अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांनी केलेल्या अग्निहोत्रातील विभूती आणि त्यांच्या अस्थी अन् रक्षा यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी

संतांमधील सात्त्विकतेचा सकारात्मक परिणाम त्यांच्या संपर्कातील वस्तू, वास्तू, व्यक्ती इत्यादींवर होत असतो. संतांशी निगडित वस्तूंचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या, अन्य संतांच्या आणि काही साधकांच्याही वापरातील वस्तूंचा प्रभावळ अन् ऊर्जामापक यंत्रे यांच्या साहाय्याने अभ्यास केला आहे. संतांशी निगडित वस्तूंतील हे वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर केला आहे. या उपकरणाच्या साहाय्याने ५.१२.२०१६ आणि १३.१२.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांनी केलेल्या अग्निहोत्रातील विभूती, तसेच त्यांच्या अस्थी आणि रक्षा यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे, हा या चाचणीचा उद्देश होता. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत बंबातील राख, अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांनी केलेल्या अग्निहोत्रातील विभूती, त्यांच्या अस्थी आणि रक्षा यांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. बंबातील राख : ही रामनाथी आश्रमात पाणी तापवण्यासाठी प्रतिदिन पेटवण्यात येणार्‍या बंबातील राख आहे. ही तुलनेसाठी वापरण्यात आली.

२ आ. अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी : सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या बार्शी तालुक्यात वसलेले कासारवाडी हे गांव ! येथील श्री योगिराज वेद विज्ञान आश्रमाचे संस्थापक अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) गोविंद काळेगुरुजी यांनी अश्‍वमेध यज्ञासारखी शारीरिक, आर्थिक आणि आध्यात्मिक बळ असले, तरच करून दाखवण्यासारखी अत्यंत कठीण गोष्ट कलियुगात स्वचैतन्याने लीलया साध्य करून दाखवली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ वेळा अश्‍वमेध यज्ञ आणि अनेक वेळा सोमयाग करणारे प.पू. नाना एकमेवाद्वितीय होते. त्यांनी संतपद गाठल्याचे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी १०.१२.२०१२ या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी येथे झालेल्या एका अनौपचारिक सोहळ्यात घोषित केले होते. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा उत्तम संगम म्हणजे प.पू. नाना ! कर्मकांडातून संतपद मिळवून प.पू. नानांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे, या शब्दांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे कौतुक केले होते. महर्षींनीही नाडीवाचनातून प.पू. नानांची महती पुढील शब्दांत वर्णन केली होती, पृथ्वीवर असा एकमेव तपोवृद्ध यज्ञयोगी आहे की, जो संकल्पाने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी राजसूय यज्ञ करू शकतो. प.पू. नाना काळेगुरुजी यांनी ११.१०.२०१६ या दिवशी देहत्याग केला.

(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात (१२ आणि १३.१०.२०१६))

२ इ. अग्निहोत्रातील विभूती : अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी हे अग्निहोत्री होते. त्यांनी स्वतः केलेल्या अग्निहोत्रातील (टीप) विभूती चाचणीसाठी वापरण्यात आली.

टीप – अग्निहोत्र हे वेदांमध्ये सांगितलेले एक साधे हवन आहे. यात सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी गायीचे घृत (तूप) लावलेल्या दोन चिमूट अक्षतांची अग्निहोत्राच्या पात्रात प्रज्वलित केलेल्या अग्नीमध्ये २ साध्या मंत्रांच्या उच्चारांसह आहुती दिली जाते. अग्निहोत्र केल्याने वातावरण चैतन्यदायी बनते आणि आपल्याभोवती संरक्षक कवचही सिद्ध होते.

(संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ अग्निहोत्र)

२ ई. प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या अस्थी आणि रक्षा : प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या देहत्यागानंतर त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी रघुनाथ काळेगुरुजी त्यांच्या अस्थी आणि रक्षा यांचा कलश घेऊन रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते.

यू.टी.एस् उपकरण

३. यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू : एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

३ आ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख : या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

३ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ इ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

३ इ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ इ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.

 या चाचणीतील वस्तूंची प्रभावळ मोजण्यासाठी बंबातील राख, अग्निहोत्रातील विभूती आणि रक्षा यांची प्रत्येकी एक चिमूट अन् अस्थीचा एक छोटा तुकडा नमुना म्हणून वापरण्यात आला आहे.

३ ई. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत : चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यू.टी.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ३ इ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू यांना नम्र विनंती !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख अन्य मासिकांत प्रसिद्ध करण्यासाठी उपलब्ध !

१. विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संशोधन क्षेत्रात केलेले अद्वितीय कार्य ! : गेल्या ३० वर्षांपासून सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले सार्‍या विश्‍वाला अध्यात्मशास्त्राचे वैज्ञानिक भाषेत ज्ञान देण्याचे अनमोल कार्य करत आहेत. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे विश्‍वातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा अतींद्रिय शक्तींचा वेध घेणे, त्यांची सत्यता पडताळणे आदी माध्यमांतून ते व्यापक असे संशोधनकार्य करत आहेत. आहार, वेशभूषा, केशभूषा, धार्मिक कृती, यज्ञ, जप, मुद्रा, संस्कृत भाषा आदींचे व्यक्ती आणि वातावरण यांवर होणारे इष्ट परिणाम अशा १ सहस्रहून अधिक विषयांवर थर्मल इमेजिंग, पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स् फोटोग्राफी (पिप) आदी वैज्ञानिक उपकरणे अन् तंत्रज्ञान वापरून संशोधन चालू आहे. संशोधन क्षेत्रामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले हे सर्व कार्य अद्वितीय आहे.

२. विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध केले जात असल्याने जनसामान्यांना त्यांचा लाभ होणे : विविध विषयांवर केल्या जाणार्‍या या संशोधनाच्या संदर्भात जनसामान्यांनाही ज्ञान मिळावे, या दृष्टीने दैनिक सनातन प्रभातमध्ये ते नियमितपणे प्रसिद्ध केले जाते. लिखाणाची सुबोध भाषा, विषयाची शास्त्रीय मांडणी, आवश्यक तेथे आकृत्या, सारणी, सूक्ष्म-चित्रे यांमुळे या संशोधन कार्याला जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून केलेले अन् आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध झालेले हे संशोधन अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा अधिक विश्‍वासार्ह वाटते, असे अनेक जिज्ञासू स्वतःहून सांगत आहेत. वर्ष २०१६ पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक परिषदांमधूनही हे शोधनिबंध सादर केले जात आहेत.

या संशोधनात्मक लेखांचे महत्त्व लक्षात घेऊन बरेच जिज्ञासू गणेशचतुर्थी विशेषांक, दिवाळी विशेषांक आदींमध्ये प्रसिद्धीसाठी लेखांची मागणी करत आहेत. जे वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू यांना विविध मासिकांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी हे लेख हवे असतील, त्यांनी पुढील सारणीतील सूत्रांनुसार रामनाथी आश्रमात श्री. रूपेश रेडकर यांना [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर माहिती पाठवावी.

(टपालासाठी पत्ता : श्री. रूपेश रेडकर, सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.)

वरील संगणकीय पत्र पाठवल्यानंतर त्याविषयी श्री. रूपेश रेडकर यांना ९५६१५७४९७२ संपर्क क्रमांकावर लघुसंदेश पाठवू शकतो.

५. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

टीप – स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

६. निरीक्षणांचे विवेचन

६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – चाचणीतील चारही वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा नसणे : सर्वसाधारण वास्तू किंवा वस्तू यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण या चाचणीतील बंबातील राख, अग्निहोत्रातील विभूती, प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या अस्थी आणि रक्षा या चारही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा मुळीच नाही. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ८ मध्ये दिले आहे.)

६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या रक्षेत सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळणे : सर्वच वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. बंबाच्या राखेत सकारात्मक ऊर्जा आढळली नाही; पण चाचणीतील अग्निहोत्रातील विभूती आणि प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या अस्थी अन् रक्षा या तीनही वस्तूंत चाचण्यांच्या वेळी स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे त्या सर्व ठिकाणी सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आहे आणि तिची स्पंदने त्यांच्यापासून अनुक्रमे १.४३, १.६१ आणि २.२३ मीटर दूरपर्यंत जाणवत आहेत. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ८ मध्ये दिले आहे.)

६ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या अस्थींची प्रभावळ सर्वाधिक असणे : सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. चाचणीतील बंबाची राख, अग्निहोत्रातील विभूती आणि प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या अस्थी अन् रक्षा यांची प्रभावळ अनुक्रमे १.२२, २.०४, २.७३ व २.४१ मीटर आहे. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ८ मध्ये दिले आहे.)

७. निष्कर्ष

संतांनी केलेल्या अग्निहोत्रातील विभूती, तसेच त्यांच्या अस्थी आणि रक्षा यांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.

८. चाचणीतील वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा असण्यामागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

८ अ. बंबातील राख : ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील पाणी तापवण्यासाठी प्रतिदिन पेटवण्यात येणार्‍या बंबातील राख आहे. आश्रमातील संत आणि साधक यांचे वास्तव्य अन् त्यांची दैनंदिन साधना, तसेच आश्रमातून चालणारे राष्ट्र आणि धर्म यांसाठीचे कार्य यांमुळे निर्माण झालेल्या सात्त्विकतेमुळे आश्रमातील निर्जीव वस्तूंमध्येही सकारात्मक स्पंदने निर्माण झाली आहेत. त्याचा परिणाम बंबातील राखेवरही झाला आहे.

८ आ. अग्निहोत्रातील विभूती : अग्निहोत्र हे यज्ञाचे सर्वांत पहिले आणि सर्वांगपूर्ण असे सहज रूप आहे. ईश्‍वराची उपासना करणे आणि आसक्ती नष्ट व्हावी, या हेतूने त्याग करणे, दान करणे, ही या यज्ञामागची मूलभूत संकल्पना आहे. अग्निहोत्रासाठी वापरण्यात येणार्‍या सर्व वस्तू (गायीच्या शेणाच्या गोवर्‍या, गायीचे घृत (तूप), अक्षता) सात्त्विक आहेत. मंत्रांच्या उच्चारांसह आहुती दिली जाते. या सर्वांमुळे अग्निहोत्रातील विभूती सात्त्विक असते. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ अग्निहोत्र) एका संतांनी हे अग्निहोत्र केले असल्याने या विभूतीमधील सात्त्विकता नेहमीपेक्षाही अधिक आहे.

८ इ. प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या अस्थी आणि रक्षा : सर्वसाधारण व्यक्तीचा देह रज-तमप्रधान असल्याने त्याच्या अस्थी आणि रक्षा याही रज-तमप्रधान असतात; परंतु प.पू. नाना काळेगुरुजी उच्च कोटीचे संत असल्याने त्यांच्या अस्थी अन् रक्षा सत्त्वप्रधान आहेत.

संतांनी केलेले अग्निहोत्र, यज्ञ किंवा अन्य पूजनविधी यांमधील विभूती कपाळाला लावल्याने किंवा जवळ बाळगल्याने अनेक व्यक्तींना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण या चाचणीतून स्पष्ट होते. संतांच्या देहत्यागानंतरही त्यांच्या अस्थी आणि रक्षा यांच्या माध्यमातून त्यांच्यातील सात्त्विकता वातावरणात प्रक्षेपित होत राहिल्याने त्यांचे मानवकल्याणाचे कार्य त्यांच्या नंतरही अहर्निश चालू रहाते, हेही या चाचणीतून लक्षात येते.

९. प.पू. नाना काळेगुरुजी यांनी  केलेल्या अग्निहोत्रातील विभूतीपेक्षाही त्यांच्या अस्थी आणि रक्षा यांत अधिक सकारात्मक स्पंदने असणे

येथे लक्षात घेण्याचे विशेष सूत्र म्हणजे प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या अस्थी आणि रक्षा यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अन् प्रभावळ अग्निहोत्रातील विभूतीमधील सकारात्मक ऊर्जा आणि प्रभावळ यांच्यापेक्षाही अधिक आहे. याचे कारण अग्निहोत्रातील विभूतीशी त्यांचा संपर्क अल्प असून, अस्थी आणि रक्षा प्रत्यक्ष त्यांच्या देहाशी निगडित आहेत, हे आहे.

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१९.७.२०१७) ई-मेल : [email protected]


Multi Language |Offline reading | PDF