सिंहगडाच्या बांधकाम-दुरुस्तीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटना

शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचार्‍यांपासून वाचवा !

पुणे येथील पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री सुधाकर संगनवार, पू. सुनील चिंचोलकर, शंभू गवारे, प्रवीण नाईक, पराग गोखले

पुणे / पिंपरी, १२ सप्टेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला, तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलीदानामुळे अजरामर झालेला किल्ले सिंहगड हा समस्त शिवप्रेमींच्या श्रद्धेचा विषय आहे; मात्र वर्ष २०१२-२०१४ मधील या किल्ल्याच्या १ कोटी ३९ लाख रुपयांच्या बांधकाम-दुरुस्तीमध्ये कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे. या संदर्भातील अहवाल ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शिवाजीनगर, पुणे’ यांनी ८.५.२०१४ या दिवशी जिल्हाधिकारी आणि संबंधित यांना सादर केला आहे. त्यावर संबंधितांकडून खुलासा मागवण्याच्या पलीकडे शासनाने काहीही कारवाई केलेली नाही. यात दोषी असलेले कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी यांना हेतूपुरस्सर पाठीशी घातले जात आहे, असे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे कंत्राटदाराला प्रथम काळ्या सूचीत घालून त्याच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्यात यावेत. बांधकाम दुरुस्तीत झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून व्याजासह वसूल करण्यात यावी, तसेच किल्ल्याची डागडुजी प्रामाणिक आणि तज्ञ कंत्राटदाराकडून तातडीने करवून घेण्यात यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. असे न झाल्यास शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या साहाय्याने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील सहभागी संघटनांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे आणि पिंपरी येथे १२ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदा पार पडल्या.(किल्ल्यांच्या डागडुजीमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करण्याची चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद नव्हे का ? ज्या छत्रपतींनी गड-किल्ल्यांच्या साहाय्याने पाच पातशाह्यांना नेस्तनाबूत केले तेथे भ्रष्टाचार होणे हे महाराजांचा इतिहास डागाळण्यासारखे आहे. याविषयी सरकारकडून त्वरित कारवाईची अपेक्षा आहे. – संपादक)

पुणे येथील पत्रकार परिषदेला ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर, योग वेदांत सेवा समितीचे श्री. सुधाकर संगनवार, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि या चळवळीचे समन्वयक श्री. प्रवीण नाईक हे उपस्थित होते.

गडकिल्ल्यांवरील कामामध्ये भ्रष्टाचार होणे, ही शोकांतिका ! – पू. सुनील चिंचोलकर

दुर्ग आणि गडकोट ही आधुनिक तीर्थक्षेत्रे आहेत. तरुणांचे ते प्रेरणास्रोत आहेत. तेथे भ्रष्टाचार होणे, ही शोकांतिका आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधले जाते, तर दुसरीकडे त्यांच्या जीवनमूल्यांची पायमल्ली केली जाते. ही विसंगती थांबली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भ्रष्टाचाराची एकही घटना घडली नव्हती. त्यांचा आदर्श खर्‍या अर्थाने कृतीत आणणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.

श्री. सुधाकर संगनवार म्हणाले, ‘‘सिंहगडाच्या डागडुजीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात छेडलेल्या आंदोलनाला योग वेदांत सेवा समितीच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे. या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभागी होऊन आम्ही हे आंदोलन तडीस नेऊ.’’

या प्रकरणी १६ सप्टेंबरला चिंचवड येथील डांगे चौकात, तर १७ सप्टेंबर या दिवशी पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्री. प्रवीण नाईक यांनी दिली. श्री. शंभू गवारे यांनी सिंहगडाच्या डागडुजीचे बांधकाम कसे निकृष्ट दर्जाचे झाले आहे, याची छायाचित्रांसह माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी मोहिमेचा उद्देश सांगितला.

चिंचवड – येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक, श्री. शंभू गवारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख श्री. सचिन थोरात यांनी संबोधित केले.

भ्रष्टाचारमुक्त सिंहगडासाठी तीव्र आंदोलन छेडू ! – श्री. सचिन थोरात, पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

डावीकडून सर्वश्री सचिन थोरात, शंभू गवारे, प्रवीण नाईक, पराग गोखले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांमुळे तेव्हाच्या काळात देश उभा राहिला. नरवीर तानाजी मालुसरे यांचे बलीदान झालेल्या किल्ले सिंहगडावर भ्रष्टाचार होणे संतापजनक आहे. तेथील संवर्धनाची कामे योग्य रितीने व्हायला हवी होती. सरकारने भ्रष्टाचार्‍यांवर कडक कारवाई केली पाहिजे. अन्यथा किल्ले सिंहगडच्या बांधकाम-दुरुस्तीच्या संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू.

काय आहे प्रकरण ?

सिंहगडाच्या बांधकाम-दुरुस्तीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची काही उदाहरणे !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहितीच्या अधिकारात या किल्ल्याची पाहणी केलेला ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे’ यांचा अहवाल मिळवला आहे. त्यात पुढील गोष्टी आढळून आल्या आहेत.

१. बांधकामाचा दर्जा निकृष्ट

अ. बांधकामाच्या अंदाजपत्रकानुसार प्रकल्पाची रक्कम आणि प्रत्यक्ष कामातील खर्च यात २५ टक्क्यांपर्यंतची तफावत दिसून येते.

आ. बांधकामाचा दर्जा ठरलेल्या मानांकाप्रमाणे नाही. दगडी बांधकामाचा अभिलेख (रेकॉर्ड) नाही.

इ. दगडी बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून मूळ बांधकामाशी विसंगत आहे. बांधकामातील प्रत्येक दोन दगडांच्या मधील सांधा व्यवस्थित बसवलेला नाही.

ई. बांधकामाची चाचणी/पडताळणी केलेली नाही. किल्ल्याचे बांधकाम अकुशल कारागिरांकडून केल्याचे निदर्शनास येते.

उ. काँक्रिटची पडताळणी केलेली नाही.

२. टाक्यांतील गाळ काढल्याचे सहस्र पटींनी वाढवलेले आकडे !

अंदाजपत्रकात गाळ काढण्यासाठी केलेली तरतूद ही एकूण अंदाजपत्रकाच्या ७० टक्के दाखवली असून वस्तूत: प्रत्यक्ष केलेल्या कामात प्रचंड तफावत आहे.

अ. टाकी क्रमांक ३० मध्ये मोजणी पुस्तकाप्रमाणे १ सहस्र ३८० क्युबिक मीटर गाळ काढल्याचे दाखवले आहे; मात्र प्रत्यक्षात केवळ २ क्यु.मी. गाळ काढल्याचे दिसते.

आ. टाकी क्रमांक २५ मध्ये मोजणी पुस्तकाप्रमाणे ४७४.३ क्यु.मी. गाळ काढल्याचे दर्शवले आहे; मात्र प्रत्यक्षात अगदी अल्प प्रमाणात खाणकाम झाल्याचे दिसते.

इ. टाकी क्र. २१ (हत्ती टाकी) मध्ये मोजणी पुस्तकानुसार २०३६.१५ क्यु.मी. इतक्या मोठ्या प्रमाणावर गाळ काढल्याचे दाखवले आहे; मात्र प्रत्यक्षात २ ते ३ क्यु.मी. इतकाच गाळ काढल्याचे दिसून येते. यातून स्पष्ट होते की, या हत्ती टाकीतून २४० ट्रक इतका गाळ काढल्याचे दाखवले आहे; मात्र प्रत्यक्षात एवढा गाळ साठवण्याची त्या टाकीची क्षमताच नाही.

३. ज्यांना प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदार म्हणून काम दिले गेले, त्यांना पुरातत्व बांधकामाविषयी कोणताही अनुभव नसल्याचे लक्षात येत आहे.

४. पुरातत्व विभागाच्या बांधकामाविषयी असणार्‍या बंधनकारक तरतुदींचे पालन संपूर्ण प्रकल्पात कोठेही झालेले नाही. गडावरील मोठ्या भूभागावरील झाडे, झुडपे, गवत काढल्याचे दाखवले आहे; मात्र प्रत्यक्षात हे कामच केल्याचे दिसून येत नाही. एकूणच ‘कंत्राटातून झालेल्या कामामुळे या किल्ल्याच्या मूळ बांधकामाची हानीच अधिक झालेला आहे’, असा शेराही या अहवालात ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे’ने मारलेला आहे.

५. प्रकरण एवढे गंभीर असतांना आणि दीड कोटी रुपयांची रक्कम गुंतलेली असतांना ३ वर्षांनी सं.वि. दळवी या एका कनिष्ठ अभियंत्याच्या विरोधात विभागीय चौकशी लावून एप्रिल २०१७ मध्ये त्यांच्या केवळ २ वेतनवाढींमध्ये कपात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त काहीही कारवाई झालेली नाही. हे प्रकरण दिसते, तेवढे साधे नाही. हे अत्यंत गंभीर आहे. हा सामूहिक भ्रष्टाचाराचा प्रकार असून तो दाबण्यात आला आहे, हे स्पष्ट दिसते. त्याची आजमितीला दिसणारी कारणे खालीलप्रमाणे आहेत.

अ. निविदा काढण्याआधी जो निविदापूर्व अभ्यास होता, तो कोणीच तपासला नसेल, तर केवळ कनिष्ठ अभियंता कसा उत्तरदायी असू शकतो ? अन्यही अधिकार्‍यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

आ. जर कनिष्ठ अभियंत्याने जाणीवपूर्वक अन्य कोणालाही न दाखवता निविदा काढली असेल, तर ते एकूण प्रक्रियेत कुठेही लक्षात आले नाही अथवा थांबवले गेले नाही, असे कसे होऊ शकते ? अन्यही अधिकारी या प्रकरणी उत्तरदायी नाहीत का ?

इ. पुरातत्व खात्याच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता किती रकमेपर्यंतची निविदा काढू शकतो आणि पारित करून घेऊ शकतो, याचे काही निकष असणे आवश्यक आहे. ‘एक कोटीहून अधिक रकमेची निविदा खात्यात कोणालाही न कळता संमत होऊन असा भ्रष्टाचार होतो’, हे अविश्‍वसनीय आहे. त्यामुळे हा संघटित भ्रष्टाचार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

समर्थभक्त पू. चिंचोलकर यांनी दिलेले निवेदन

शासनकर्ते भ्रष्ट असल्यानेच अधिकारी भ्रष्टाचार करण्याचे धाडस करू शकतात !

‘वर्ष १६४५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड जिंकल्यानंतर त्या ठिकाणी बांधकाम चालू केले. विहिरी, तलाव खणणे, तटबंदी भक्कम करणे, या गोष्टी त्यांनी चालू केल्या. बांधकाम करतांना एके ठिकाणी कामगारांना सुवर्णमुद्रांनी भरलेले दोन हंडे सापडले. ते हंडे कामगारांनी जसेच्या तसे सरकारी तिजोरीत जमा केले. कुणालाही कसलाही मोह झाला नाही; कारण महाराजांचे चारित्र्य निष्कलंक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दित भ्रष्टाचाराची एकही घटना घडली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सूरत लुटली, तेव्हा मिळालेले सर्व सोने आणि संपत्ती सरकारी तिजोरीत जमा केली. ज्या सिंहगडावर तानाजी मालुसरे यांनी ‘आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे’ असे सांगून किल्ला जिंकतांना प्राणार्पण केले, त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार घडावा, ही केवढी मोठी शोकांतिका आहे ? आज महाराज असते, तर त्यांनी काय केले असते, याची कल्पनाच केलेली बरी ! कुठेतरी राज्यकर्ते भ्रष्ट असल्यानेच अधिकारी भ्रष्टाचार करण्याचे धाडस करू शकतात. ही घटना गंभीरपणे घ्यायला हवी.

स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी

शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ॥’

 


Multi Language |Offline reading | PDF