उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे जावेद हबीब सलूनची तोडफोड

सलूनच्या विज्ञापनांमध्ये देवतांचा उपयोग केल्याचे प्रकरण

लक्ष्मणपुरी – काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांनी त्यांच्या देशभरातील ‘सलून’चे विज्ञापन करतांना त्यात हिंदूंच्या देवतांचा उपयोग केला होता. यावरून टीका झाल्यावर त्यांनी क्षमाही मागितली होती. तसेच त्यांच्या विरोधात भाग्यनगर येथे गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला होता. या कालावधीत संभाजीनगर येथे त्यांच्या सलूनवर शाई फेकण्यात आली. आता उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये त्यांच्या सलूनची तोडफोड करण्यात आली आहे. ‘तोडफोड करणारे हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते होते’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘आधी मोतीनगरमधील सलूनवरही आक्रमण केले होते’, असेही पोलिसांनी सांगितले. ‘हिंदू देवतांचा अपमान करणारी गोष्ट घडली, तर त्याकडे कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष केले जाणार नाही. आम्ही हे सलून चालू देणार नाही’, असे मंचाचे विमल द्विवेदी म्हणाले.

तक्रारीनंतर ‘जावेद हबीब हेअर अ‍ॅण्ड ब्युटी’ आस्थापनाकडून जळगावच्या बहुभाषिक ब्राह्मण संघास माफीचे पत्र

धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने तक्रार प्रविष्ट करणार्‍या बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे अभिनंदन !

जळगाव, ९ सप्टेंबर (वार्ता.) – ‘जावेद हबीब हेअर अ‍ॅण्ड ब्युटी’ या आस्थापनाने हिंदूंच्या देवतांच्या केलेल्या विडंबनात्मक विज्ञापनाच्या विरोधात येथील बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे सचिव श्री. राजेश नाईक यांनी आस्थापनाच्या अधिकार्‍याकडे दूरभाषद्वारे निषेध नोंदवला होता आणि तक्रारही केली होती. ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या तक्रारीची नोंद घेत या आस्थापानाने त्याच्याकडून झालेल्या चुकीसाठी क्षमा मागत संगणकीय पत्त्याद्वारे माफीपत्र पाठवले. या माफीपत्रावर कार्यकारी संचालक पराग दोशी आणि व्यवस्थापकीय संचालक जावेद हबीब यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

पत्रात म्हटले आहे की,

१. विविध प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रे यांत प्रसिद्ध झालेले विडंबनात्मक विज्ञापन हे आस्थापनाच्या अध्यक्षांच्या अनुमतीविना प्रसिद्ध केले आहे; मात्र त्यात धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही. पश्‍चिम बंगालच्या स्थानिक लोकांनी आम्हाला न कळू देता हे कृत्य केले आहे. आम्ही ते विज्ञापन त्वरित काढून टाकण्यास सांगितले आहे.

२. आमच्याकडून जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याविषयी आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.

श्री. राजेश नाईक म्हणाले, ‘‘हिंदु धर्मियांना वेळोवेळी सहिष्णू समजून अशा प्रकारचे विडंबन सर्रास केले जाते. विज्ञापन प्रसिद्ध करणारी ती शाखा बंद करणार आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF