रक्तपेढ्यांतील दूषित रक्तामुळे ३ वर्षांत ७८ जणांना एड्सची लागण

मुंबईतील एड्स नियंत्रण सोसायटीची आकडेवारी

मुंबई – रक्तपेढ्यांतील दूषित रक्त आणि रक्तघटक यांच्या संक्रमणामुळे वर्ष २०१४ ते २०१७ या ३ वर्षांत ७८ जणांना एच.आय्.व्ही.ची बाधा झाली आहे. यांपैकी वर्ष २०१६-१७ या चालू वर्षांत १८ जणांना रक्त संक्रमणातून एच.आय्.व्ही.ची लागण झाली, अशी धक्कादायक माहिती मुंबईतील एड्स (एच.आय्.व्ही.) नियंत्रण सोसायटीने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार उघड झाली आहे.

सध्या रक्त तपासणीसाठी ‘एलायझा’ या पद्धतीचा अवलंब केला जात आहे; मात्र ‘एलायझा’ तपासणीत ‘एच.आय्.व्ही.’चे तात्काळ निदान होत नाही. ‘एलायझा’ तपासणीत ३ मासांच्या (विंडो पीरिअड) कालावधीत एच.आय.व्ही.चे निदान होते. त्यामुळे सध्या रक्त तपासणीसाठी वापरल्या जाणार्‍या ‘एलायझा’ तपासणीपेक्षा अत्याधुनिक तपासणी चालू करणे आवश्यक आहे. तसेच रक्तदान करण्यासाठी आलेल्या दात्याचा वैद्यकीय इतिहास, आजार आदींविषयी माहिती घेतल्यानंतर रक्त घ्यायला हवे. सध्या मुंबईत अनेक खासगी रक्तपेढ्यांमध्ये ‘नॅट’ तपासणी (न्युक्लिअर अ‍ॅसिड टेस्ट) केली जाते. या तपासणीच्या अंतर्गत एच.आय्.व्ही.चे निदान पहिल्या १० दिवसांत होते. या तपासणीसाठी प्रत्येक युनिट रक्तामागे १ सहस्र २०० रुपयांपर्यंत खर्च येतो. ही तपासणी खर्चिक असल्याने सरकारी रक्तपेढ्यांमध्ये ‘नॅट’ तपासणी केली जात नाही, अशी माहिती, ‘थिंक फाऊंडेशन’चे श्री. विनय शेट्टी यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF