बेंगळुरूमध्ये नक्षल समर्थक पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचा पुरो(अधो)गाम्यांचा हिंदुद्वेषी प्रयत्न !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणारी आणखी एक घटना ! याआधी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या आणि गोरक्षकांच्या हत्या झाल्या, त्या वेळी निष्क्रीय राहिल्यानेच आता ही हत्या झाली, असा आरोप जनतेने केला तर तिला कोण थांबवणार

बेंगळुरू – साम्यवादी विचारांच्या नक्षल समर्थक पत्रकार गौरी लंकेश (वय ५५ वर्षे) यांची ५ सप्टेंबरला रात्री ८ वाजता येथील राजराजेश्‍वरी भागातील त्यांच्या घराबाहेर अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. गौरी रात्री त्यांच्या कार्यालयातून चारचाकी गाडीतून घरी पोहोचल्यावर गाडीतून उतरत असतांना आक्रमण करणार्‍यांनी त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर आणि छातीमध्ये गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. मारेकर्‍यांनी गौरी यांच्यावर ५० मीटर अंतरावरून ७ गोळ्या झाडल्या. त्यापैकी २ गोळ्या त्यांच्या छातीवर, तर १ त्यांच्या कपाळावर लागली. हत्या केल्यानंतर आक्रमणकर्ते पळून गेले. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी ३ पथके बनवली आहेत. गौरी यांची हत्या करणारे कोण होते आणि कोणत्या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली, याविषयी अद्याप कोणतीच माहिती पुढे येऊ शकलेली नाही. गौरी त्यांच्या हत्येनंतर देशभरातून साम्यवादी विचारांच्या लोकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे की, या हत्येसाठी भाडोत्री गुंडांचा वापर करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे आक्रमणकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला, त्याअर्थी त्यांच्या हत्येपूर्वी मारेकर्‍यांनी त्यांची माहिती काढली होती. पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळाले आहे. त्याच्या आधारे मारेकर्‍यांचा शोध घेण्यात येत आहे. किमान ३ मारेकरी होते, असे म्हटले जात असले, तरी पोलिसांनी संख्या स्पष्ट केलेली नाही.

गौरी लंकेश या कर्नाटकातील दिवंगत साहित्यिक पी. लंकेश यांच्या कन्या होत्या. पी. लंकेश यांचे ‘पत्रिका’ नावाचे नियतकालिक होते. वडिलांच्या निधनानंतर त्या या नियतकालिकाच्या संपादिका बनल्या होत्या; मात्र भाऊ इंद्रजितसमवेत वाद झाल्याने त्यांनी ‘साप्ताहिक गौरी लंकेश’ चालू केले. गौरी लंकेश यांची ओळख ‘डाव्या विचारसरणीच्या आणि नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्या’, अशी होती.

विशेष अन्वेषण पथकाची स्थापना

गौरी लंकेश हत्येच्या अन्वेषणासाठी पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याचा आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे. त्यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता, असा दावाही त्यांनी केला. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्यांचा एकमेकांशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही, असेही ते म्हणाले. लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांच्या विरोधात दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टशी आणि हत्येच्या घटनेचा काही संबंध आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. या दोन संशयितांचीही चौकशी करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संशयित कह्यात

लंकेश यांच्या हत्येच्या घटनेनंतर सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टच्या आधारावर पोलिसांनी संदीप नावाच्या तरुणाला कह्यात घेतले आहे. त्याचा आणि मारेकर्‍यांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, असा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांकडून सीबीआय चौकशीची मागणी

गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. कलबुर्गी हत्येचा तपासही राज्याच्या पोलिसांनी केला होता; पण अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत ते पोहोचले नाहीत. त्यामुळे या हत्येच्या तपासाची गतही तशीच होईल, असे सांगत ‘या हत्येच्या घटनेमागील सत्य लवकर बाहेर यावे, यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गौरी यांचा भाऊ इंद्रजित यांनी केली आहे.

देशभरातून विविध मान्यवरांनी सामाजिक माध्यमाद्वारे केलेला निषेध

१. सत्य कधी दडपले जाऊ शकत नाही. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. – राहुल गांधी

(इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीमध्ये साडेतीन सहस्र शिखांची हत्या झाली. यामागे काँग्रेस नेत्यांचा हात होता, असा आरोप आहे; मात्र अद्याप त्यांना शिक्षा झालेली नाही. यासंदर्भात राहुल गांधी कधीच काही बोलत नाहीत ! – संपादक)

२. गौरी लंकेश यांना अशाप्रकारे ठार केले जाणे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. या घटनेचा निषेध केला जावा तितका कमीच आहे. – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

(बंगालमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या हत्या होत आहेत, त्याविरोधात ममता बॅनर्जी काहीच करत नाहीत ! – संपादक)

३. त्यांच्या हत्येची बातमी स्तब्ध करणारी आहे. – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्

(केरळमध्ये माकपकडून संघाच्या नेत्यांच्या गेल्या काही महिन्यांत अनेक हत्या झाल्या. त्याविषयी विजयन् यांना काहीच वाटले नाही ! – संपादक)

४. गौरी तर्कशील व्यक्ती होती जिला गोळ्या झाडून शांत करण्यात आले. जे प्रवाहाच्या विरोधात विचार करतात त्यांना गप्प करण्याचा हा प्रयत्न आहे. – काँग्रेस नेते कपिल सिब्बल

(देहलीच्या रामलीला मैदानावर योगऋषी रामदेवबाबा यांच्या समर्थकांवर रात्री झोपेमध्ये पोलीस कारवाई करून अत्याचार करण्यामागे कपिल सिब्बल होते. तेव्हा त्यांनी रामदेवबाबा यांना अशा प्रकारे शांत करण्याचा प्रयत्न केला होता ! – संपादक)

५. गौरी लंकेश यांना ठार करण्यात आल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. –  पत्रकार राजदीप सरदेसाई

६. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता पत्रकार गौरी लंकेश यांची त्याच पद्धतीने हत्या झाली ही गोष्ट निषेधार्ह आहे. – लेखक आणि कवी जावेद अख्तर

(जेव्हा देशात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होतात, तेव्हा अशा प्रकारे कोणीही निषेध करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)

गौरी लंकेश यांच्याकडून सातत्याने भाजप सरकारविरोधी लिखाण

१. गौरी लंकेश सातत्याने भाजपसरकार विरोधी लिखाण करत होत्या. त्यांच्या साप्ताहिकात गेल्या ३ महिन्यांत सरकारविरोधी ८ लेख प्रसिद्ध झाले होते. शेवटच्या लेखात त्यांनी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास रुग्णालयातील मुलांचे मृत्यू आणि या प्रकरणी डॉ. कफील खान यांना हटवण्यात आल्याच्या विरोधात लिहिले होते.

२. सामाजिक माध्यमातूनही गौरी लंकेश भाजप सरकारवर टीका करणार्‍या पोस्ट करत होत्या. गेल्या काही दिवसांत त्यांनी केरळमधील आएएस् अधिकारी जेम्स विल्सन यांच्या ट्विट रिट्विट केल्या होत्या. विल्सन यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीवर टीका केली होती.

३. मृत्यूपूर्वी २४ घंट्यांत त्यांनी विविध बातम्यांच्या लिंक शेअर केल्या होत्या. यात सर्वोच्च न्यायालयाने रोहिंग्या मुसलमानांना भारतातून परत पाठवण्यासंदर्भात केंद्र सरकारला विचारल्याची बातमीही होती.

४. फेसबूकवर गौरी लंकेश यांच्या प्रोफाइलमध्ये भाग्यनगर येथील महाविद्यालयातील आत्महत्या केलेला विद्यार्थी रोहित वेमुला याचे छायचित्र आहे. तसेच ट्विटरवर जे.एन्.यू.चा विद्यार्थी कन्हैय्या कुमारसोबत गौरी लंकेश यांचे छायाचित्र असलेले छायाचित्र ठेवण्यात आले आहे.

( संदर्भ : दैनिक जनसत्ता)

गौरी लंकेश यांच्या हत्येविषयी केले जात असलेले तर्कवितर्क !

१. गौरी लंकेश राज्यातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भ्रष्टाचाराविषयीच्या माहितीवर काम करत होत्या. त्यामुळे त्यांचा काटा काढण्यात आला, असे म्हटले जात आहे.

२. काही मासांपूर्वी २ नक्षलवाद्यांनी गौरी लंकेश यांच्या माध्यमातून शरणागती पत्करली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांचा त्यांच्यावर रोष होता, असेही सांगण्यात येत आहे.

३. गौरी लंकेश यांचा तिचा भाऊ इंद्रजित यांच्याशी मालमत्तेवरून वाद चालू होता. या प्रकरणी तक्रारही झाली होती. यामुळेही ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.

४. लिंगायत समुदायाच्या विरोधात लेख लिहिल्याने हा समाज गौरी लंकेश यांच्यावर असंतुष्ट होता.

गौरी लंकेश यांना मानहानीच्या खटल्यात ६ मासांची शिक्षा झाली होती

२३ जानेवारी २००८ या दिवशी ‘साप्ताहिक गौरी लंकेश’मध्ये छापलेल्या एका लेखावरून भाजपचे धारवाड येथील खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजपचे पदाधिकारी उमेश दोशी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यात गौरी लंकेश यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यासाठी त्यांना ६ मासांचा कारावास आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता; मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती.

कोणतीही हत्या ही निषेधार्हच; पण हिंदूंच्या हत्यांवर मौन आणि कम्युनिस्टांच्या हत्यांवर गदारोळ, हे दांभिक पुरोगामित्व ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली आणि पुन्हा एकदा कोणताही तपास झालेला नसतांना देशभरात ‘पुरोगाम्यांची हत्या’, ‘विचारांची हत्या’ आदी नावाने गदारोळ माजू लागला आहे. हिंदुत्वाला अपकीर्त करण्यासाठी मिळेल ती संधी साधायची, ही कम्युनिस्टांची नेहमीचीच खेळी आहे. कर्नाटकासह दक्षिण भारतात चालू असलेल्या ‘सदर्न जिहाद’च्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करून केल्या जात असलेल्या हत्यांविषयी आजही तथाकथित पुरोगामी मूग गिळून गप्प का आहेत ? हत्या कोणाचीही असो, ती निषेधार्हच आहे; पण पुरोगामी विचारवंतांच्या हत्या या मानवतेमध्ये बसणार्‍या असतात आणि हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांच्या हत्या मानवतेच्या दृष्टीकोनात बसत नाहीत, असे का ? हिंदूंच्या हत्यांवर मौन बाळगून कम्युनिस्टांच्या हत्यांवर गदारोळ करणे, हे दांभिक पुरोगामित्व आहे. या तथाकथित मानवतावादी दृष्टीकोनाचाही निषेध सनातन संस्था करते, असे मत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.

दाभोलकरांची हत्या झाली, तेव्हाही एका घंट्याच्या आत काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ही हत्या नथुरामी प्रवृत्तींनी केली’ असे म्हणत तपासाची दिशा भरकटवली. आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनीही ही चूक करू नये अन्यथा दाभोलकरांचे खरे मारेकरी जसे पळून गेले, तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणात होईल. पोलिसांवर कोणताही दबाव न आणता त्यांना मुक्तपणे तपास करू द्यावा, असे आवाहनही श्री. राजहंस यांनी केले.

भाकपच्या नेत्या उमा पानसरे यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत !

एका वाहिनीवर उमा पानसरे यांनी ‘समीर गायकवाडला जामीन मिळाल्यामुळे गौरी लंकेश यांची हत्या झाली’ असे म्हटले आहे. कोणताही तपास झाला नसतांना असे विधान त्यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे केले, हे त्यांनी स्पष्ट करावे. अशी बिनबुडाची विधाने प्रसिद्धीच्या झोतात रहाणारी राजकीय मंडळी करत असतात. तरी भाकपच्या नेत्या उमा पानसरे यांनी याचे पुरावे जनतेसमोर मांडावेत, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेसारख्या संघटनांवर अद्याप कारवाई नाही !’ – लेखक मंगलेश डबराल

लेखक मंगलेश डबराल यांनी बीबीसी वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, यापूर्वी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या होत्या. या सर्वांना मारण्याची पद्धत एकच आहे. यात अनेक संस्थांची नावे पुढे आली; परंतु कारवाई झाली नाही. या हत्यांच्या प्रकरणी सनातन संस्थेचेही नाव आले; मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. गोव्यामध्ये नुकतेच हिंदु संमेलन झाले. यात सनातन संस्थेचा सहभाग होता. यातून स्पष्ट होते की, त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन मिळालेले आहे. ही चिंताजनक गोष्ट आहे की, सत्ताधारी अशा घटना करणार्‍या शक्तींच्या डोक्यावर हात ठेवून आहेत. (‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, ही म्हण सार्थ करणारे लेखक मंगलेश डबराल ! – संपादक)

(संदर्भ : बीबीसी हिंदी)

(म्हणे) ‘समीर गायकवाडच्या जामिनामुळेच गौरी लंकेश यांची हत्या झाली !’

उमा पानसरे यांचा कांगावा !

कोल्हापूर – समीर गायकवाडच्या जामिनामुळेच गौरी लंकेश यांची ४ थी हत्या झाली, असा आरोप कॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी केल्याचे वृत्त आयबीएन् लोकमतच्या ट्विटर अकाऊंटवर दाखवले गेले. (समीर गायकवाड हे महाराष्ट्रात रहातात आणि गौरी यांची हत्या कर्नाटकात झाली आहे. त्यामुळे उमा पानसरे यांचे आरोप म्हणजे ‘वड्याचे तेल वांग्यावर काढणे’, तसेच ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असा प्रकार आहे. देशात कुठेही पुरोगाम्यांची हत्या झाल्यास सनातनचे नावच घायची ‘टूम’ निघाली आहे. त्यातलाच हा प्रकार आहे ! – संपादक) मारेकर्‍यांचे बळ वाढत चालले असून त्यांना कशाचीही भीती राहिलेली नाही आणि तपास यंत्रणांमध्येही बळ राहिलेले नाही, अशीही प्रतिक्रिया उमा पानसरे यांनी प्रसारमाध्यमातून व्यक्त केली आहे. उमा पानसरे म्हणाल्या की, समीर गायकवाडला जामीन मिळायला नको होता. समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक होता. या हत्यांमागे मोठे षड्यंत्र आहे. तपासांविषयी आजही साशंकता वाटते.

(म्हणे) ‘निर्भिड पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी पकडा, दाभोलकर-पानसरे यांचे मारेकरी न पकडल्यानेच उजव्या शक्तींचा जोर वाढलाय ! – महाराष्ट्र अंनिस यांचे प्रसिद्धीपत्रक

सांगली –  पाच सप्टेंबर या दिवशी बेंगळुरू येथे ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारवंत गौरी लंकेश यांचा निर्घृण खून करण्यात आला. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांचे मारेकरी आणि त्या मागचे सूत्रधार अजून पसार असतांना त्याच पद्धतीने लंकेश यांची हत्या करण्यात आली, हे अत्यंत वेदनादायी आहे. या खुनाचा डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, याची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्र.रा. आर्डे, संजय बनसोडे आणि राहुल थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘स्वतंत्र विचार मांडणार्‍या आणि विवेकवादी लोकांच्या होणार्‍या हत्या हे एक प्रकारचे आतंकवादी कृत्य आहे. जोपर्यंत मारेकरी सापडले जात नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र अंनिस सातत्याने लोकशाही मार्गाने लढा देत राहील ! डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे पसार असलेले मारेकरी शोधण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करावा.’

दाभोलकर यांची हत्या करणार्‍या शक्तींचा लंकेश यांच्या हत्येमागे हात ! – डॉ. हमीद दाभोलकर, सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

अंनिसचे नेहमीचे तुणतुणे !

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम्.एम्.कलबुर्गी यांची हत्या केली, त्याच शक्तींचा लंकेश यांच्या हत्येमागे हात आहे. योग्य वेळी या शक्तींना आळा घातला असता, तर लंकेश यांची हत्या झाली नसती. हे एक आतंकवादी कृत्यच आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात निदर्शने

तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणारे पुरो(अधो)गामी !

पुणे, ६ सप्टेंबर (वार्ता.) – पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ विविध पुरोगामी संघटनांनी ६ सप्टेंबर या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या चौकात निषेध आंदोलन केले. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, अंनिसचे मिलिंद देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, कॉम्रेड अभ्यंकर यांच्यासह अन्य पुरा(अधो)गामी उपस्थित होते. ‘मी गौरी लंकेश’ असे लिहिलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘आर्एस्एस् मुर्दाबाद’, ‘लाल सलाम’, ‘जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा’ अशी घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. या वेळी संघ, पंतप्रधान मोदी आणि भाजप यांवर तोंडसुख घेतले गेले. (पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप अस्पष्ट असतांना हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या संघटनांवर चिखलफेक करणे, हा अविवेक आणि बौद्धिक दिवाळखोरी आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF