लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवणार्‍या ऑगस्ट २०१७ मधील घटना

मंदिरातील चोर्‍या

ऑगस्ट २ : सावंतवाडी तालुक्यातील धवडकी येथील श्री दत्तमंदिरातील २५ सहस्र रुपये किमतीच्या ३ समया चोरीस गेल्याची घटना उघडकीस

आली आहे.

ऑगस्ट १२ : श्रीगोंदा येथील दिगंबर जैन मंदिरातील २४ वे तीर्थंकर यांची २५० वर्षांपूर्वीची आणि ३ किलो वजन असलेली पंचधातूची मूर्ती चोरीला गेली.

ऑगस्ट १३ : हिंगोली येथील वसमत तालुक्यात आसेगाव येथे अनुमाने एक सहस्र वर्षे जुने चिंतामणि पार्श्‍वनाथ दिगंबर जैन मंदिरातील पितळेच्या ६ मूर्तींची चोरी झाल्याचे उघडकीस आले.

स्वाभिमानशून्य शासन !

ऑगस्ट ४ : युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही. युद्धानंतरही संवाद साधावा लागतो. त्यानंतरच तोडगा काढता येऊ शकतो. डोकलाम प्रकरण वाटाघाटींच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आहे. चीनसोबत चर्चा चालू असून त्या माध्यमातूनच मार्ग काढता येऊ शकतो, असे प्रतिपादन भाजपच्या परराष्ट्रमंंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत बोलतांना केले.

ऑगस्ट ५ : पाकने यावर्षी १ ऑगस्टपर्यंत २८५ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली.

ऑगस्ट ७ : भारत युद्ध किंवा संघर्ष टाळण्यास इच्छुक असेल, तर त्यांनी तात्काळ डोकलाममधून सैन्य माघारी घ्यावे, अशी धमकी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे कर्नल ली यांनी एका पत्रकार परिषदेतून दिली आहे.

ऑगस्ट १२ : ऑस्ट्रेलियातील रेड बबल या आस्थापनाने तिच्या लेगिंग्ज या उत्पादनावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून त्याचा अवमान केला आहे.

शासकीय अनागोंदी !

ऑगस्ट ७ : केंद्र सरकारने देशातील सैन्याच्या ३९ गोशाळा बंद करण्याचा आदेश दिला. या गोशाळांमध्ये २० सहस्र गायी आहेत. त्यातील अनेक गायी चांगल्या जातीच्या आहेत.

ऑगस्ट १० : जयपूर येथे अल्प कालावधीच्या व्हिसावर भारतात आलेले पाकमधील ९ हिंदू नागरिक परत जाण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी व्हिसाचा कालावधी वाढवण्याविषयी न्यायालयात अर्ज केला होता. सुटीचा दिवस असूनही ५ ऑगस्टला या प्रकरणी विशेष सुनावणी करत न्यायालयाने हिंदूंचे परत जाणे स्थगित करण्याचा आदेश दिला; मात्र अधिकार्‍यांनी या नागरिकांना ४ ऑगस्टच्या रात्रीच पाकला जाणार्‍या थार एक्सप्रेसध्ये बसवल्याने न्यायालयाचा आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवेपर्यंत ते सर्व जण पाकमध्ये पोहोचले होते.

ऑगस्ट ११ : बेंगळुरू येथील दिल्ली पब्लिक स्कूलने ३ ऑगस्ट या दिवशी अध्यादेश काढत ११ ऑगस्टला चिनी नववर्ष साजरे करण्याची घोषणा केली होती. यामध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना चीनचा पारंपरिक वेश परिधान करून येण्यास सांगण्यात आले होते. यासह नूडल्स, मोमोज, फ्राइड राइस आणि मन्चूरियन इत्यादी चायनीज पदार्थही आणण्यास सांगितले होते. या दिवशी शाळेमध्ये विविध चिनी पारंपरिक कार्यक्रम, फूड फेस्टिवल, चिनी संस्कृतीची चित्रे बनवण्याची स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते.

ऑगस्ट १६ : श्रीनगर येथे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचा अवमान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील बक्षी स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रगीत चालू असतांना अनेक जण उभेच राहिले नाहीत.

ऑगस्ट १८ : संभाजीनगर येथे शहरातील ‘टॉडलर्स नर्सरी’ या पूर्व प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ऑगस्ट २७ : चीनच्या हालचालींमुळे देशासमोर मोठे संकट निर्माण झाले असून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. चीनच्या हालचालींविषयी केंद्रशासनाने भूमिका घ्यायला हवी आणि त्या भूमिकेला सर्वांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून पाठिंबा द्यायला हवा, असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

वीजचोरी

ऑगस्ट ३ : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या दक्षता विभागाने जानेवारी ते एप्रिल २०१७ या ४ मासांत ७३२ प्रकरणांत १६ कोटी २७ लक्ष रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF