमा स्वराज यांनी पाकला सुनावले.

सुषमा स्वराज यांनी पाकला खडसावतांना मांडलेली सूत्रे

१. ज्या देशाने आतंकवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत, तो देश येथे आम्हाला अहिंसा अन् मानवता शिकवत होता.

२. आम्ही गरिबीशी लढत आहोत; पण पाकिस्तान आमच्याशी लढत आहे.

३. ज्या वेळी येथे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी मानवतेवर बोलत होते, तेव्हा प्रत्येकजण ‘कोण बोलत आहे ते पहा’ असे बोलत होते.

४. पाकिस्तानला तोंड देतांना आम्ही देशाच्या विकासात कोणतीही हयगय केली नाही. आम्ही आयआयटी उभारले, आयआयएम् उभारले, अंतरिक्षात पोहोचलो; पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिदीन, हक्कानी नेटवर्क बनवले. आम्ही वैज्ञानिक बनवलेे, तर तुम्ही आतंकवादी आणि जिहादी बनवले.

५. जो पैसा तुम्ही आतंकवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात, तर तुमच्या लोकांचे भले होईल, त्यांचा विकास होईल.

६. संयुक्त राष्ट्रांना आतंकवाद ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या विरोधात लढण्यासाठी आपली एकजूट झाली पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने आतंकवादाकडे पहाणे थांबवले पाहिजे.

७. आम्ही केवळ आमच्याच सुखाचा आणि आनंदाचा विचार करत नाही, तर आमची संस्कृती सगळे जग सुखी व्हावे, असा विचार करते.

काँग्रेसने केलेले कार्य मान्य केल्याविषयी सुषमा स्वराज यांना धन्यवाद ! – राहुल गांधी यांचे ट्वीट

नवी देहली – संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत स्वराज यांचे आभार मानले आहेत. ‘आयआयटी आणि आयआयएम्ची स्थापना करण्यामागचे काँग्रेसचे व्हिजन मान्य केल्यासाठी धन्यवाद’, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. (राहुल गांधी हे स्वतःच काँग्रेसचे परिपक्व नेते नसल्याचे दाखवून देत असतात, याचे उदाहरण ! आयआयटी आणि आयआयएम् या संस्थांची स्थापना देशवासियांसाठी शासकीय तिजोरीतून व्यय करून करण्यात आली. या संस्था गांधी यांना त्यांची खाजगी संपत्ती वाटते का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF