बौद्ध तरुणीने मुसलमानाशी विवाह केल्याने लडाखमध्ये तणाव

लडाख (जम्मू-काश्मीर) – एका बौद्ध तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केल्याने लडाख प्रांतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ‘द लडाख बुद्धिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष सेवांग थिनलिस यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना पत्र पाठवून ३० वर्षीय स्थानिक तरुणी स्टान्झीन सालडन आणि ३२ वर्षीय मुरताजा आगा यांच्यातील विवाह रहित करण्याची मागणी केली आहे. गेल्यावर्षी या दोघांनी विवाह केला आहे. देहलीत एका संस्थेत काम करतांना त्यांच्यात प्रेम जमले आणि त्यांनी विवाह केला. २०१५ मध्येच या तरुणीने धर्मांतर केले होते. वर्ष २००३ पासून आतापर्यंत ४५ बौद्ध मुलींनी मुसलमानांशी विवाह केला आहे.

‘मुसलमान तरुण बौद्ध धर्मातील तरुणींना विविध आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर त्यांना इस्लाममध्ये धर्मांतरित करतात. राज्यशासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि लडाख प्रांतातील जातीय सलोखा आणि शांतता बिघडू नये यासाठी बौद्ध मुलीला सुखरूप परत पाठवण्याचे नियोजन करा’, असे या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणात या संघटनेकडून पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्नही केला जात आहे. या संघटनेच्या नेत्या पी.टी. कुजैंग म्हणाल्या की, आम्ही याचा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत विरोध करत राहू.


Multi Language |Offline reading | PDF