कोपरी (नवी मुंबई) येथे अल्पवयीन अल्पसंख्यांक मुलांकडून श्री गणेशमूर्तीवर दगडफेक

नवी मुंबई – कोपरीगाव (वाशी) येथे पाच अल्पवयीन मुलांनी २ सप्टेंबरला पहाटे श्री गणेशमूर्तीवर दगडफेक केल्यामुळे मूर्तीचा हात तुटला आहे. या प्रकरणी  एपीएम्सी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या मुलांना कह्यात घेऊन कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिली. सामाजिक प्रसारमाध्यमांवरूनही  हे वृत्त मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले.

कोपरी गावात साईकृपा रहिवाशी संघाचे श्री साईबाबा मंदिर आहे. या मंदिरात प्रत्येक वर्षी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक श्री. विलास भोईर यांच्या पुढाकाराने श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. या मंदिरामागेच अनधिकृतपणे एक मदरसा चालवला जात आहे. हा मदरसा अवैैध असल्याने मे मासात महापालिकेने तो भुईसपाट केला होता; मात्र तरीही तेथे पत्र्याची शेड करून हा मदरसा चालू करण्यात आला होता. येथील पाच अल्पवयीन मुलांनी पहाटे ५.३० वाजता पूर्वनियोजन करून साईबाबा मंदिरातील श्री गणेशमूर्तीवर दगडफेक केली आणि तेथून पळ काढला. हे दृश्य मंदिरासमोरील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमर्‍यात चित्रीत झाले आहे. सकाळी नेहमीप्रमाणे येथील रहिवाशी श्री गणेशाच्या दर्शनाला आले असता त्यांना गणपतीचा डावा हात तुटल्याचे निदर्शनास आले. ही माहिती कोपरी गावात पसरली आणि त्यानंतर सामाजिक प्रसारमाध्यमातून संपूर्ण शहरात पसरली.

येथील नागरिकांनी नगरसेवक श्री. विलास भोईर यांना बोलावून घेतले आणि या प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर मंदिराच्या समोरील दुकान उघडल्यावर त्याच्या सीसीटिव्हीत या ५ मुलांनी हे कृत्य केल्याचे उघड होताच या परिसरात आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली, तसेच नवी मुंबई मंदिर समितीच्या स्वयंसेवकांनी देखील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तसेच संबंधित मुले आणि मदरसा शिक्षक यांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गलांडे यांच्याकडे केली.

या प्रकरणी नगरसेवक श्री. भोईर यांनी एपीएम्सी पोलीस ठाण्यात मूर्तीभंजन करणारी मुले आणि संबंधित मदरशाचा शिक्षक यांच्या विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून संबंधित ५ मुलांना कह्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली; परंतु संबंधित मदरशाच्या शिक्षकावर कारवाई केली नाही. दुपारी ३ वाजल्यानंतर येथील भाविकांनी भंजन झालेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून त्या ठिकाणी पुन्हा नवीन श्री गणेशमूर्तीची स्थापना केली.

आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या वतीने कोपरी गावातील अनधिकृत मदरसा आणि त्यातील सर्व पदाधिकारी यांवर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार

नवी मुंबई – कोपरी गावातील साईबाबा मंदिर स्थित सार्वजनिक श्री गणेशमूर्तीची विटंबना आणि दगडफेकीसारखे षड्यंत्र रचून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गावातील अनधिकृत मदरसा अन् त्यातील सर्व पदाधिकारी यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार २ सप्टेंबर या दिवशी आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या वतीने पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्याकडे करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF