महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून ‘लेखकाची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक स्थिती यांचा त्याच्या वाङ्मयावर होणारा परिणाम’ या विषयावर शोधनिबंध सादर

कल्याण येथील उच्चशिक्षण आणि संशोधन केंद्राच्या वतीने पुणे येथे ‘धर्म, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद

शोधनिबंध सादर करतांना डॉ. ज्योती काळे

पुणे, १६ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याण (जिल्हा ठाणे) येथील उच्च शिक्षण आणि संशोधन केंद्राच्या वतीने पुणे येथे ‘धर्म, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर १५ आणि १६ सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘लेखकाची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक स्थिती यांचा त्याच्या वाङ्मयावर होणारा परिणाम’ या विषयावर शोधनिबंध सादर करण्यात आला. या परिषदेचा प्रारंभ १५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता दीपप्रज्वलनाने झाला.

या वेळी पॅलेस्टाईन दूतावासाचे सल्लागार रासेम बिशरत हे प्रमुख पाहुणे, तर बांगलादेशमधील इस्लामिक विद्यापीठ काष्टीयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. शहादत हुसेन आझाद हे अध्यक्षस्थानी होते.

या परिषदेत हैद्राबाद येथील डॉ. गोपीनाथ भागवातूला म्हणाले, ‘‘भारत धार्मिकतेचा पगडा सर्वांवर आहे; पण सुशिक्षित असूनही देवाला न मानणारे लोकच या जगात संकटे उत्पन्न करत आहेत. लोकांना भरकटवत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे.’’

या परिषदेत बांगलादेश, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका या देशांसह भारतातील काश्मीर, केरळ, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आदी राज्यांमधून १८४ जण सहभागी झाले होते.

उपकरणांपेक्षा सूक्ष्मज्ञानाद्वारे आपण अधिक सखोल ज्ञान प्राप्त करू शकतो ! – डॉ. ज्योती काळे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

शोधप्रबंध सादर करतांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या डॉ. ज्योती काळे म्हणाल्या,

१. ज्याप्रमाणे प्रत्येक विषयातील तज्ञच त्या विषयावर लिखाण करू शकतात, त्याप्रमाणे केवळ संत हेच अध्यात्मातील अधिकारी असल्याने त्यांनी लिहिलेले ग्रंथच अध्यात्मविषयक खरे ज्ञान देऊ शकतात.

२. उपकरणांपेक्षा सूक्ष्मज्ञानाद्वारे आपण अधिक सखोल ज्ञान प्राप्त करू शकतो, अन्यथा अध्यात्मविषयक वरवर चांगल्या वाटणार्‍या ग्रंथांमुळे सामान्य वाचक भरकटतात आणि भोंदूगिरीचे बळी ठरतात. त्यामुळे आपण उच्च आध्यात्मिक पातळीच्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे आवश्यक आहे.

या वेळी डॉ. ज्योती काळे यांनी ‘कोणत्या ग्रंथातील ज्ञान आध्यात्मिक प्रगतीसाठी पूरक आहे’, हे वेगवेगळ्या प्रयोगांमधून स्पष्ट केले.

क्षणचित्रे :

१. परिषदेच्या आयोजकांपैकी एक असणारे डॉ. सुधीर निकम यांनी शोधनिबंधातील सूत्रांचे कौतुक केले. ‘विषय परिणामकारक होता’, असे ते म्हणाले.

२. बेंगलोर येथील डॉ. के. शामला स्वतःहून डॉक्टर काळे यांना भेटल्या. ‘मी गेली २५ वर्षे इंग्लिश विषयाची प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहे; पण लेखकाच्या आध्यात्मिक पातळीचा लिखाणावर परिणाम होतो, हे प्रथमच लक्षात आले. तुम्ही अध्यात्म प्रायोगिक स्तरावर कसे कार्य करते, हे सांगत आहात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे’, असे त्या म्हणाल्या.

३. डॉ. गोपीनाथ यांनाही संशोधनाचे कौतुक केले. ‘असा विचार सहसा कुणीच करत नाही’, असे ते म्हणाले


Multi Language |Offline reading | PDF