सभाधीट, प्रेमळ आणि देवाची आवड असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील कु. आनंदी अभिजीत कुलकर्णी (वय ६ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आनंदी कुलकर्णी ही एक आहे !

भाद्रपद कृष्ण पक्ष सप्तमी (१२.९.२०१७) या दिवशी संभाजीनगर येथील दैनिक सनातन प्रभातच्या वाचिका सौ. शारदा प्रभाकरराव कुलकर्णी यांची नात कु. आनंदी कुलकर्णी हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई, आजी आणि साधक यांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. आनंदी अभिजीत कुलकर्णीहिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. दैनिक सनातन प्रभातच्या नित्य वाचनानंतर आईचे मन प्रसन्न असणे आणि या सकारात्मकतेचा आई अन् गर्भ यांवर चांगला परिणाम होणे : ‘मला माझ्या कृतीनुसार गर्भाच्या हालचाली जाणवत असत. त्या काळात माझे मन अतिशय प्रसन्न होते. दैनिक सनातन प्रभातच्या नित्य वाचनानंतर आणि त्यात सांगितल्यानुसार कृती केल्यानंतर आमचे कौटुंबिक वातावरण प्रसन्न झाले. या सकारात्मकतेचा माझ्यावर आणि गर्भावर निश्‍चितच चांगला परिणाम झाला.’

– सौ. माधुरी अभिजीत कुलकर्णी (आनंदीची आई), संभाजीनगर

१ आ. दैनिक सनातन प्रभातच्या वाचनानंतर सुनेच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : ‘सनातन संस्थेच्या साधिका आमच्या घरी आल्यावर त्यांनी माझ्या सुनेला (आनंदीच्या आईला) दैनिक सनातन प्रभात, तसेच या काळात करावयाचे आचार आणि विचार, यांविषयीची माहिती दिली. दैनिक सनातन प्रभातच्या वाचनानंतर तिच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिला कोणत्याही प्रकारचा ताण आला नाही आणि भीती वाटली नाही. घरातही काही पालट झाले.

२. जन्मानंतर

२ अ. काहीही त्रास न होता बाळाचा जन्म होणे, आधुनिक वैद्यांना आश्‍चर्य वाटणे आणि त्यांनी ‘जणू लक्ष्मी तुमच्याकडे आली’, असे सांगणे : १९.९.२०११ या दिवशी आम्ही रुग्णालयात गेल्यावर अवघ्या १० मिनिटांतच सायंकाळी ७.१५ वाजता सुनेला काहीही त्रास न होता बाळाचा जन्म झाला. तेथील आधुनिक वैद्यांनी आश्‍चर्य व्यक्त करून बाळाचा तोंडवळा पाहून त्याला रुग्णालयातील देवघराजवळ नेले. ते म्हणाले, ‘‘जणू लक्ष्मी तुमच्याकडे आली.’’ बाळाच्या जन्मानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला. तिच्या आणि आई यांच्या तोंडवळ्यावर तेज आले होते. आम्हाला सर्वांना ठाऊक होते, ‘हे सनातनच्या संस्कारामुळे झाले.’

२ आ. आनंदी हसतमुख आणि नावाप्रमाणेच आनंदी आहे. ती घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे हसतमुखाने स्वागत करते.

२ इ. ती चालायला आणि बोलायला लवकर शिकली.

२ ई. चांगली निरीक्षणक्षमता : ती समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकते आणि लगेचच तंतोतंत म्हणून दाखवते.’

– सौ. शारदा प्रभाकरराव कुलकर्णी (आनंदीची आजी), संभाजीनगर

२ ऊ. शिकण्याची वृत्ती : ‘आनंदी लहान असूनही तिला रांगोळी काढता येते. ती सर्वांसाठी ‘पोळी बनवते’, असे म्हणते आणि ती बनवूनही देते. तिला नवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.

२ ए. आनंदी शाळेतील कार्यक्रमांत सूत्रसंचालन करते. तिचे उच्चार स्पष्ट आहेत. एकदा वाचलेले तिच्या लक्षात रहाते.

२ ऐ. ती घरात सर्वांना जेवायला वाढते आणि त्यांना पाणी आणून देते.

२ ओ. आरती केल्यावर ती सर्वांना देते. तिला देवाची भक्ती करायला आवडते.’

– कु. चैताली डुबे, संभाजीनगर (ऑगस्ट २०१७)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF