कर्नाटकातील साधकांना श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या कृपेमुळे आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. तीन वर्षांपासून घर बांधायचा विचार करत असतांना गुरूंनी स्वप्नात येऊन घर लवकरच पूर्ण होईल, असे सांगणे आणि त्यानंतर १ मासात (महिन्यात) घर बांधून होणे

आम्हाला घर बांधायला हवे, असे वाटत होते; पण गेल्या ३ वर्षांपासून आम्ही केवळ विचारच करत होतोे. आम्ही प्रत्येक दिवशी श्रीकृष्ण आणि गुरु यांच्या चरणी प्रार्थना करत होतो. एक दिवस मला आणि मुलीला (सौ. विद्या शेट हिला) स्वप्नात दिसले, गुरुदेव आमच्या घरी आले आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले, तुमचे घर लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर एका मासातच (महिन्यात) आमचे घर बांधून पूर्ण झाले. यासाठी गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

– सौ. मोहिनी शेट, होन्नावर, जिल्हा उत्तर कन्नड, कर्नाटक. (२४.४.२०१७)

२. रुग्णालय आणि औषधे यांसाठी कराव्या लागणार्‍या व्ययाचे पैसे सत्साठी अर्पण केल्यावर कोणताही त्रास न होणे

मी साधनेत येण्यापूर्वी मला सतत रुग्णालयात जावे लागायचे आणि औषधे घ्यावी लागायची. मी साधनेत आल्यानंतर माझी बहीण सौ. मोहिनी शेट हिने मला सांगितले, रुग्णालय आणि औषधे यांसाठी करावा लागणार्‍या व्ययाचे पैसे सत्साठी अर्पण कर. त्याप्रमाणे मी अर्पण करू लागले. आता मला कोणताही त्रास न होता मी गुरूंच्या कृपेने सुखात आहे. यासाठी मी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. – सौ. गीता दैवज्ञ, धारवाड, कर्नाटक. (२४.४.२०१७)

३. पक्ष्याने विमानाला धडक दिल्याने विमान आकाशात झेपावण्याऐवजी खाली जात असतांना श्रीकृष्ण आणि गुरु यांना शरण जाऊन प्रार्थना करणे आणि त्यानंतर विमान नियंत्रणात येऊन इच्छित स्थळी सुखरूप पोहोचणे

आम्ही मंगळुरू येथून दुबई येथे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होतो. अकस्मात् एका पक्षाने विमानाला धडक दिली. तेव्हा वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वैमानिक आणि प्रवासी घाबरले. विमान आकाशात झेपावण्याऐवजी खाली जाऊ लागले. तेव्हा मी श्रीकृष्ण आणि गुरु यांना संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना केली. नंतर विमान नियंत्रणात आले आणि आम्ही सुखरूप दुबई येथे पोहोचलो. आम्ही श्रीकृष्ण आणि गुरु यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. – सौ. विद्या शेट, होन्नावर, कर्नाटक. (२४.४.२०१७)

४. फलक लावतांना ८ ते १० फुटांवरून घसरून खाली पडणे आणि भूमीवर दगड अन् काचा पडलेल्या असूनही कोणतीही दुखापत न होणे

एकदा मी हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी फलक लावण्याच्या सेवेत मग्न होतो. फलक बांधतांना मी अकस्मात् ८ ते १० फुटांवरून घसरून खाली पडलो. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तिथे दगड आणि काचा पसरलेल्या असूनही मला कोणतीही दुखापत झाली नाही. गुरूंनी मला दोन्ही हातांनी पकडले होते, याची मला जाणीव झाली. गुरुदेव साधकांचे कशा प्रकारे रक्षण करतात, याची जाणीव होऊन गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

५. दुचाकीवरून जात असतांना वळणावर घसरून पडल्यावर मित्राला पुष्कळ लागणे; मात्र साधकाला गुरुदेवांनी दुचाकीवरून झेलून धरले होते, याची जाणीव होणे

मी आणि माझा मित्र होन्नावर येथून जोग धबधबा येथे व्यावहारिक कामासाठी दुचाकीवरून निघालो होतो. वाटेत एका वळणावर दुचाकीवरील नियंत्रण जाऊन आम्ही घसरून पडलो. माझ्या मित्राला पुष्कळ लागले आणि शरिरातून रक्त येऊ लागले; पण मला गुरुदेवांनी दुचाकीवरून झेलून धरले होते, याची जाणीव झाली. मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

– कु. विवेक शेट, होन्नावर, उत्तर कन्नड जिल्हा, कर्नाटक.

वरील प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF