(म्हणे) ‘पेट्रोल-डिझेल विकत घेणारे उपाशी मरत नाहीत !’ – केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फोन्स

केंद्रीय मंत्र्यांची न शोभणारी भाषा ! पेट्रोल आणि डिझेल विकत घेणारे एकवेळ उपाशी मरत नसतील; मात्र त्यांच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढल्याने गरीब मात्र उपाशी मरत असतील, हे लक्षात कसे येत नाही ?

नवी देहली – चारचाकी आणि दुचाकी असणारेच पेट्रोल आणि डिझेल विकत घेतात. या गाड्यांची मालकी असणार्‍या व्यक्ती कधी उपाशी मरत नाहीत, असे सांगत केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी पेट्रोल आणि डिझेल यांच्यावर लावण्यात आलेल्या करामुळे त्यांच्या वाढत जाणार्‍या मूल्यांचे समर्थन केले. (प्रत्येक जण गाड्यांचा वापर मौजमजेसाठी करत नाही, हे मंत्र्यांना माहीत नाही का ? – संपादक) कराच्या माध्यमातून जमा होणारे पैसे पंतप्रधान किंवा मंत्री चोरणार नसून त्याचा उपयोग गरिबांच्या भल्यासाठी करण्यात येणार आहे. सरकार त्या लोकांवरच कर लावते जे तो देण्यास समर्थ आहेत, असेही ते पुढे म्हणाले. (पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीचा परिणाम महागाई वाढण्यात होतो आणि त्याचा त्रास गरीब जनतेला भोगावा लागतो, हे अर्थशास्त्र माजी सरकारी अधिकारी असणार्‍या मंत्र्यांना माहिती नाही, असे समजायचे का ? – संपादक) सध्या वाढत्या करांमुळे पेट्रोल प्रतिलिटर ८० रुपयांपर्यंत मिळत आहे. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल आणि डिझेल यांना जीएस्टी लावण्याच्या संदर्भात विधान केले होते. तसे झाले, तर पेट्रोल अधिकाधिक ४० रुपयांपर्यंत मिळू शकेल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर अत्यंत अल्प झाले असतांना भारतात मात्र करांमुळे ते अधिक किमतीत विकले जात आहे. (ही जनतेची लूट नव्हे का ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF