हिदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यापेक्षा डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांविषयी अन्वेषण होणार का ?  रमेश शिंदे

डावीकडून सौ. नयना भगत, श्री. रमेश शिंदे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर

मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सदस्य राहिलेले कॉ. गोविंद पानसरे यांच्या कोल्हापूर येथील पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लक्षावधी रुपयांच्या ठेवी असल्याचे उघड झाले आहे. बेंगळुरू येथील मार्क्सवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे ‘नक्षलवाद्यांचा हात असू शकेल’, अशी शक्यता गौरी लंकेश यांचा सख्खा भाऊ इंद्रजीत लंकेश यांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला एक नवीन परिमाण प्राप्त झाले. ‘पुरोगामी-साम्यवादी’ यांची हत्या झाली की त्वरित हिंदुत्वनिष्ठांकडे बोट दाखवायचे’, या साम्यवादी अंधश्रद्धेला तडा देणारी ही घटना महत्त्वाची आहे. आजवर हिंदुत्वनिष्ठांनाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करून अन्वेषण केले जात आहे; मात्र या तथाकथित पुरोगामी आणि साम्यवादी मंडळींनी समाजहिताच्या नावाखाली जमवलेली बेहिशोबी मालमत्ता आणि आर्थिक घोटाळे यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यापेक्षा डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांविषयी अन्वेषण होणार का ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी १२ सप्टेंबर या दिवशी मुंबई येथील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या.

या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले,

१. कॉ. गोविंद पानसरे हे भाकपचे राष्ट्रीय सदस्य होते. त्यांच्या पक्षाचा निधी त्यांच्या पतसंस्थेत आहे, याविषयी त्यांना माहीत होते का ? माहित होते तर ऑडिटमध्ये हा हिशेब का दाखवला गेला नाही आणि जर माहित नसेल, तर का माहीत नव्हते ? का भाकपच्या कुणा पदाधिकार्‍याने पक्षाच्या नावे हे पैसे पतसंस्थेत ठेवले ? या काळ्या धनाचे अन्वेषण का होत नाही. या पैशांतून या हत्या झाल्या नाहीत ना ? याविषयी का अन्वेषण होत नाही ? केवळ हिंदुत्वनिष्ठांना का लक्ष्य करण्यात येत आहे ?

२. भारत पाटणकर सनातनच्या आश्रमात कोंबिंग ऑपरेशन करण्याची भाषा करतात; मात्र आतापर्यंत सर्व अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या आश्रमात येऊन सर्व साधकांची नावानिशी माहिती घेऊन अन्वेषण केले आहे. त्यांना सनातनच्या आश्रमात कोणताही अनुचित प्रकार आढळलेला नाही. तर मग या सर्व अन्वेषण यंत्रणांपेक्षा भारत पाटणकर यांना अधिक कळते का ?

३. प्रत्येक वेळी हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यापेक्षा डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या संस्थांमध्ये झालेला पैशांचा गैरव्यवहार, नक्षलवाद्यांचा संंबंध यांविषयी अन्वेषण झाल्यास या हत्यांचा तपास लागू शकेल.

सर्व अन्वेषणात सनातनची पारदर्शकता पुढे आली आहे !  सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

डॉ. दाभोलकर यांच्या हत्या असो वा कॉ. पानसरे यांची हत्या असो, या हत्यांमागे हिंदुत्वनिष्ठ आहेत, असा आरोप करून अन्वेषणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारे आरोप करून हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदुत्वनिष्ठांवर आरोप करून अन्वेषणाला भरकटवण्याचे प्रकार थांबवावेत. या सर्व प्रकारच्या अन्वेषणात मात्र सनातनची पारदर्शकता पुढे आली आहे.

पत्रकार परिषदेच्या वेळी साम टी.व्ही., जय महाराष्ट्र, जनादेश, सुदर्शन वाहिनी आदी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. रमेश शिंदे यांच्या मुलाखती घेतल्या.

कॉ. पानसरे जिवंत असते, तर त्यांना बेहिशोबी मालमत्तेविषयी जाब द्यावा लागला असता !  अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारी पतसंस्थेच्या एका शहर शाखेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ४५ लक्ष रुपयांहून अधिक ठेवी बेहिशोबी ठेवण्यात आल्या. भाकपने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या मालमत्तेमध्ये तसेच इन्कमटॅक्स विभागाकडे हा हिशोब दाखवलेला नाही. अशा पतसंस्थांच्या माध्यमातून जर नक्षलवादी कारवायांसाठी पैसा जाऊ लागला तर त्यावर नियंत्रण कुणाचे रहाणार ? कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्थेत ठेवलेल्या या बेहिशेेबी निधीतून त्यांची हत्या झाली आहे का ? कॉ. पानसरे आता जिवंत असते, तर त्यांच्या पतसंस्थेतील बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी त्यांना जाब द्यावा लागला असता.

या वेळी अधिवक्ता पुनाळेकर म्हणाले,

१. जर कॉ. पानसरे जिवंत असते, तर त्यांना या पतसंस्थेतील बेहिशोबी मालमत्तेविषयी न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले असते.

२. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका शहर शाखेत भाकपच्या एका मोठ्या प्रमाणात बेहिशोबी निधी असेल, तर नक्षलग्रस्त चंद्रपूर, झारखंड, गडचिरोली या ठिकाणी किती निधी असेल ?

३. कॉ. पानसरे यांच्या पतसंस्थेत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आहे, याची माहिती भाकपला होती का ? हा निधी हिशेबात का दाखवला गेला नाही, याचे अन्वेषण झाल्यास कॉ. पानसरे यांच्या हत्येचे धागेदोरे मिळू शकतील.

४. सनातन संस्थेने यांचे भांडाफोड केल्यामुळे सनातनवर आरोप करण्यात येत आहेत; मात्र आम्ही न्यायालयीन प्रक्रियेने लढा देत असतांना आम्ही हत्या कशासाठी करू ?

५. सर्व अन्वेषण यंत्रणांनी १९९८ पासूनचे सनातन संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार पडताळले आहेत; मात्र कुठेही गैरव्यवहार आढळलेला नाही. आम्हाला विदेशातून पैसा येत नाही. त्याप्रमाणे अंनिस आणि कॉ. पानसरे यांच्या पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार तपासल्यास त्यांच्या हत्येमागील कारणे सापडू शकतील.


Multi Language |Offline reading | PDF