फोंडा येथील न्यायालयात सनातन संस्थेने दाखल केलेल्या दाव्याच्या वेळी राजन नारायण यांची मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट्यासह उपस्थिती !

जिवाला धोका असल्याचा बाऊ !

न्यायालय सभागृहाची पोलिसांकडून झडती !

गोवन ऑब्झर्व्हरचे संपादक राजन नारायण यांच्याकडून सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा आणखी एक अश्‍लाघ्य प्रयत्न !

फोंडा, १४ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यातील इंग्रजी साप्ताहिक ‘गोवन ऑब्झर्व्हर’चे संपादक राजन नारायण यांनी १४ सप्टेंबरला त्यांच्या विरुद्धच्या दिवाणी दाव्यात फोंडा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात उपस्थित रहातांना मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा संरक्षणासाठी आणून त्यांच्या जिवाला धोका असल्याचा बागुलबुवा उभा करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला. न्यायालयात येतांना पुढे पोलिसांची जीप, मध्ये राजन नारायण यांची कार आणि मागे पुन्हा पोलिसांची जीप, अशा थाटात राजन नारायण फोंडा येथील दिवाणी न्यायालयात उपस्थित झाले. त्यांच्या अवतीभवती अंदाजे २० बंदूकधारी पोलीस तैनात होते. प्रारंभी पोलिसांनी दावा चालणार्‍या न्यायालय परिसराची झडती घेतली. राजन नारायण न्यायालय परिसरात फिरत असतांना बंदूकधारी पोलीस त्यांच्या समवेत होते.

आजच्या सुनावणीच्या वेळी सनातन संस्थेचे केवळ अधिवक्ता नागेश ताकभाते हे एकमेव उपस्थित असतांनाही त्यांनी न्यायालयासमोर त्यांच्या जिवाला धोका असल्याचा आभास निर्माण केला.

नुकतीच कर्नाटक येथे नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या आणि हिंदुत्वनिष्ठ अन् भाजप यांच्या विरोधात पत्रकारिता करणार्‍या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. कर्नाटक पोलिसांना या हत्येत नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याची शंका असून त्या अनुषंगाने ते अन्वेषण करत असूनही गोव्यातील पत्रकार राजन नारायण, दैनिक लोकमतचे पत्रकार राजू नायक यांनी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पणजी येथील सभेत गौरी लंकेश यांच्या हत्येचे खापर सनातन संस्थेवर फोडले होते. त्यानंतर आता राजन नारायण यांनी सनातनने दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात पोलीस फौजफाट्यासह न्यायालयात उपस्थित राहून त्यांच्या जिवाला खूप मोठा धोका असल्याचा बागुलबुवा उभा केला आहे. (यातून राजन नारायण यांची कांगावखोर वृत्ती दिसून येते. वर्ष २००८ मध्ये संस्थेने दावा प्रविष्ट केला असून त्यानंतरच्या ९ वर्षांत राजन नारायण यांना आताच असे न्यायालयात येतांना संरक्षण घ्यावेसे का वाटले ? सनातन संस्थेची जमेल तेवढी अपकीर्ती करण्यासाठीच हे असे नाटक करण्यात आले. राजन नारायण यांचा न्यायालयावरही विश्‍वास नाही का ? तसेच गोव्यातील आणि केंद्रातील भाजप शासनात पत्रकार सुरक्षित नाहीत, असेच त्यांना यातून दाखवून द्यायचे होते. भाजप शासनाने हे लक्षात घ्यावे ! – संपादक)

राजन नारायण यांनी वर्ष २००८ मध्ये त्यांच्या इंग्रजी साप्ताहिकात सनातनच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणविषयक ग्रंथाच्या आधारे सनातन संस्थेची अपकीर्ती करणारा लेख प्रसिद्ध केला होता. यावरून सनातन संस्थेने त्यांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी दावा प्रविष्ट केला होता. दिवाणी दाव्याची सुनावणी सध्या चालू असून यात राजन नारायण यांची उलटतपासणी चालू आहे. एवढा मोठा पोलीस फौजफाटा आणून सनातनच्या अधिवक्त्यांवर दबाव आणण्याचाही हा प्रयत्न होता. इंग्रजी साप्ताहिकाच्या याच अंकात राजन नारायण यांनी साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर सध्याचे आमदार आतानासियो मोन्सेरात, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि दयानंद नार्वेकर यांना तालिबानी आतंकवाद्यांच्या वेषात दाखवले आहे आणि ‘हेच खरे आतंकवादी आहेत’, असेही म्हटले होते.

क्षणचित्रे :

राजन नारायण यांनी पोलीस फौजफाटा आणून एवढा दबाव निर्माण केला, तरी सनातन संस्थेचे अधिवक्ता नागेश ताकभाते यांनी जराही न डगमगता सुमारे २ घंटे त्यांची उलटतपासणी घेतली.


Multi Language |Offline reading | PDF