देवाच्या सतत अनुसंधानात असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा नाशिक जिल्ह्यातील चि. सात्त्विक उगले (वय २ वर्षे ५ मास) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. सात्त्विक उगले हा एक आहे !

चि. सात्त्विक उगले

१. जन्मापूर्वी

१ अ. ‘पोटात बाळकृष्ण आहे’, असे आईला वाटणे : ‘माझी पत्नी सौ. वैशाली हिला दिवस गेल्यावर तिला सतत वाटायचे की, आपल्या पोटात बाळकृष्ण आहे. ‘आम्हाला पहिली मुलगी आहे. दुसरा मुलगा होईल’, असेही तिला सतत वाटायचे.

१ आ. गर्भारपणात आईने केलेली साधना : वैशाली गर्भवती असतांना आरती आणि नामजप करायची. दिवसातून अनेकदा अत्तर आणि कापूर यांचे उपाय करायची. झोपण्यापूर्वी सांगितलेले सर्व उपाय ती न चुकता नियमितपणे करायची. झोपण्यापूर्वी दिवसभरात झालेल्या चुकांसाठी ती कान धरून क्षमायाचनाही करायची.

१ इ. दैनिक सनातन प्रभातमधील दैवी बालकांविषयीचे लेख वाचून त्यांनुसार कृती करणे : दैनिक सनातन प्रभातमध्ये बालसाधकांची गुणवैशिष्ट्ये छापून येतात. त्यात त्यांच्या जन्मापूर्वी जे प्रयत्न लिहिलेले असायचे, त्याप्रमाणे कृती करण्याचा ती प्रयत्न करायची.’

– श्री. शिवाजी उगले (चि. सात्त्विकचे वडील)

१ ई. यजमान धर्मजागृतीच्या सेवेसाठी गेल्यावर काळजी वाटणे आणि त्यानंतर श्रीकृष्ण जवळ असल्याचे जाणवणे : ‘९ मास (महिने) पूर्ण झाल्यानंतर केव्हाही प्रसूती होऊ शकते’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. त्या वेळी माझे यजमान हिंदु धर्मजागृती सभेच्या सेवेसाठी ५ दिवसांपासून नाशिकला गेलेले होते. त्या काळात यजमान जवळ नसल्यामुळे काही त्रास झाला, तर काय होणार ? अशी मला काळजीच वाटत होती. तेव्हा असा विचार आला, ‘ते नाहीत, तर देव आहे ना जवळ !’ त्यानंतर मात्र श्रीकृष्ण माझ्या जवळ असल्याचे मला सतत जाणवत होते. मला कोणताही त्रास झाला नाही. या काळात माझ्याकडून पुष्कळ भावपूर्ण प्रार्थना होत होत्या आणि माझा नामजपही चालू होता.

१ उ. दिवस पूर्ण होऊनही प्रसूती न झाल्याने चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला प्रार्थना केल्यावर  त्याच दिवशी प्रसूती होणे : ९ मास (महिने) पूर्ण झाले, तरी माझी प्रसूती होत नव्हती. तेव्हा मला पुष्कळ कंटाळा आला होता. २१.१२.२०१३ या दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याने माझा उपवास होता. मी श्री गणेशाला प्रार्थना केली, ‘देवा, आता मला याचा पुष्कळ कंटाळा आला आहे. आज तरी तू जन्माला ये.’ त्यानंतर माझे पोट दुखू लागले. रुग्णालयात गेल्यावर ‘सायंकाळी प्रसूती होईल’, असे आधुनिक वैद्यांनी मला सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी चि. सात्त्विकचा जन्म झाला.’

– सौ. वैशाली शिवाजी उगले (चि. सात्त्विकची आई)

२. जन्माच्या वेळी

२ अ. प्रसूतीच्या वेळी देवळातील आरती आणि शनिमंत्र ऐकू येणे : ‘ज्या ठिकाणी वैशालीची प्रसूती झाली, त्या ठिकाणी समोरच शनिदेवाचे आणि मारुतीचे देऊळ होते. तिच्या प्रसूतीपूर्वी तेथे आरती चालू होती आणि आरतीनंतर सतत शनिमंत्र चालू होता. हे सर्व तिला ऐकू येत होते.

२ आ. श्री गणेशाने प्रसादरूपी मोदक दिल्याचा पत्नीचा भाव असणे : सात्त्विकचा जन्म शनिवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी झाला. त्यामुळे ‘श्री गणेशाने बाळाच्या रूपात आपल्याला प्रसादरूपी मोदक दिला’, असा वैशालीचा भाव आहे.

३. जन्म ते २ वर्षे

३ अ. समजूतदार : सात्त्विक त्याच्या मोठ्या बहिणीकडे (कु. वेदिकाकडे) असलेली एखादी वस्तू कधीच ओढत नाही. उलट तिने एखादी वस्तू घेतली, तर तो दुसरी वस्तू घेऊन खेळतो किंवा शांत बसतो.

३ आ. सात्त्विक लहानपणापासून पुष्कळ हसरा आहे. कुणालाही तो हसूनच प्रतिसाद देतो.

३ इ. चि. सात्त्विकने ‘जय’ हा पहिला शब्द उच्चारला.

३ ई. सात्त्विक गोष्टींची आवड असणे

३ ई १. देवघराजवळ जाऊन खेळायला आवडणे : सात्त्विक नेहमी देवघराजवळ जाऊन बसतो. त्याला देवघराजवळ जाऊन खेळायला आवडते. देवघराजवळ जाऊन तो देवाकडे पहातो, टाळ्या वाजवतो आणि ‘जय जय’ असे म्हणतो.

३ ई २. प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ जाऊन त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करणे : खोलीतील एका भिंतीवर प.पू. डॉक्टरांचे उभे छायाचित्र लावले आहे. सात्त्विक त्या छायाचित्राजवळ जाऊन त्यांच्या चरणांवर डोके ठेवतो. ‘जय कर’, असे सांगितल्यावर (नमस्कार करण्यास सांगितल्यावर) मान खाली वाकवून लगेच डोके टेकवतो.

३ ई ३. आम्ही श्रीकृष्णाचा नामजप म्हटल्यावर सात्त्विकला पुष्कळ आनंद होतो आणि त्याच्या तोंडवळ्यावर हसू उमटते.

३ ई ४. ‘प.पू. बाबांना (प.पू. डॉक्टरांना) दूरभाष कर’, असे म्हटल्यावर तो कानाला हात लावून बोलण्याचा प्रयत्न करतो.

३ ई ५. देवाची आवड असणे : सात्त्विकला देवाची पुष्कळ आवड आहे. तो दत्तात्रेयांच्या छायाचित्रासमोर बसून आरती करतो. देवाला घास भरवतो. ‘जय बाप्पा’, ‘ॐ’ असा जप करतो, देवाला फुले अर्पण करतो. हातात उदबत्ती दिल्यानंतर तो सर्व देवतांच्या चित्रांना उदबत्तीने ओवाळतो. आजोबा देवपूजा करत असतांना सात्त्विक त्यांच्याजवळ जाऊन बसतो. घंटा आणि टाळ वाजवतो. त्याला देवळात जायलाही पुष्कळ आवडते.

३ ई ६. त्याच्या एकूण वागण्यावरून ‘तो सतत देवाच्या अनुसंधानात आहे’, असे वाटते.

३ ई ७. आश्रमात जाण्याची ओढ असणे : सात्त्विकला ‘आश्रमात बाबांकडे (प.पू. डॉक्टरांकडे) जायचे का ?’, असे विचारल्यावर लगेचच ‘हो’ म्हणतो आणि ‘तू कुणाचा आहेस ?’, असे विचारल्यावर ‘मी बाप्पाचा आहे’ किंवा ‘मी बाबांचा (प.पू. डॉक्टरांचा) आहे’, असे उत्तर देतो.

३ उ. सात्त्विक झोपतांना कधी हात जोडून, तर कधी एका हाताची मुद्रा करून झोपतो.

३ ऊ. सात्त्विककडे बघितल्यावर सर्व थकवा दूर होऊन मन प्रफुल्लीत होते. त्याच्या सहवासात नामजप करावासा वाटतो.

४. आलेली अनुभूती

झोळी अडकवलेली कडी आपोआप तुटून बाळ भिंतीकडे फेकले जाणे आणि प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राखाली असलेल्या आसंदीत अलगद पडल्याने त्याला काहीही न होणे : एकदा सात्त्विकला झोपवण्यासाठी झोळीत घातले आणि १ – २ हळुवार झोके दिले. झोळी ज्या कडीला (हूक) अडकवली होती, ती कडी आपोआप तुटली आणि झोळीसह सात्त्विक भिंतीकडे फेकला गेला. देवाच्या कृपेने तिथे असलेल्या एका आसंदीत तो झोळीसह अलगद पडला. त्याला लागले नाही. ती आसंदी नसती, तर त्याला पुष्कळ लागले असते. या आसंदीपासून दीड फूट उंचीवर प.पू. डॉक्टरांचे उभे छायाचित्र होते. प.पू. डॉक्टरांनीच सात्त्विकला अलगद उचलून चरणांवर घेतल्याची अनुभूती आम्हाला आली. त्यांच्याच कृपेने सात्त्विकचे रक्षण झाले.’

– श्री. शिवाजी उगले, कोठुरे, ता. निफाड, जि. नाशिक. (७.४.२०१६)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF