सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर द्विवेदी यांनाही अखेर जामीन संमत

वर्ष २००८ चे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

या निरपराध्यांना केवळ जामीन देण्यावर न थांबता त्यांना आणि अन्य आरोपींना यातून निर्दोेष म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे ! ज्या अन्वेषण अधिकार्‍यांनी खोट्या आरोपांखाली साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्ट. कर्नल पुरोहित यांच्यासह श्री. सुधाकर चतुर्वेदी, श्री. सुधाकर द्विवेदी आणि अन्य निरपराध्यांना ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले आणि त्यांच्या आयुष्यातील ही वर्षे वाया घालवली, त्या अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे आणि या अधिकार्‍यांकडून या सर्व निरपराध्यांना हानीभरपाई दिली गेली पाहिजे, अशी सर्वत्रच्या हिंदूंची मागणी आहे !

श्री. सुधाकर चतुर्वेदी
श्री. सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे

मुंबई – वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी श्री. सुधाकर चतुर्वेदी आणि श्री. सुधाकर द्विवेदी या दोघांनाही अखेर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयाने १९ सप्टेंबर या दिवशी जामीन संमत केला. या आधी साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन मिळाला आहे. या सर्वांना ९ वर्षे कारागृहात रहावे लागले, तरीही त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. जामिनासाठी या दोघांना हमीपत्रासह व्यक्तीगत ५ लाख रुपये भरावे लागणार आहेत.

२९ सप्टेंबर २००८ या दिवशी सायंकाळी मालेगाव येथील नुराजी मशिदीजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक घायाळ झाले होते. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ४ सहस्र पांनाचे आरोपपत्र प्रविष्ट केले होते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि स्वामी दयानंद पांडे यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने वर्ष २०१६ मध्ये साध्वी प्रज्ञासिंह दोषी नसल्याचे म्हटले होते. यामध्ये अन्य काही जणांवरही आरोप ठेवण्यात आला आहे.

अकारण कारागृहात डांबणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना जेव्हा शिक्षा होईल, तेव्हाच सुधाकर चतुर्वेदी यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सुधाकर चतुर्वेदी यांचे अधिवक्ता

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी क्रमांक ११ श्री. सुधाकर चतुर्वेदी यांची १९ सप्टेंबर या दिवशी जामिनावर सुटका झाली. ५ लाख रुपयांचा जामीनदार देणे आणि पारपत्र जमा करणे अशा अटी होत्या. जामीनदार द्यायला लागणारा वेळ लक्षात घेऊन न्यायालयाने ५ लाख रुपये हे रोख रकमेत स्वीकारण्याची तात्पुरती मुभा दिली आणि मासाभरात जामीनदार सादर करण्यास सांगितला. १-२ दिवसांत रोख रक्कम भरून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासाठी सैन्याचा खबर्‍या म्हणून काम करणार्‍या श्री. सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी शेखर बागडे या आतंकवादीविरोधी पथकाच्या पोलीस अधिकार्‍याने ‘आर्.डी.एक्स’ ठेवल्याचे निष्पन्न झाले होते.

एप्रिल २०१६ मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने तसा अहवाल न्यायालयाला दिला होता. त्यामुळे श्री. चतुर्वेदी यांना अकारण गोवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी मत नोंदवून सत्र (विशेष) न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. श्री. चतुर्वेदी निर्दोष असूनही त्यांना ९ वर्षे कारागृहात रहावे लागले, यामुळे त्यांच्या झालेल्या हानीची भरपाई कशी होणार ? त्यांना या प्रकरणात विनाकरण गुंतवणारे आतंकवादीविरोधी पथक आणि अन्य यंत्रणेचे पोलीस अधिकारी यांच्या विरोधात त्यांनी वर्ष २०१३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या अधिकार्‍यांना जेव्हा शिक्षा होईल, तेव्हाच श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल.


Multi Language |Offline reading | PDF