महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित ‘सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारी मूर्ती घडवणे’ हा शोधनिबंध सादर

कोलंबो येथे ‘कला आणि मानवता’ या विषयावर चतुर्थ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

शोधनिबंध सादर करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

कोलंबो (श्रीलंका), २३ सप्टेंबर (वार्ता.) – २१ आणि २२ सप्टेंबर या दिवशी श्रीलंकेतील ‘द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’ यांच्या वतीने कोलंबो येथे ‘कला आणि मानवता’ या विषयावर चतुर्थ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेला ‘सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारी मूर्ती घडवणे’ (Creating an Idol that Emits Positive Vibrations) या विषयावरील शोधनिबंध पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी सादर केला.

या परिषदेचा प्रारंभ २१ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता दीपप्रज्वलनाने झाला. त्या वेळी श्रीलंकेतील ‘द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. इसांका पी. गमेज हे प्रमुख पाहुणे, तर कॅनडा येथील काँकोर्डिया विद्यापिठातील ‘काँकोर्डिया लॅपटॉप ऑर्केस्टा’चे संचालक डॉ. एलडॅड टासबरी हे अध्यक्षस्थानी होते. या परिषदेत फिलीपिन्स, टर्की, इराण, मलेशिया, कॅनडा, श्रीलंका, भारत, अमेरिका, कतार, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, युनायटेड किंग्डम, इंडोनेशिया, बांगलादेश, यु.ए.ई., तैवान आणि थायलंड या देशांतील ६४ जण सहभागी झाले होते.

उपकरणांपेक्षा सूक्ष्म ज्ञानाद्वारे आपण अधिक सखोल ज्ञान प्राप्त करू शकतो ! – पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

हा शोधप्रबंध सादर करतांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी श्री गणेशाच्या विविध प्रचलित मूर्तींच्या तुलनेत श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्तींची ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञान आणि ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या ऊर्जा आणि प्रभावळ मापक यंत्रांचा वापर करून लक्षात आलेली वैशिष्ट्ये विशद केली. या मूर्तीच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे विविध टप्पे, तसेच सात्त्विक मूर्तींचे मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांना आलेल्या अनुभूती यांविषयी माहिती दिली. सात्त्विक मूर्तीच्या निर्मितीविषयी सांगतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् म्हणाल्या, ‘‘गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून मिळालेल्या सूक्ष्म ज्ञानाद्वारे निर्माण केलेली मूर्तीच सात्त्विक असू शकते. त्यामुळे आपण उच्च आध्यात्मिक पातळीच्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे आवश्यक आहे.’’

 क्षणचित्रे

१. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी समयमर्यादेत प्रभाविपणे विषय मांडणे : परिषदेत आयोजक वेळेच्या संदर्भात अत्यंत काटेकोर होते. १५ मिनिटांचा कालावधी प्रत्येक वक्त्याला देण्यात आला होता. त्यातील १३ मिनिटे होताच एक घंटा वाजायची आणि १५ मिनिटे होताच २ घंटा वाजायच्या अन् माईकचा आवाज बंद व्हायचा. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी त्यांचा विषय १५ मिनिटांच्या समयमर्यादेत प्रभावीपणे मांडला.

२. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी मांडलेले ज्ञान नाविन्यपूर्ण असणे : पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘पॉवरपॉईंट’ या संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने मांडलेली सर्व सूत्रे वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांनी मांडलेले ज्ञान नाविन्यपूर्ण होते. त्यांनी मांडलेल्या विषयाचे वेगळेपण अनेकांना जाणवले.

३. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या प्रतिनिधींना आयोजकांनी त्यांच्या आगामी परिषदांसाठी येणार्‍या शोधनिबंधांच्या मूल्यांकन करणार्‍या समितीत सहभागी करून घेण्याची इच्छा व्यक्त करणे : परिषदेच्या आयोजकांपैकी एकाने शोधनिबंधाचे कौतुक केले. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने आयोजित आगामी परिषदांसाठी येणार्‍या शोधनिबंधांचे मूल्यांकन करणार्‍या समितीमध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. विनायक शानभाग यांना सहभागी करून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

४. पीएच्डी करणार्‍या एका विद्यार्थिनीने संशोधनाचे कौतुक करणे : गोवा येथील कु. श्‍वेता पिंटो या ‘पीएच्डी’ करत आहेत. त्यात त्या ‘स्पिरिच्युअल कोशंट’विषयी संशोधन करत आहेत. त्यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संशोधन कार्य वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगितले आणि गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

५. निःस्पृहपणे चालू असलेले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन वैशिष्ट्यपूर्ण असणे : पैसा-प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा संशोधनासाठी संशोधन या उद्देशाने नव्हे, तर समाजाला हिंदु धर्मातील वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगता यावे, यासाठी साधना म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे चालू असलेले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधनाविषयी जाणून उपस्थितांपैकी अनेकजण प्रभावित झाले.

६. गुरुकृपेमुळे जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करता येणे : परिषदेत विषय मांडणार्‍या तज्ञांना त्यांच्या विषयाच्या संदर्भात काही प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत; पण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना म्हणून विषय मांडणार्‍या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना त्या आत्मविश्‍वासाने आणि समाधानकारक उत्तरे देऊ शकल्या, हे वैशिष्ट्य उपस्थितांपैकी अनेकांना जाणवले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now