पोलिसांनी ५ लक्ष रुपयांच्या अवैध मद्याची वाहतूक रोखली !

सातत्याने होणारी मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी शासन काय करणार ?

सावंतवाडी – विलवडे येथे ३ लक्ष रुपये, तर कामळेवीर येथे २ लक्ष रुपये, अशा एकूण ५ लक्ष रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली.

विलवडे येथे दारु वाहतूक केल्याच्याप्रकरणी सावंतवाडीतील युवक अभी उपाख्य महेश सहदेव महाले (वय ३४ वर्षे) याला कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३ लक्ष रुपयांच्या मद्यासह चारचाकी आणि अन्य साहित्य मिळून एकूण ८ लक्ष रुपयांचे साहित्य पोलिसांनी कह्यात घेतले.

कुडाळ तालुक्यातील झाराप येथे एका चारचाकी गाडीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने गाडी कामळेवीर बाजारपेठेच्या दिशेने पळवली. त्या गाडीचा पथकाने पाठलाग चालू केल्यावर कामळेवीर येथील रेल्वे पुलानजीक आंबा कलमबागेत गाडी घुसवून तेथेच ती सोडून चालकाने पलायन केले. गाडीतील गोवा बनावटीचे २ लक्ष १८ सहस्र ८८० रुपये किंमतीचे मद्य आणि चारचाकी मिळून एकूण ३ लक्ष ६८ सहस्र ८८० रुपयांचे साहित्य पोलिसांनी कह्यात घेतले.


Multi Language |Offline reading | PDF