अल् कायदा दाऊदच्या साहाय्याने रोहिंग्यांची आतंकवादी संघटना बनवणार होती !

नवी देहली – रोहिंग्या मुसलमानांची एक संघटना बनवून म्यानमारच्या सैन्याशी युद्ध करणार होतो, अशी माहिती अल् कायदाचा आतंकवादी समीऊन रेहमान उपाख्य राजू भाई (वय २८ वर्षे) याने दिली आहे. ‘तसेच यासाठी आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम साहाय्य करायला सिद्ध होता’, असेही त्याने म्हटले आहे. मणीपूर किंवा मिझोराम या राज्यांमध्ये या रोहिंग्या मुसलमानांना शस्त्रास्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण देण्याचा विचार होता. अल्-कायदा ही संघटना या रोहिंग्या आतंकवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणार होती, असे राजू भाई याने सांगितले; मात्र हा कट पूर्ण होण्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.

रेहमान ढाकाच्या कारागृहात असतांना त्याची भेट फारूख नावाच्या दाऊदच्या टोळीतील गुंडाशी झाली होती. वर्ष २०१६ मध्ये झालेल्या या भेटीत त्याने रेहमानला भारतात आतंकवादी आक्रमणे करण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि स्फोटके देण्याचे मान्य केले होते. कारागृहातून सुटल्यानंतर रऊफ नावाच्या गुंडाशी संपर्क साधण्यास रेहमानला सांगण्यात आले होते. रऊफ हादेखील दाऊदचाच गुंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेहमान १० ते १२ रोहिंग्या मुसलमानांंच्या संपर्कात होता, ज्यांच्या माध्यमातून सहस्रो रोहिंग्या मुसलमानांना भडकवून त्यांना आतंकवादी बनवण्याचा त्याचा कट होता.

राजू भाईकडून त्याचा भ्रमणभाष संच आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. नवरात्री, दसरा किंवा दिवाळीमध्ये तो देशात आतंकवादी कारवाया करणार होता का, या संदर्भात त्याची चौकशी करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF