जिल्ह्यांत विविध ठिकाणी शौर्यजागरण नाटिका, फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्याने यांना लक्षणीय प्रतिसाद

संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहीम

प्रात्यक्षिक दाखवतांना समितीचे कार्यकर्ते आणि उपस्थित भाविक

संभाजीनगर, ८ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत शहर आणि झाल्टा, माहुली, अढूळ ही गावे येथील विविध गणेशोत्सव मंडळांत उत्सवांतील गैरप्रकार आणि आदर्श गणेश उत्सव आणि अन्य राष्ट्र अन् धर्म विषयांवरील व्याख्याने, शौर्यजागरण नाटिकेद्वारे स्वसंरक्षणप्रात्यक्षिके, तसेच फ्लेक्स प्रदर्शन, तसेच सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन यांचा लाभ  धर्माभिमानी आणि गणेशभक्त यांनी घेतला. शहरातील १८ ठिकाणी सामूहिक नामजपाचे आयोजन केले होते. समितीने आयोजिलेल्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेमध्ये ३९ धर्मप्रेमी आणि वाचक यांनी सहभाग घेतला.

झाल्टा

१. येथील युवकांनी व्याख्यान आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके यांच्या कार्यक्रमापूर्वी एकत्रितपणे गावात उत्साहपूर्ण घोषणा देऊन फेरी काढली.

२. प्रात्यक्षिके बघितल्यावर गावकर्‍यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर घेण्याची मागणी केली आणि प्रशिक्षणवर्गात येण्याची सिद्धता दर्शवली.

३. धर्मशिक्षणवर्गातील सर्वश्री विकास शिंदे, सचिन मुरदारे, ज्ञानेश्‍वर शिंदे, सुरासे, समाधान शिंदे आणि अन्य धर्माभिमानी यांनी स्वतः दायित्व घेऊन कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.

अढूळ

१. येथे शौर्यजागरण नाटिकेचे आयोजन बजरंग गणेश मंडळ, शिवछत्रपती गणेश मंडळ आणि शिवशक्ती गणेश मंडळ यांनी संयुक्तरित्या केले.

२. नाटिका सादर होण्यासाठी धर्मशिक्षण वर्गातील सर्वश्री नारायण वाघ, नरेंद्र वाघ, आकाश पवार आणि अन्य धर्माभिमानी यांनी पुढाकार घेतला. हा उपक्रम पहाण्यासाठी गेवराई गावातील धर्मप्रेमीही उपस्थित होते.

माहुली

१. येथील शिवनिळकंठेश्‍वर मंदिर परिसरात निळकंठेश्‍वर गणेश मंडळाने लहान स्वरूपातील धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. गावातील धर्मप्रेमी श्री. विक्की लांडे यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित करण्यात आली होती.

२. सभेच्या वेळी प्रदर्शन लावण्याची सेवा गावातील आणि शनिशिंगणापूर येथील धर्मप्रेमी यांनी स्वतःहून सेवा केली.

कायगाव टोक येथे भाविकांनी केले वहात्या पाण्यात विधीवत् मूर्ती विसर्जन

जिल्ह्यातील कायगाव टोक येथे समितीचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त यांनी मिळून  मूर्तीविसर्जन मोहीम राबवली. प्रतिवर्षी येथील श्री रामेश्‍वर मंदिराजवळ विसर्जन घाट असतांनाही भाविक त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून गणेशमूर्ती खाली फेकून देत विसर्जन करतात; यंदाच्या वर्षी भाविकांचे प्रबोधन केल्यावर ६० टक्के भाविकांनी वहात्या पाण्यात विधिवत् मूर्ती विसर्जन केले. मोहिमेमध्ये नेवासा आणि देवगड येथील ७ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या मोहिमेत संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले.

काही मंडळांनी मात्र मोठ्या गणेशमूर्ती पुलावरून खाली नदीत फेकल्या. (यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची अपरिहार्यता लक्षात येते. – संपादक)

अभिप्राय

१. आज तुम्ही इथे आहात, म्हणून पुष्कळ चांगले विसर्जन होऊ शकले. नाहीतर नुसता धिंगाणा असतो. निर्माल्याचे खचच साठतात आणि वाहतूककोंडी होते. या वेळी चांगले विसर्जन होते आहे.

२. हिंदूंच्या एवढ्या मोठ्या सणाविषयीही हिंदूंमध्ये जागृती करावी लागते, हे किती दुर्दैव आहे.


Multi Language |Offline reading | PDF