(म्हणे) ‘अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून पतसंस्थेत घोटाळा नाही !’

कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांचा दावा

कोल्हापूर – श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थेशी कॉ. गोविंद पानसरे यांचा काहीही संबंध नसून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर विचारवंतांच्या हत्येची संशयाची सुई असल्याने अन्यत्र लक्ष विचलित केले जात आहे. कॉ. पानसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची अपर्कीती करण्याचा डाव आहे. या संदर्भात कायदेशीर दाद मागणार आहे, असे प्रतिपादन कॉ. पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी १२ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत केले.

मेधा पानसरे पुढे म्हणाल्या की,

१. पतसंस्थेत कोणताही घोटाळा झालेला नसून ४५ लक्ष रुपयांच्या ठेवी या संघटनेचा, पक्ष निधीचा पैसा आहे. त्याचे वर्षानुवर्षे नूतनीकरण होत आले आहे. गरीब, मजूर यांना आर्थिक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रोत्साहन म्हणून कॉ. पानसरे यांनी ही पतसंस्था चालू केली; मात्र याचा सोयीस्कर अर्थ लावून आरोप केले जात आहेत.

२. कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर सर्व संस्थांची आर्थिक कागदपत्रे पोलीस प्रशासनाकडे जमा केली आहेत. कॉ. पानसरे यांचा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचा खोटा आरोप वर्ष २०१७ ला करणे दिशाहीन आहे.

३. कॉ. पानसरे हे गेली ५० वर्षे कम्युनिस्ट पक्षासाठी काम करत होते. कम्युनिस्ट आणि नक्षलवाद यांचा संबंध असल्याचे आरोप झाले, ते सिद्ध झालेले नाहीत. आरोप करणार्‍यांनी कागदपत्रे आणि लेखी पुराव्यांसह ते सिद्ध करावेत.

४. श्रमिक नागरी पतसंस्था ही सहकार कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था आहे. या पतसंस्थेचे प्रतीवर्षी लेखापरीक्षण केले आहे. यापूर्वीही पतसंस्थेत अपहार झाला नाही. आरोप करणार्‍यांना संघटना आणि पक्षाचे पैसे आहेत, हे कळलेच नाही, हे दुर्दैव आहे. २०१३ वर्षी विमानतळाजवळील भूमीचे शासनाने बाजारभावाप्रमाणे पैसे दिले आहेत. त्यातील काही रक्कम आहे. पतसंस्थेत एकाच वर्षी ४५ लक्ष रुपये जमा झालेले नाहीत. यातील बहुतांश ठेवी या नूतनीकरण झालेल्या आहेत.

५. कॉ. दिलीप पवार म्हणाले की, कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने ३ वर्षे एकही ठेव मोडायची नाही, असा ठराव केला आहे. मागील अडीच वर्षांत एकही रुपया पक्षासाठी खर्च केला नाही. त्यामुळे ‘हे पैसे एका वर्षात जमा झालेत’, असे म्हणणे चुकीचे आहे. संघटनांनी निधीसाठी दिलेले पैसे खर्च न करता संघटन कसे चालवले, हे आरोप करणार्‍यांना कळायला हवे होते आणि तसे त्यांनी विचारायला हवे होते, अशी टीका केली.


Multi Language |Offline reading | PDF