गुजरातमधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोदी यांची मशिदीला भेट ! – अ.भा. हिंदू महासभेचा आरोप

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना मोदी यांनी कर्णावती येथील जुन्या मशिदीत नेल्याचे पडसाद

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौर्‍यावर असलेले जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना कर्णावती येथील सय्यद मशिदीमध्ये घेऊन गेले. त्यांनी या मशिदीची माहिती आबे यांना करून दिली. यावर अखिल भारतीय हिंदू महासभेने टीका केली आहे. ‘या कृतीसाठी भारतातील हिंदू मोदी यांना कधीही क्षमा करणार नाहीत’, असे हिंदू महासभेने म्हटले आहे. ‘गुजरातमधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोदी यांनी मशिदीला भेट दिली’, असा आरोपही महासभेने केला आहे.

हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार यांनी म्हटले की,

१. मोदी यांच्या मशिदीला भेट देण्याच्या कृतीमुळे देशभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. शिंजो आबे यांना मशिदीऐवजी सोमनाथ मंदिर, द्वारका, ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घडवायला हवे होते.

२. भारत एक हिंदु राष्ट्र आहे. हिंदु राष्ट्र हीच भारताची जगभरातील ओळख आहे. भगवान शंकर, राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळेच जपानी पंतप्रधानांना घेऊन गुजरातमधील हिंदू देवतांच्या भव्य मंदिरांना भेट द्यायला हवी होती; मात्र मोदींनी असे केले नाही. त्यांची ही कृती हिंदू आणि भारतविरोधी आहे.

३. पंतप्रधानांचे हे पाऊल अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळेच आज काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. भाजपनही तेच केल्यास त्यांनाही सत्ता गमवावी लागेल.


Multi Language |Offline reading | PDF