काश्मिरी संस्कृतीचे भारतीयत्व !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२१ आणि २२ सप्टेंबर असे दोन दिवस चंदीगड येथे ‘पनून कश्मीर’ संघटनेचे जाहीर संमेलन झाले. या संमेलनाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते. ‘काश्मिरी संस्कृतीचे भारतीयत्व’ याविषयी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

माझ्या परमप्रिय काश्मिरी बंधूंना सविनय प्रणाम ! शैव आणि वैष्णव या उभय संस्कृतींचा वारसा लाभलेल्या ‘काश्मिरी संस्कृतीच्या भारतीयत्वाविषयी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यापूर्वी मी जगाचा ज्ञानगुरु भगवान शिव आणि श्रीमद्भगवद्गीतेद्वारे जगाला सर्वोच्च तत्त्वज्ञान सांगणारे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी वंदन करतो.

१. भारतवर्ष आणि काश्मीर यांचे महत्त्व !

१ अ. भारतवर्ष

पंचखंड भूमंडळात सर्वांत पवित्रतम भूमी म्हणजे हे भारतवर्ष ! अनेक ऋषीमुनी, अवतार आणि विद्वज्जन यांनी या भारतभूला गौरवशाली बनवले. जगातील सर्वांत सुसंस्कृत वंश म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या आर्य संस्कृतीचा विकास या देशात झाला.

असा भारतदेश आमचा श्‍वास आहे, तर हिंदु संस्कृती म्हणजे आमचा आत्मा !

१ आ. काश्मीर

नकाशात दिसणारा भारत म्हणजे राष्ट्रपुरुषाचे शरीर आहे. त्यातील जम्मू-काश्मीर प्रांत म्हणजे साक्षात आमचा मेंदू म्हणजेच बुद्धी आहे. जर हे भारतवर्ष काश्मीरविहीन झाले, तर भारताची अवस्था बुद्धीहीन मानवासारखी म्हणजेच पशूवत होईल !

२. शारदादेशाचे महत्त्व आणि हिंदूंचे कर्तव्य !

काश्मीर ही भारतवर्षाची बुद्धी आहे, यामागील आध्यात्मिक कारण म्हणजे मां सरस्वतीचे शारदापीठ ! ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. त्यानंतर त्याने मानवाला पृथ्वीवर पाठवले. मानवाने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, ‘हे देवा, तुम्ही विविध देवतांना आमचा उत्कर्ष आणि भले व्हावे, यासाठी पृथ्वीवर पाठवा.’ त्यानंतर (पृथ्वीवरील) विविध ठिकाणी देवतांनी आपापली स्थाने बनवली. त्याच क्रमाने ज्ञानाची देवता सरस्वतीने जे स्थान निवडले, ते काश्मीर होय; म्हणूनच काश्मीरचे नाव ‘शारदादेश’ असेही आहे.

भारतीय संस्कृतीत हिंदू प्रतिदिन शारदादेवीचा श्‍लोक म्हणतांना म्हणतात,

नमस्ते शारदे देवि काश्मीरपुरवासिनि ।

त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥

अर्थ : हे काश्मीरवासिनी सरस्वती देवी, तुला माझा नमस्कार असो. तू आम्हाला विद्या दे, अशी मी तुला नित्य प्रार्थना करतो.

सध्या काश्मीरमधील हे शारदापीठ पाकिस्तानच्या कह्यातील काश्मीरमध्ये आहे, हे हा श्‍लोक म्हणणार्‍यांना ठाऊक आहे का ? श्री शारदादेवीच्या ज्या स्थानाचा आपण प्रार्थनेत उल्लेख करतो, त्याचा आता पूर्ण विध्वंस झाला असून तेथे जाण्यास हिंदूंना पापस्थानाकडून (पाकिस्तानकडून) प्रतिबंध केला जातो, हे क्लेशदायक आहे.

लक्षात घ्या, आम्ही सरस्वतीपुत्र म्हणजे विद्येचे उपासक आहोत. आपले शारदापीठ हे पुन्हा भारतभूमीतील विद्येचे माहेरघर बनण्यासाठी आपल्याला आपले कर्तव्य बजावायचे आहे.

३. काश्मीरमध्ये अधर्मींना स्थान नाही, हे लक्षात घ्या !

३ अ. असुरांच्या नाशार्थ काश्मीर निर्मिणारे कश्यप ऋषि !

कश्यप ऋषींच्या नावावरून या भूभागाला काश्मीर हे नाव पडले. असुरांचा नाश करून सज्जनांना अभय देण्यासाठी त्यांनी काश्मीर निर्मिला. भारतातील सुसंस्कारित आणि सुविद्य लोकांना वस्तीचे आमंत्रण देऊन कश्यपांनी हा प्रदेश वसवला आहे.

३ आ. काश्मीरभूमी शिवभक्तांसाठीच ! – भगवान श्रीकृष्ण

महाभारताच्या युद्धात सर्व राजांनी धर्मयुद्धात भाग घेतला; मात्र काश्मीरचा राजा गोकर्ण याने त्यात भाग घेतला नाही. तेव्हा श्रीकृष्णानेे त्या अधर्मीचा वध केला आणि त्याच्या जागी त्याची पत्नी यशोमती हिचा अभिषेक केला. अशा प्रकारे जगामध्ये पहिल्यांदा एका महिलेला राज्यकर्ता बनवण्यात आले आणि त्याचा प्रारंभही काश्मीरपासूनच झाला. तिचा अभिषेक करतांना स्वतः कृष्णाने सांगितले की, काश्मीरची भूमी म्हणजे साक्षात पार्वतीचे रूप आहे. या भूमीवर केवळ शिवतत्त्वाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांनाच राज्य करण्याचा अधिकार आहे. जो शिवतत्त्वाच्या दिशेने म्हणजे धर्माच्या दिशेने प्रयत्न करत नाही, त्याला या भूमीवर रहाण्याचा कोणताही अधिकार नाही. काश्मीरमधील आजचे अधर्मी किंवा असुर कोण आहेत आणि शिवप्रेमी कोण आहेत, हे सूज्ञांना वेगळे सांगायला नको !

४. काश्मिरी हिंदूंचे स्वभूमीतून विस्थापन ही भारतभरातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

४ अ. काश्मिरी हिंदूंचा धर्मासाठी विलक्षण त्याग !

काश्मीर आज आतंकवाद्यांच्या कारवायांचे माहेरघर बनले आहे. काश्मीरचे सध्याचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक जीवन पाहिले असता, ७० वर्षे स्वातंत्र्य उपभोगणार्‍या भारताच्या दृष्टीने काश्मीर हा कलंकच ठरावा.

१९ जानेवारी १९९० या दिवशी संपूर्ण काश्मीरमधून हिंदूंनी निघून जावे, असे आदेश ठिकठिकाणी देण्यात आले. जाहीरपणे सांगण्यात आले, वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या आणि संपूर्ण हिंदु समाजाला तिथून निघून जावे लागले. त्यांच्यासमोर पर्याय होते तीन. एकतर धर्म बदला, जिहादमध्ये सहभागी व्हा किंवा येथून निघून जा. त्या हिंदूंनी फार मोठा त्याग केला. धर्म वाचवण्यासाठी आपली भूमी, आपली जमीन, आपल्या आठवणी, आपले बालपण स्वतःच्या हातांनी ते धागे तोडून ती मंडळी दुसरीकडे येऊन राहिली.

धर्मासाठी हा विलक्षण त्याग आजच्याही काळामध्ये केला जातो, हे एका अर्थी स्पृहणीय आहे; परंतु दुसर्‍या अर्थी त्यांचे आम्हाला वैषम्य वाटले पाहिजे. आम्हाला वाईट वाटले पाहिजे की, हे असे करण्याची पाळी येते, याला आपण सुसंस्कृत जग म्हणतो आहोत कि असंस्कृत जग म्हणतो आहोत ? आणि ही पाळी हिंदूंच्या राष्ट्रामध्ये हिंदूंवर येते आहे, याचे कारण काय ?

४ आ. २३ वर्षांत काश्मीरमधील हिंदू नामशेष

या काळामध्ये दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते आणि आम्ही काय करत होतो ? आमच्यापर्यंत या बातम्या पोहोचल्या कशा नाहीत ? पोहोचल्या, तर त्याची तीव्रता आमच्यापर्यंत का पोहोचली नाही ? याचे एक कारण ते म्हणजे ज्यांना समजत होते, ते बोलले नाहीत. त्यांनी पाहून न पाहिल्यासारखे केले, ऐकून न ऐकल्यासारखे केले, समजून न समजल्यासारखे केले. त्याची परिणती १९९० पासून आजही चालू आहे.

४ इ. हिंदु धर्म जगवण्याचे दायित्व निसर्गावर नाही

अनेक काश्मिरी हिंदूंनी मला सांगितले, जेव्हा १९९० मध्ये हे घडले त्याच्या आधी जर मला कोणी सांगितले असते की, तुम्हाला २० वर्षांनंतर हे सगळे सोडून जावे लागणार आहे, तर मी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नसता; परंतु २० वर्षांनंतर ती वस्तूस्थिती आमच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभी होती. जर आपण काही केले नाही, तर काही वर्षांनी ही वस्तूस्थिती आपल्यासमोर उभी राहील, याविषयी माझ्याही मनात काडीमात्र शंका नाही. आपण केवळ स्वतःचे आयुष्य म्हणून जगणार असू आणि हिंदु धर्म म्हणून काही करणार नसू, तर हिंदु धर्म जगवण्याचे दायित्व निर्सगावर नाही. निसर्गाचा नियम आहे की, जो स्वतःचे मूळ भक्कम करून उभा रहातो, तोच टिकतो. जो स्वतःचे मूळ भक्कम करून उभा रहात नाही, त्याला अस्तित्वाचा अधिकार नाही.

५. हिंदु धर्म, धर्मीय आणि राष्ट्र यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा !

आपल्यासमोर असलेले शत्रू शस्त्रसज्ज आहेत. त्यांच्याकडे आर्थिक सामर्थ्य आहे, त्यांच्या बाजूला प्रसारमाध्यमे आहेत. त्यामुळे आपण छोटीशी कृती करून अल्पसंतुष्ट रहाण्यात अर्थ नाही. आपल्याला सहस्रो हातांनी, सहस्रो मुखांनी कार्य करायचे आहे. हे कार्य करण्याची वेळ आताच आहे. निश्‍चयाचा पूर्ण विचार करून आणि हिंदु धर्म, धर्मीय आणि राष्ट्र यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा !

काश्मीरची समस्या असो कि काश्मिरी हिंदूंचे विस्थापन असो, हिंदूंच्या प्रत्येक सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर एकमात्र उपाय म्हणजे भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे होय !

काश्मिरी संस्कृतीचे अमूल्य योगदान !

१. स्त्रियांना राज्यकर्तेपद देण्याची परंपरा देणारे काश्मीर !

दिद्दा, सुगंधा, सूर्यमती यांच्यासारख्या अनेक कर्तबगार राज्यकर्त्या स्त्रिया काश्मिरच्या इतिहासात चमकून गेल्या. त्यांनी राजकारभार फार कुशलतेने केला आणि प्रजेला सुख दिले.

२. जगभर हिंदु धर्मप्रचारक पाठवणारा देश !

सम्राट कनिष्काच्या राज्यात त्याने विद्वान वसुमित्राच्या अध्यक्षतेखाली धर्मपरिषद बोलावली होती. भारतातून ५०० धर्मपंडित तेथे गेले. तेथूनच तरुण धर्मपंडितांनी तिबेट, चीन आणि मध्य आशियात जाऊन हिंदु तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. चीनमध्ये भारताच्या अन्य भागांतून जेवढेे धर्मप्रसारक गेले, त्यापेक्षा अधिक धर्मप्रसारक एकट्या काश्मीरमधून गेले आहेत.

काश्मीरचे  विविधांगी  महत्त्व

 

शंकराचार्य टेकडी
हिमालय पर्वत

अ. भौगोलिकदृष्ट्या

काश्मीरचा उल्लेख हिंदु धर्मातील अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथात आढळतो. शक्ती-संगमतंत्र या ग्रंथात काश्मीरची व्याप्ती पुढीलप्रमाणे दिली आहे.

शारदामठमारभ्य कुडःकुमाद्रितटान्तकम् ।

तावत्काश्मीरदेशः स्यात् पन्चाशद्योजानात्मकः ॥

अर्थ : शारदा मठापासून केशराच्या पर्वतापर्यंत ५० योजने (१ योजन= ४ कोस) विस्तृत असलेला प्रदेश तो काश्मीर देश होय.

महाभारतात याचा उल्लेख काश्मीरमंडल असा आहे (भीष्म. ९.५३)

आ. ऐतिहासिकदृष्ट्या

१. भगवान कृष्ण आणि भगवान बुद्ध या दोन महात्म्यांनी काश्मीरला पायधूळ झाडल्याचा उल्लेख आहे. युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाला काश्मीरचा राजा गोनंद उपस्थित होता.

यावरून काश्मीर हिंदु संस्कृतीशी एकरूप आहे, हे सहज लक्षात येईल.

२. इ.स. पूर्व २७३-२३२ या काळात सम्राट अशोकाने श्रीनगरी या राजधानीची स्थापना केली होती. हेच ते श्रीनगर ! आज जेथे श्रीनगरचे विमानतळ आहे, त्याच्या बाजूला सम्राट अशोकाचा नातू दामोदर याचा अवाढव्य प्रासाद उभा होता.

काश्मीरमधील सर्व स्थानांची नावे पालटण्यात आली किंवा त्यांचे इस्लामीकरण करण्यात आले; परंतु आजही श्रीनगरचे नाव बदलू शकलेले नाहीत, हे सत्य लक्षात घ्या ! ज्या काश्मीरची राजधानीच श्रीनगर आहे, ते राज्य स्वतःचे हिंदुत्व कसे झाकू शकेल ?

३. ख्रिस्त जन्मापूर्वी ३००० वर्षे काश्मीर अस्तित्वात होते, असे पुरातत्वीय आधार सांगतात. तेव्हा इस्लामचा कोणी प्रतिनिधी अस्तित्वात नव्हता; परंतु ओमरचा एखादा पूर्वज तेव्हा नक्कीच काश्मिरात रहात असेल. त्याला विचारले, तर तो काश्मीर भारतात केव्हाच विलीन झाले आहे, असे सांगेल.

इ. धार्मिकदृष्ट्या

१. हिंदु संस्कृतीत १६ संस्कारांना विशेष महत्त्व आहे. जे कोणी उपनयन संस्कार करतात, ते त्यानंतर मुलाला सात पावले उत्तरेच्या दिशेने, म्हणजे काश्मीरच्या दिशेने चालायला सांगतात.

यावरून काश्मीरचे हिंदु संस्कारांच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात येईल.

२. हिंदु संस्कृती मंदिर संस्कृती आहे. अवघे काश्मीर खोरे हे एकेकाळी भव्यदिव्य आणि ऐश्‍वर्यशाली मंदिरांसाठी सुप्रसिद्ध होते. इस्लामी वक्रदृष्टी पडल्याने आज सर्वत्र या मंदिरांचे भग्नावशेष पहायला मिळतात. काश्मीरमधील गरूरा या गावी ‘झियान मातन’ नावाचे दैवी तळे होते. या तळ्याच्या किनार्‍यावर ६०० वर्षांपूर्वी ७ मंदिरे होती. सिकंदर भूशिकन या काश्मीरच्या मुसलमान राजाने त्यापैकी ६ मंदिरे पाडली. सातवे मंदिर पाडण्याच्या सिद्धतेत असतांना या तळ्यातून रक्त वाहू लागले. या प्रकाराने सिकंदर भूशिकन अचंबित झाला आणि घाबरून त्याने तेथून पळ काढला. अशा प्रकारे सातवे मंदिर त्या क्रूरकर्म्याच्या तावडीतून सुटले, जे आजही अस्तित्वात आहे.

हे मंदिर आज कशासाठी उभे आहे ? काश्मीर हिंदु संस्कृती आहे, याची खूण सांगण्यासाठीच !

ई. आध्यात्मिकदृष्ट्या

१. श्रीविष्णु-लक्ष्मी आणि शारदादेवी एकत्र कधीही नांदत नाहीत, असे म्हटले जाते; परंतु फक्त काश्मीरमध्येच लक्ष्मी आणि शारदादेवी एकत्रितपणे रहात आहेत. येथे एके ठिकाणी शारदेचे, तर दुसर्‍या ठिकाणी श्रीलक्ष्मीचे स्थान आहे.

२. काश्मीरमधील नागपूजक संस्कृती : नागपूजन हे हिंदु धर्मातील अविभाज्य अंग आहे. काश्मीरमध्ये पुरातन काळापासून नागपूजा प्रचलित आहे. म्हणूनच अनेक सरोवरांना आणि झर्‍यांना नागदेवतांची नावे मिळालेली आहेत. उदा. नीलनाग, अनंतनाग, वासुकीनाग, तक्षकनाग इत्यादी. नाग ही त्याची संरक्षकदेवता होती. अबुल फजल याने ऐने अकबरीत म्हटले आहे की, त्या प्रदेशात अनुमाने सातशे ठिकाणी नागांच्या आकृती कोरलेल्या आढळतात. विष्णुने वासुकीनागाला इथे सहपरिवार रहाण्याची आज्ञा दिली होती आणि इथे त्याला कोणी मारणार नाही, असे अभयही दिले होते.

मला सांगा की, अरबस्थानात नागपूजन होते का ? तेथे तर मूर्तीपूजाही होत नाही; मग नागांच्या आकृती कोरण्याचा प्रश्‍न कुठे ?

उ. सांस्कृतिकदृष्ट्या

संस्कृती प्राचीन काळापासून काश्मिरात उच्च संस्कृतीची जोपासना होत आली आहे. विद्या कलांचा उत्कर्ष तिथे दोन सहस्र वर्षांपासून चालू आहे.

१. संस्कृत भाषा हा हिंदु संस्कृतीचा गाभा आहे. या देववाणीत सर्व धार्मिक विधींची रचना झाली आहे. हे सर्व धार्मिक विधी काश्मीरपासून केरळपर्यंत केवळ संस्कृत भाषेत म्हटले जातात.

यातून काश्मीरचे केवळ केरळचेच नव्हे, तर अवघ्या भारतवर्षाशी असलेले भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक नाते लक्षात येईल.

२. क्षेमेंद्र, मम्मट, अभिनवगुप्त, रुद्रट, कल्हण यांच्या सारख्या पंडितांनी अनेक विद्वत्तापूर्ण संस्कृत ग्रंथ निर्माण केले. धर्म आणि तत्त्वज्ञान या दोन्ही क्षेत्रांत काश्मिरी लोकांनी प्रशंसनीय कामगिरी केली होती.

पंचतंत्र हा सुबोध देणारा हिंदु संस्कृतीतील ग्रंथ काश्मीरमध्ये लिहिला गेला, हे किती जणांना ठाऊक आहे ?

३. काही सहस्र वर्षे काश्मीर हे संस्कृत भाषा आणि विद्या यांचे सर्वांत मोठे आणि श्रेष्ठ अध्ययन केंद्र होते. दहाव्या शतकापर्यंत भारतातील सर्व भागांतून विद्यार्थी तेथे अध्ययनाकरता जात असत. तत्त्वज्ञान, धर्म, वैद्यक, ज्योतिर्शास्त्र, शिल्प, अभियांत्रिकी, चित्रकला, संगीत, नृत्य इत्यादी अनेक विषयांत काश्मीर निष्णात होते.

हिंदूंच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ग्रंथांमध्ये त्यांचा अभिमानाने उल्लेख आहे; मात्र आज या गौरवशाली इतिहासाला भीषण वर्तमानाने पुसून टाकले आहे. आम्हाला ही परिस्थिती पालटायची आहे.

४. ललितादित्य, अवंतिवर्मा, यशस्कर, हर्ष या राजांनी अनेक विद्वानांना आणि कलावंतांना आश्रय देऊन संस्कृतीच्या विकासाला हातभार लावला. अनेक भव्य सुंदर मंदिरे बांधून शिल्पकलेची स्मारके करून ठेवली.

५. प्रत्यभिज्ञादर्शन नामक एक नवीन दर्शन काश्मीरमध्येच निर्माण झाले. म्हणून ‘काश्मिरीय’ या नावानेच ते प्रसिद्ध झाले. वसुगुप्त (इ.स.चे ८ वे शतक) हा काश्मिरी महापंडित या दर्शनाचा मूळ प्रवर्तक होय.

६. काश्मिरी क्रियापदात भारतीय आर्य वैशिष्ट्ये स्पष्टपणे आढळतात. काश्मिरी साहित्याचा झालेला विकास हाही त्याच्या भारतीय आर्य परंपरेचा द्योतक आहे.

ही भाषा अरबी किंवा रानटी उर्दू यांच्या बनावटीची नाही, तर देववाणी संस्कृतची कन्या आहे, हे लक्षात घ्या !

ऊ. नैसर्गिकदृष्ट्या

१. भारताचे नंदनवन : कालिदासाने काश्मीर म्हणजे दुसरा स्वर्गच असे लिहून ठेवले आहे. पृथ्वीतलावर कैलास हे सर्वोत्तम स्थान, कैलासावर हिमालय हे सर्वोत्तम स्थान आणि हिमालयात काश्मीर हे सर्वोेत्तम स्थान असे काश्मीरचा इतिहासकार कल्हण याने लिहून ठेवले आहे.

२. सर वाल्टर लारेन्स याने म्हटले आहे की, एकेकाळी काश्मिरात इतकी सुबत्ता आणि निरामयता होती की, तेथील स्त्रिया सृजनशीलतेत जणू भूमीशी स्पर्धा करत असत. भूमी जशी सकस धान्यसंपदा देई, तशी सुदृढ संतती त्या जन्मास घालीत.

पण आज काय घडत आहे ? त्याच काश्मीर खोर्‍यात ३० वर्षांच्या या महिलांची मासिक पाळी बंद होत आहे. हे सर्व दुर्दैवी आहे !


Multi Language |Offline reading | PDF