कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखालील ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थे’त ‘भाकप’चे बेहिशोबी लक्षावधी रुपये ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

देणगी, खंडणी, काळा पैसा यांपैकी एका कारणावरून कॉ. पानसरे यांचा खून झाल्याची शक्यता !

डावीकडून श्री. सुनील पाटील, श्री. मनोज खाडये, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. संभाजी साळुंखे, श्री. महेश उरसाल, आणि श्री. संजय कुलकर्णी

कोल्हापूर, १२ सप्टेंबर (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर येथील ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थेत’ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लक्ष ५१ सहस्र ३५२ रुपयांची बेहिशोबी रक्कम ठेवली आहे. भाकपने या लक्षावधी रुपयांचा कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही. त्यामुळे या काळ्या पैशांची सखोल चौकशी शासनाने अंमलबजावणी संचालनालय अन् केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्याद्वारे करावी. हा पैसा एकतर काळा पैसा असेल अथवा देणगी, खंडणी या माध्यमातून पतसंस्थेत जमा होऊन या तिन्हीपैकी एका कारणावरून कॉ. पानसरे यांची हत्या झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या बेहिशोबी रकमेची चौकशी करून या प्रकरणाचे संपूर्ण अन्वेषण करावे आणि कॉ. पानसरे, दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या खुनांच्या मागील कारण आर्थिक अपव्यवहार आणि नक्षलवाद्यांशी संबंध तर नाही ना, या दृष्टीने शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी कोल्हापूर येथे १२ सप्टेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थेती’ल बेहिशोबी रकमेची सविस्तर माहिती दिली.

कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की,

१. कॉ. गोविंद पानसरे हे येथील साम्यवाद्यांचे नेते होते. तसेच ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सचिव होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली ‘श्रमिक प्रतिष्ठान’, ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्था’ अशा अनेक संस्था अन् संघटना चालत होत्या.

२. यातील ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थे’च्या लेखापरीक्षण अहवालांचा अभ्यास केला, तर वर्ष २०१५-१६ मध्ये या पतसंस्थेत ‘आयटक’ आणि ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी’ अशा दोन साम्यवादी संघटनांच्या ठेवी आहेत. या ठेवी याच वर्षी ठेवलेल्या आहेत, असे नसून त्या आधीपासून ठेवल्या गेलेल्या असाव्यात.

३. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा राष्ट्र्रीय स्तरावर नोंदणी झालेला राजकीय पक्ष असून त्याला आयकर आणि निवडणूक आयोग अशा दोन्हींकडे आपली आर्थिक कागदपत्रे सादर करावी लागतात. अशा ठेवींवरचे व्याज करपात्र असते. त्यामुळे या ठेवी आणि त्यावरचे उत्पन्न पक्षाने दाखवले आहे का, याचा शोध घेतला असता असे लक्षात आले की, भाकपने या ठेवी निवडणूक आयोगाकडे प्रविष्ट केलेल्या आपल्या लेखापरीक्षण अहवालात दाखवलेल्याच नाहीत. धक्कादायक गोष्ट म्हणजे लेखापरीक्षकांनी मान्यच केले आहे की, भाकपची राज्यस्तरीय कार्यकारिणी आणि पक्षघटक यांनी आपले आर्थिक कागदपत्रे सादर केलेली नाहीत.

४. देशस्तरावरील पक्षाचे एकाच ठिकाणी आर्थिक अहवाल सादर होतात. त्यामुळे जर या पतसंस्थेतील ठेवी पक्षाने आपल्या देशस्तरीय आर्थिक कागदपत्रांत दाखवल्या नसतील, तर त्यातून त्याची खालील कारणमीमांसा असू शकते.

अ. पक्षाच्या वतीने पानसरे/अन्य कार्यकर्ते पक्षाचा हा काळा पैसा सांभाळत होते.

आ. पक्षाला ठाऊक नसतांना पानसरे/अन्य कार्यकर्ते स्वत:चा काळा पैसा पक्षाच्या नावावर ठेवत होते.

इ. अन्य कोणाचा तरी काळा पैसा पक्षाच्या वतीने सांभाळला जात होता.

५. कॉ. पानसरे यांची हत्या झालेली आहे आणि त्यातही आधी किटाळ मुद्दाम हिंदुत्वनिष्ठांंवर टाकण्यात आले होते. त्यामुळे या प्रकाराला अधिक महत्त्व आले आहे. आता पोलीस यंत्रणेला स्वत:लाच माहिती नाही की खून समीर गायकवाड याने केला कि अन्य कोणी, अशी परिस्थिती आली आहे. ज्या पिस्तुलाने पानसरे यांचा खून झाला ते पिस्तुल सीबीआयच्या कह्यात होते आणि खुनानंतर पुन्हा सीबीआयकडे परत पोचले आहे; मात्र येथील पोलीस आता नाईलाजाने अन्वेेषणाची ती दिशा टाळत आहेत.

६. गौरी लंकेश यांच्या प्रकरणातही भविष्यात असे संकट ओढवू नये यासाठी कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार आणि कर्नाटक पोलीस यांनी आताच गौरी लंकेश यांच्याही आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी. त्यांचे भ्रमणभाष संभाषण, बँक खात्यांचे, आर्थिक व्यवहारांचे असे सगळे तपशील पडताळावेत, ही काळाची आवश्यकता आहे. तसेच पुरोगाम्यांच्या या काळ्या पैशांच्या व्यवहाराची माहिती आम्ही पंतप्रधान, अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय, आयकर विभाग, केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभाग, पोलीस यांनाही दिलेली आहे; मात्र यांपैकी कोणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही.

७. यापूर्वी येथील पथकर प्रश्‍नावरून कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली आहे का ? याविषयी अन्वेषण करण्याची मागणी आम्ही गेल्या वर्षी पत्रकार परिषदेत केली होती. प्रत्यक्षात पोलिसांनी या दिशेने कोणतेच अन्वेषण केले नाही. श्रमिक पतसंस्थेतील बेहिशोबी रकमेमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा संबंध नसेल, तर नक्षलवाद, काळा पैसा, देणग्या यांपैकी कोणत्या कारणावरून कॉ. पानसरे यांची हत्या झाली आहे, याचे अन्वेषण व्हायला हवे.

८. बेंगळुरू येथील मार्क्सवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनामागे ‘नक्षलवाद्यांचा हात असू शकेल’ अशी शक्यता गौरी लंकेश यांचा सख्खा भाऊ इंद्रजीत लंकेश यांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला एक नवीन परिमाण प्राप्त झाले. गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर लगेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर आरोप करून एकप्रकारे अन्वेषण करणार्‍या यंत्रणांवर दबाव आणण्याचे काम पुरोगामी आणि कम्युनिस्ट मंडळी करत आहेत.

९. कॉ. पानसरे यांचा खून सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांनी केलेला आहे, अशी ओरड कॉ. भारत पाटणकर यांसह पुरोगामी मंडळी करत होती. आता भारत पाटणकर यांनी कॉ. पानसरे यांचा खून सनातनचे साधक श्री. सारंग अकोलकर आणि श्री. विनय पवार यांनी केल्याचा आरोप केला आहे. वास्तविक यामागे इतरांनी दुसरा कोणताच विचार करू नये, यासाठी पाटणकर असे आरोप करत आहेत का ? पाटणकर यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांविषयी किती लढतात, हे वेगळे सूत्र असून कॉ. पानसरे खून प्रकरणातील रहस्य पुढे येऊ नये, यासाठी ते असे बेताल आरोप करत आहेत का ?

१०. कॉ. पानसरे यांच्याप्रमाणे कामगार नेते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयने योग्य पद्धतीने केलेले नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांनी त्यांच्या संस्थेत केलेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी योग्य पद्धतीने केली असती, तर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील खरे मारेकरी सापडले असते; मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वैचारिक आतंकवाद पसरवून हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी करण्याचे कारस्थान पुरोगाम्यांचे चालू आहे.

पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर

पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष श्री. संजय कुलकर्णी, सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे उपस्थित होते.

कोल्हापूर पत्रकार परिषदेतील प्रश्‍नोत्तरे

१. श्रमिक पतसंस्थेत बेहिशोबी रक्कम असेल, तर त्याला कॉ. गोविंद पानसरे कसे उत्तरदायी असतील ?

उत्तर – श्रमिक प्रतिष्ठान ही संस्था साम्यवाद्यांची आहे. त्याचे नेतृत्व कॉ. पानसरे करत होते. तसा त्यांच्या संकेतस्थळावरही तसा उल्लेख केला आहे. त्यामुळे पतसंस्थेत रक्कम किती आहे, ती रक्कम कशी आली, याची माहिती कॉ. पानसरे यांना होती. भलेही कॉ. पानसरे यांचा या पैशाशी काही संबंध नसेल, तर एवढी रक्कम आली कशी ? याचे अन्वेषण पोलिसांनी करायला हवे होते.

२. श्रमिक पतसंस्थेत अध्यक्ष, उपाध्यक्ष असतांना तुम्ही कॉ. पानसरे यांनाच कसे उत्तरदायी ठरवता ?

उत्तर – कोणत्याही बँकेत लिपिकाने घोटाळा केला, तर लिपिकासह बँकेच्या अध्यक्षांनाही उत्तरदायी ठरवून त्यांनाही नोटीस पाठवली जाते; कारण बँकेच्या अध्यक्षांचे सर्व गोष्टींवर लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच एका पत्रकाराने चुकीची बातमी दिली; म्हणून अब्रू नुकसानीचा दावा ठोकतांना पत्रकाराऐवजी संपादक, मुद्रक यांनाही उत्तरदायी ठरवून त्यांनाही नोटीस पाठवली जाते. तोच प्रकार श्रमिक पतसंस्थेमध्ये घडला आहे. बँकेच्या अनेक शाखा असतांना त्याकडे लक्ष देण्यास बँकेच्या अध्यक्षांना वेळ नाही, हे एकवेळ मान्य करू; मात्र श्रमिक पतसंस्थेत ५ सभासद वगळता इतर सर्वांची खाती कम्युनिस्ट लोकांचीच आहेत. त्यामुळे त्याची माहिती कॉ. पानसरे यांना असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मूळ विषयावर प्रश्‍न न विचारता सनातनद्वेषाविषयी प्रश्‍न विचारणारा एक पत्रकार !

एका पत्रकाराने ‘हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याने उदबत्ती खरेदी व्यवहारात घोटाळा केला, तर तुम्ही डॉ. जयंत आठवले यांना उत्तरदायी ठरवणार का ?’ असा प्रश्‍न विचारला. वास्तविक ही पत्रकार परिषद श्रमिक पतसंस्थेतील बेहिशोबी रकमेविषयी असतांना त्या पत्रकाराने केवळ सनातनद्वेषापोटी मूळ विषयाला बगल देऊन असा प्रश्‍न विचारला.

(१. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे सेवा म्हणून सर्व कार्य करतात. येथे प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला जातो. त्यामुळे भ्रष्टाचार करून अथवा बेहिशोबी रक्कम जमा करण्यासारखे प्रकार येथे घडत नाहीत ! साधक आणि कार्यकर्ते स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून धर्मप्रसार करतात. त्यामुळे येथे घोटाळे आणि भ्रष्टाचार यांना स्थान नाही !

२. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संस्थांचे प्रतीवर्षी लेखापरीक्षण केले जाते. गेल्या १७ वर्षांमध्ये लेखापरीक्षकांनी या दोन्ही संस्थांना ‘अ’ वर्गाच्या लेखापरीक्षणाचा दर्जा दिला आहे. असे असतांना असा प्रश्‍न विचारणे म्हणजे त्या पत्रकाराचे अज्ञानच म्हणावे लागेल !

– संपादक) 


Multi Language |Offline reading | PDF