श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयीच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप नको ! – पुणे विद्यापिठाची विद्यार्थ्यांना सूचना

हिंदु जनजागृती समितीने शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या निवेदनाचा परिणाम

शासनाच्या स्तुत्य पुढाकाराविषयी कथित पर्यावरणवाद्यांची आगपाखड !

पुणे – गणेशोत्सव आला की, कथित पर्यावरणवाद्यांकडून श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याचा बागुलबुवा निर्माण केला जातो. कथित पर्यावरणवादी संघटनांकडून महाविद्यालयीन युवकांना हाताशी धरून भाविकांना श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यापासून अटकाव केला जातो. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ ऑगस्ट या दिवशी शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांना निवेदन देऊन ‘पुणे विद्यापिठाच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्यापासून थांबवावे’, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते. त्याची नोंद घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी ४ सप्टेंबर या दिवशी पत्रक काढले.

यात म्हटले, ‘मूर्ती विसर्जनाच्या वेळी विद्यार्थ्यांनी धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप करू नये किंवा त्याविषयी काळजी घ्यावी’, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना दिले. तरीही काही महाविद्यालयांचे विद्यार्थी पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली भाविकांना परंपरेप्रमाणे नदीमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यापासून परावृत्त करत असल्याचे चित्र होते. (शिक्षण विभागाने स्वतःहूनच भाविकांची दिशाभूल करणार्‍या आणि धर्मभावना दुखावणार्‍या उपक्रमात सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना प्रतिबंध केला पाहिजे. असे असले, तरी निवेदन दिल्यानंतर त्याची नोंद घेऊन तत्परतेने कार्यवाही करण्याची कृती योग्य आहे. – संपादक)

एका वृत्तपत्राने आणि धर्मविरोधी संघटनेने या संदर्भात आगपाखड केली आहे.

‘अंनिसच्या पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेला पाठिंबा देत तत्कालीन आघाडी सरकारने हा उपक्रम महाविद्यालय पातळीवर स्वीकारला होता. मूर्ती विसर्जनाच्या वेळी विद्यार्थ्यांनी धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आदेश देऊन सरकार अश्मयुगाकडे वाटचाल करत आहे’, अशी प्रतिक्रिया अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केली. (कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्ती विसर्जित करण्याचा उपक्रम पर्यावरणपूरक नाही, तर धर्मशास्त्रविरोधी आहे. कृत्रिम हौदांतील श्री गणेशमूर्ती पुन्हा नदीतच विसर्जित केल्या जात असल्याचे अथवा कचर्‍याच्या गाडीतून वहातूक करून खाणीत विसर्जित कल्या जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे कृत्रिम हौदांतील विसर्जन पर्यावरणपूरक म्हणणे हास्यास्पद आहे. याच अंनिसनेे कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असल्याचे सांगून सरकारची आणि भाविकांची दिशाभूल केली होती. राष्ट्रीय हरित लवादाने यातील फोलपणा लक्षात घेऊन कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींचा प्रसार करण्याच्या अध्यादेशावर स्थगिती आणली. सातत्याने तोंडघशी पडूनही पर्यावरणरक्षणाच्या बुरख्याच्या आडून धर्महानी करणार्‍या अंनिसचा दुटप्पीपणा यातून उघड होतो ! – संपादक)

एबीपी माझा वृत्तवाहिनीचा सनातनद्वेष !

एबीपी माझा वृत्तवाहिनीने ‘‘तो’ फतवा सनातनचा ?’ या मथळ्याखाली वृत्त देतांना सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतल्याचे दिसले. शिक्षण विभागाने सनातन संस्थेच्या हिंदु जनजागृती समितीच्या सांगण्यावरून फतवा काढल्याचे लक्षात आले, असे वृत्त सांगण्यात आले. (सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या दोन वेगळ्या संघटना असल्याचेही माहिती नसलेली एबीपी माझा वृत्तवाहिनी ! – संपादक) ‘सनातनच्या सांगण्यावरून शिक्षण विभाग काम करते ?’ अशा स्वरूपाचे उपमथळे दाखवण्यात येत होते.

पर्यावरणवाद्यांनी विद्यार्थ्यांचा वापर करून घेणे, हे घटनेच्या विरोधात ! – हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

१. राज्यघटनेच्या कलम २५ नुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा मूलभूत अधिकार आहे.

२. पर्यावरणवाद्यांनी विद्यार्थ्यांचा वरीलप्रमाणे वापर करून घेणे हे घटनेच्या विरोधात आहे.

३. गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांचा वापर करून घेणारी मंडळी बकरी ईदला होणारी प्राणीहत्या किंवा ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे यांच्या संदर्भातही विद्यार्थ्यांचा वापर करून घेणार का ?

४. काही शाळांमध्ये अंनिस, पुरोगामी, धर्मद्रोही मंडळी सरस्वती पूजनाला, सत्यनारायणाच्या पूजेला विरोध करतात. अशा व्यक्ती, संघटना यांचा धर्मावर विश्‍वास नाही. श्री गणेशमूर्ती विसर्जनासारख्या धार्मिक विधींमध्ये विद्यार्थ्यांचा वापर कसा केला जातो ?

५. काही शाळा आणि महाविद्यालये यांना शासकीय अनुदान मिळते. शासनाचे निधर्मी धोरण बघता विद्यार्थ्यांचा धार्मिक कारणांसाठी असा वापर करून घेणे, हे घटनाविरोधी असून धार्मिक विषयांमध्ये हस्तक्षेप आहे.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

अधिकार्‍यांनी अशा प्रकारचे पत्रक काढणे चुकीचे ! – विनोद तावडे, शिक्षणमंत्री

अशा प्रकारचे कोणतेही पत्रक त्या त्या ठिकाणच्या अधिकार्‍यांनी काढणे ही चूक आहे. त्यामुळे आम्ही पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांच्याकडे खुलासा मागितला आहे. तसेच ते पत्र दिल्यानंतर विद्यापिठाने पुढील कारवाई का केली, हे सुद्धा पहाणार आहोत. महाराष्ट्र सरकार पर्यावरणपूरकच गणेशोत्सव आणि अन्य सर्व उत्सव साजरे करण्यावर ठाम आहे. त्यामुळे अधिकार्‍यांची कृती चुकीची आहे, असे विधान विनोद तावडे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now