श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील लाकडी मेघडंबरीला चांदीने मढवले !

नांदेड येथील श्री विठ्ठल भक्ताकडून मेघडंबरीसाठी २ कोटी ४५ लाख रुपयांची चांदी अर्पण

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील गाभार्‍यातील चांदीने मढवण्यात आलेली लाकडी मेघडंबरी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या माध्यमातून चालू आहे. यात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभार्‍यातील लाकडी मेघडंबरी चांदीने मढवण्यात आली आहे. यासाठी नांदेड येथील श्री विठ्ठल भक्त सुमित मोरगे यांनी २ कोटी ४५ लाख रुपयांची चांदी अर्पण केल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल मंदिरातील गाभार्‍यातील चांदीने मढवण्यात आलेल्या लाकडी मेघडंबरीसह मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (डावीकडून दुसरे), तसेच अन्य

श्री विठ्ठल गाभार्‍यातील मेघडंबरीसाठी १३५ किलो, तर श्री रुक्मिणीमातेच्या मेघडंबरीसाठी ९० किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. ही मेघडंबरी चांदीने मढवण्यासाठी पुणे येथील ‘जांगीड सिल्व्हर वर्क्स’ आस्थापनाच्या १३ कारागिरांनी २५ दिवस काम केले आहे. त्यांनी मेघडंबरीवर चांदीपासून सुबक नक्षीकाम केले आहे. यासाठी १६ ते २६ गेज जाडीचा चांदीचा पत्रा वापरण्यात आला आहे.