बांगलादेशच्या नरसिंग्डी जिल्ह्यात पोलिसांकडून हिंदूंचा छळ

भारत असो कि बांगलादेश, सर्वत्रचे पोलीस हिंदूंचाच छळ करतात !

चौकशीसाठी गेलेल्या अधिवक्ता रवींद्र घोष यांना हस्तक्षेप न करण्याची पोलीस अधीक्षकांची चेतावणी

ढाका – बांगलादेशच्या नरसिंग्डी जिल्ह्यातील नरसिंग्डी सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून प्रीतम भौमिक आणि टिटन सहा यांचा छळ चालू होता. याप्रकरणी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रविंद्र घोष आणि इतर काही सदस्य यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या छळाविषयी चौकशी करण्याचा प्रयत्न केला. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने पोलीस तपासात हस्तक्षेप करू नये, अशी चेतावणी पोलीस अधिक्षकांनी अधिवक्ता रविंद्र घोष यांना दिली.

याविषयी सविस्तर वृत्त असे की,

१. प्रीतम भौमिक यांच्या मातोश्री सौ. दिप्ती भौमिक यांची त्यांच्या रहात्या घरात भरदिवसा काही अज्ञात घुसखोरांनी हत्या केली. त्या वेळी प्रीतम भौमिक शाळेत गेला होता, तर त्याचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.

२. प्रीतम भौमिक दुपारी घरी आला असता त्याला त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने आरडाओरड करून शेजार्‍यांना जमवले. त्यानंतर त्याने नरसिंग्डी सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

३. पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रीतम भौमिक यालाच चौकशीसाठी कह्यात घेतले. दिप्ती भौमिक यांच्या हत्येप्रकरणी प्रीतम भौमिक यालाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू झाला. प्रीतम भौमिक याला पोलिसांनी मारहाण केली. त्यानेच हत्या केल्याचे स्वीकारण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात डांबून ठेवून त्याच्यावर अत्याचार करण्यात आले.

४. दिप्ती भौमिक यांच्या हत्येप्रकरणी कुठलाही तपास न करता प्रीतम भौमिक यालाच चौकशीसाठी कह्यात घेतल्याच्या घटनेचा ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने निषेध केला आहे. दिप्ती भौमिक यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांना शोधून काढून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी अधिवक्ता रविंद्र घोष यांनी केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF