सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे १०० टक्के विसर्जन !

अंनिस आणि धर्मद्रोही संघटना श्री गणेशमूर्ती दान घेण्यासाठी विसर्जनस्थळी फिरकलेच नाहीत !

सोलापूर, ७ सप्टेंबर (वार्ता.) – अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तत्सम धर्मद्रोही संघटना यांच्याकडून राबवण्यात येणार्‍या गणेशमूर्तीदान मोहिमेकडे या वर्षी सोलापूरकरांनी पाठ फिरवली. मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळासह अनेक गणेशोत्सव मंडळांचा असणारा तीव्र विरोध, तसेच हिंदु जनजागृती समितीसह अन्य समविचारी संघटनेचे जनप्रबोधन आणि निवेदनाद्वारे प्रशासकीय यंत्रणांकडे केलेला पाठपुरावा यांचा एकत्रित परिणाम म्हणून धर्मद्रोही संघटनेचे कार्यकर्ते विसर्जनस्थळी फिरकलेच नाहीत आणि सोलापूर येथे १०० टक्के गणेशमूर्ती विसर्जन झाले.

प्रदूषणाच्या नावाखाली हिंदूंच्या उत्सव आणि परंपरा यांना विरोध करणार्‍या अंनिससारख्या धर्मद्रोही संघटना विसर्जनस्थळी येऊन लोकांकडून बळजोेरीने मूर्तीदान घेणे, गणेशमूर्तींचे कृत्रीम हौदात विसर्जन करणे आणि त्याच मूर्ती नंतर खाणीत नेऊन टाकणे, असे प्रकार पूर्वी होत होते. लोकांच्या धर्मश्रद्धांशी खेळणार्‍या या प्रकाराला येथील मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळासह अन्य गणेशोत्सव मंडळे यांनी विरोध केला होता. पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीतही मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे विश्‍वस्थ श्री. दास शेळके यांनी याला जोरदार विरोध केला होता. मूर्तीदान घेणे यांसारख्या प्रकारांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास पोलीसच उत्तरदायी असतील, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली होती.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मशास्त्राप्रमाणे विसर्जन करण्याविषयी अनेक ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन केले होते. तसेच जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन या अशास्त्रीय मूर्तीदान मोहिमेस प्रतिबंध करावा, असे आव्हान करण्यात आले होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, धर्मवीर संभाजी तलाव तसेच सिद्धेश्‍वर तलावातील गणपती घाट आणि विष्णू घाट अशा चारही ठिकाणी या धर्मद्रोही संघटनांचा एकही कार्यकर्ता मूर्तीदान घेण्यासाठी फिरकला नाही.

१. विसर्जनासाठी काही शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी पादत्राणे घालून भक्तांच्या हातातील गणेशमूर्तींवर असलेले निर्माल्य घेत होते. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. पुरुषोत्तम कारकल यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचे प्रबोधन केले. त्यानंतर पादत्राणे बाजूला ठेऊन विद्यार्थी गणेशमूर्तीला स्पर्श करू लागले.

२. महापालिकेतील काही कर्मचारी पादत्राणे घालून गणेशमूर्तींना स्पर्श करत होते. पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांच्या हे ध्यानात आणून दिल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

सोलापूर महापालिकेची धर्मद्रोही कृती !

सोलापूर येथील महापालिकेने विसर्जन ठिकाणचे निर्माल्य गोळा केले. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘‘निर्माल्याचे काय करणार ?’’ असे विचारल्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. जोगदनकर यांनी सोलापूर येथे कचर्‍यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प चालू आहे त्यामुळे गोळा केलेल्या निर्माल्यापासून वीज निर्मिती करणार असल्याचे सांगितले. (निर्माल्यापासून वीज निर्मिती करायला तो कचरा नव्हे. श्री गणेशाची सात्त्विकता निर्माल्यात आल्याने त्याचे विसर्जन करणे अधिक योग्य आहे. – संपादक)

‘इको-फ्रेंडली क्लब’च्या कार्यकर्त्यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी गणेशमूर्तीदान घेण्याची मोहीम या वर्षी बंद केली !

येथील ‘इको-फ्रेंडली क्लब’ नावाच्या पर्यावरणवादी संघटनेकडून मागील वर्षी मूर्तीदान मोहीम राबवली होती आणि जमा केलेल्या गणेशमूर्ती पुढील वर्षी पुनर्वापरासाठी मूर्तीकारांना दिल्या होत्या. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी या धर्मविरोधी कृतीला विरोध केला होता. या वर्षी समितीच्या व्यापक जनप्रबोधनाचा परिणाम लक्षात आल्यानंतर त्या क्लबच्या कार्यकर्त्यांनी गणेशविसर्जनाच्या २ दिवस पूर्वी समितीच्या कार्यकर्त्यांना दूरभाष केला अन् म्हणाले, ‘‘तुम्ही करता ते प्रबोधन योग्य असून या वर्षी आम्ही मूर्तीदान घेणार नाही, तसेच निर्माल्य गोळा करण्याची मोहीम राबवणार असून जमा झालेले निर्माल्य कचर्‍यात न टाकता त्यापासून खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जेणेकरून मूर्तीतील चैतन्य जमिनीत राहून त्याचा लाभ होईल.’’


Multi Language |Offline reading | PDF