आखाडा परिषदेकडून १४ भोंदूबाबांची नावे घोषित

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचा समावेश

प्रयाग – अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील १४ भोंदू बाबांची सूची घोषित केली आहे. या सूचीत पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या नावाचा समावेश आहे. १० सप्टेंबरला येथे झालेल्या परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ही सूची घोषित केली. ही सूची केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे, जेणेकरून अशा ढोंगी बाबांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा त्या मागचा उद्देश आहे.

१. ‘या बैठकीच्या आधी मला दूरभाषद्वारे जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती’, असे महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी सांगितले. ‘गेल्या

३ दिवसांपासून धमकी येत होती’, असे ते म्हणाले. धमकी देणार्‍याने ‘आपण आसाराम बापू यांचा शिष्य आहे’, असे सांगितल्याचे महंत म्हणाले. याप्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

२. या वेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेने ‘संत’ उपाधी देण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करून त्याचे आकलन करून नंतरच ‘संत’ ही उपाधी दिली जाणार आहे. याद्वारे गुरमीत राम रहीम सारख्या लोकांकडून होत असलेल्यी धर्माच्या नावाखालील फसवणुकीला आळा बसेल.

३. विश्‍व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले, ‘‘एक-दोन भोंदू व्यक्तींमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटला आहे. त्यामुळे संत उपाधी देण्याआधी संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे.’’

आखाडा परिषदेने घोषित केलेली भोंदू बाबांची नावे

आसाराम बापू उपाख्य आशुमल शिरमलानी, सुखबिंदर कौर उपाख्य राधे मां, सच्चिदानंद गिरी उपाख्य सचिन दत्ता, गुरमीत राम रहीम सिंह, ओमबाबा उपाख्य विवेकानंद झा, निर्मल बाबा उपाख्य निर्मलजीत सिंह, रामपाल, आचार्य कुशमुनी, वृहस्पती गिरी, मलखान सिंह, इच्छाधारी भीमानंद उपाख्य शिवमूर्ती द्विवेदी, स्वामी असीमानंद, ओम नमः शिवाय बाबा, नारायण साई.


Multi Language |Offline reading | PDF